मुंबई -राज्य सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (maharashtra winter session 2021) येत्या ७ डिसेंबर २०२१ पासून नागपूर येथे प्रस्तावित आहे. मात्र, विविध कारणांमुळे हे अधिवेशन पुढे ढकलले जाण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले असून, त्याच्या स्थळाबाबत अद्याप निश्चिती नाही.
हेही वाचा -बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनापूर्वी पालिकेकडून स्मृतीस्थळाचे सुशोभीकरण
राज्य सरकारच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरपासून नागपूर (nagpur winter session) येथे प्रस्तावित आहे. त्यादृष्टीने नागपुरातील रवी भवन, विधान भवन आणि अन्य शासकीय इमारतींची रंगरंगोटी आणि डागडुजी सुरू आहे. त्यासाठी काढण्यात आलेल्या निविदांबाबतही जोरदार चर्चा झाली. मात्र, असे सर्व झाल्यानंतरही हिवाळी अधिवेशन नागपुरात व्हावे की मुंबईत? याबाबत महाविकास आघाडीतच मतमतांतरे दिसली. आता तर अधिवेशनच पुढे ढकलले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती विधानभवनातील सूत्रांनी दिली आहे.
का पुढे ढकलणार अधिवेशन?
हिवाळी अधिवेशन नागपूर (winter session nagpur) येथे घेऊन विदर्भातील जनतेच्या विविध प्रश्नांना न्याय द्यायचा, असा राज्य सरकारचा प्रघात आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून अधिवेशन नागपुरात घेण्यात येते. मात्र, यंदा हे अधिवेशन कोरोनाचे सावट कमी झाले असले तरी मुंबईत घेण्यात यावे, असे मत शिवसेनेने व्यक्त केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच झालेली शस्त्रक्रिया आणि येत्या १० डिसेंबर रोजी राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुका यांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन आठवडाभराने पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती विधानभवनातील सूत्रांनी दिली आहे.