मुंबई -येत्या ४, ५ दिवस मान्सून राज्यात सर्वाधिक सक्रिय राहण्याची शक्यता. या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यातही काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काल मुंबई, ठाणे, पुण्यात पाऊस आला. पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचले आहे. नागरिकांना पाण्यातून वाट शोधणे कठीण झाले आहे.
हेही वाचा -Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये वांगी, वाटाणा, मिरचीचे दर वाढले, तर पातीच्या कांद्याचे दर गडगडले
या जिल्ह्यांना रेड अलर्ट - रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी 9 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी. तर पालघर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा 8 जुलैपर्यंत रेड अलर्टवर. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला 10 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान मुंबई शहरात पावसाचा जोर कायम असल्याने अंधेरी सबवे जलमय झाला आहे.
विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता -5 ते 8 तारखेला कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, 5 ते 8 जुलै 2022 दरम्यान दक्षिण गुजरात प्रदेशात आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 आणि 8 रोजी पश्चिम मध्य प्रदेश, 5, 8 आणि 9 रोजी विदर्भात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढचे ४,५ दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व इतर काही भागांत अती मुसळधार पावसाचे इशारे देण्यात आले आहे.
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग -मुंबईतील दहिसर, बोरिवली मालाड, कांदिवली, जोगेश्वरी, अंधेरी वांद्रे, दादर या इतर भागात मुसळधार पाऊस झाला. सलग तीन दिवसांपासून मुंबईत पाऊस पडत आहे. रात्रभर पाऊस पडला, तर मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबले. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे.
मुंबईमध्ये सोमवारपासून मुसळधार -मुंबईमध्ये सोमवारपासून मुसळधार पाऊस पडत ( Heavy Rain In Mumbai ) आहे. यामुळे काल अनेक सखल भागात पाणी साचले होते. काल मध्यरात्री पुन्हा मुसळधार पाऊस पडला. यामुळे पून्हा सखल भागात पाणी साचले. सकाळी पाऊसाने विश्रांती घेतली तसेच पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा निचरा होत आहे. याकारणाने मुंबईतील ट्रॅफिकवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. दुपारच्या दरम्यान मुंबईच्या रस्त्यावर कमी प्रमाणात वाहने दिसत आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा -या सर्वांबाबत हवामान विभागाचे अधिकारी जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोराचे वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पुढचे काही दिवस पडेल. या मुसळधार पावसाचा फटका मुंबई तसेच उपनगरासह मुंबईच्या आजूबाजूच्या कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. तसेच याचा काहीसा परिणाम उर्वरित महाराष्ट्रात देखील थोड्या प्रमाणात दिसेल. त्यामुळे मुंबई हवामान विभागाकडून या परिसरात काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा." असं आवाहन जयंत सरकार यांनी केल आहे.
हेही वाचा -Petrol Diesel Rates : राज्यात 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग.. जाणून घ्या आजचे पेट्रोल- डिझेलचे दर