नवी दिल्ली -भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांनी आज लोकसभेमध्ये वर्धा शहरातील पुलाच्या रखडलेल्या कामावरून प्रश्न उपस्थित केले. शहरातील रेल्वे उड्डाणपूलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत होती. केंद्रीय मार्ग निधी (सीआरएफ) अंतर्गत मागणीस स्वीकृत देण्यात आली. त्यामुळे भारत सरकारचे आभार मानतो. या पुलाचे काम 1 ऑक्टोंबर 2016 पासून सुरू झाले आहे. मात्र, ते आतापर्यंत त्या पुलाचे काम पूर्ण न झाल्यामुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे पुलाचे काम जलदगतीने पूर्ण होण्यासाठी सरकार काय पाऊल उचलत आहे, असा प्रश्न तडस यांनी उपस्थित केला.
खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं. रामदास तडस यांच्या बोलण्यात तथ्य आहे. या प्रकल्पाचे काम रखडलं आहे. 1 ऑक्टोंबर 2016 कामाचे आदेश दिले होते. पूलाचे काम पूर्ण होण्याची तारीख 30 सप्टेंबर 2018 होती. मात्र, इतर कारणांमुळे तसेच रेल्वे डिझाईन सतत बदल्यामुळे पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नाही, असे गडकरी म्हणाले. संबंधित पुलावर आम्ही पुन्हा एक बैठक घेवू आणि येत्या सहा महिन्यात काम पूर्ण करू, असेही ते म्हणाले.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रातून येतात. त्यांना येथील सर्व समस्या माहीत आहेत. महाराष्ट्रात पुणे-सातारा मार्ग जातो. मात्र, तिथे अपघात होत आहेत. ही समस्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. त्यावर गडकरी यांनी उत्तर दिलं. पुणे-सातारा समस्या गंभीर आहे. हे खरे आहे. आर्थिक समस्या असल्यामुळे अडचणी आल्या. तसेच एनएचआयने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता तिथे चार पुल पूर्ण होणे बाकी आहेत. एक ब्रिज येत्या 25 दिवसात पूर्ण होईल. तर बाकी तीन पूल जूनपर्यंत पूर्ण होईल. या मार्गावरील सर्व समस्या येत्या सहा महिन्यात पूर्ण होतील, असे उत्तर गडकरी यांनी दिलं.