मुंबई - पुढील ४८ तासांसाठी प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवस राहण्याचा इशारा दिला आहे. मुंबईत आज पुन्हा धुरकट वातावरण पुढील 48 तासांत उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड, तर विदर्भात नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट असू शकते. येत्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
शेकोट्या, गरम कपड्यांचा सहारा
सध्याच्या परिस्थितीत कडाक्याच्या थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक शेकोट्यांचा सहारा घेताना दिसत आहेत. हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीमुळे सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात गरम कपडे, कानटोपी, मफलर घालूनच बाहेर पडावे लागत आहे. गुलाबी थंडीचा आनंद घेत शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, पोलीस ग्राउंड वसमत रोड, जिंतूर रोड, नांदखेड रोड, गंगाखेड रोड तसेच अन्य भागात फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.
रब्बी पिकांना फटका
गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बीची पिके जोमात आली होती. मात्र, आता अधिकच्या थंडीमुळे रब्बी पिकांना चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय ज्वारीची कणसे भरली असून, त्यालाही या थंडीचा फटका बसणार आहे. शिवाय पहाटे पिकांवर दवबिंदू साचत असल्याने अनेक ठिकाणच्या पिकांसह फळबागांचे देखील नुकसान होणार आहे.
संसर्गजन्य आजारांची भीती
गेल्या 2 वर्षांपासून नागरिक कोरोनामुळे त्रस्त आहेत. त्यातच संसर्गजन्य आजारांना सध्याचे वातावरण पोषक असल्याचे दिसून येते. वातावरणात प्रचंड प्रमाणात गारवा निर्माण झाला असून, यामुळे सर्दी, खोकला, ताप आदी विकार बळावण्याची शक्यता आहे. ज्यामुळे नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती कमी होऊन कोरोना सारख्या आजाराला बळी पडण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर पडावे. वारंवार सॅनिटायझरचा वापर करावा, घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे, सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवून राहावे. तसेच, कोरोनाचे लक्षणे आढळल्यास तात्काळ रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात येत आहे.
हेही वाचा -Shirdi Sai Sansthan : साई संस्थानाचे विदेशी चलनाचे खाते गोठवले, लाखो रुपये अडकले