मुंबई : हवामान विभागाने पाच दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात बरसत आहे. सुरुवातीस तळकोकणात असलेल्या मॉन्सूनने आता जवळपास संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. आगामी तीन दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता (Maharashtra Monsoon Updates ) आहे.
राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज -भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकतेच मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यामध्ये देशात यंदा १०३ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. जूनमध्ये राज्याच्या दक्षिण कोकण, मुंबई तसेच पश्चिम विदर्भाच्या काही जिल्ह्यांत कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. राज्यात १०१ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मुंबईत मॉन्सून स्थिरावला :मुंबईत शुक्रवारी (दि. 10 जून) रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबईत पाऊस ( Rain in Mumbai ) दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. गेल्या 24 तासात मुंबई शहर विभागात सर्वाधिक तर पूर्व उपनगरात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.