मुंबई -लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेणारे मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुरुवातीला विधानसभा निवडणुका लढवण्यास उत्सुक असल्याचे दिसले नाहीत. मात्र, पदाधिकारी आणि निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले पक्षातील नेते यांच्या आग्रहामुळे मनसे आता विधानसभेच्या रणांगणात उतरलेली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विधानसभा निवडणुकीतून आपल्या पक्षात आलेली मरगळ दुर करत राजकीय सीमोल्लंघन करणार का, हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा... शेवटी व्हायचं तेच झालं! भाजप-सेना युती तुटली? आता आमने-सामने लढाई
राष्ट्रवादी आणि मनसे छुपी युती ?
2014 ला नरेंद्र मोदी पर्यायाने भाजपला पाठिंबा देत प्रचार करणाऱ्या राज ठाकरेंनी, २०१९ च्या निवडणुकीत स्वपक्षाचा एकही उमेदवार नसताना फक्त भाजप विरोधात प्रचार केला. यासाठी राज्यभर सभा घेतल्या. या सर्व कालखंडात राज ठाकरे आणि शरद पवार यांची वाढती जवळीक हा सर्वांच्या चर्चेचा विषय बनला होता. यानंतर या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला आघाडीत घेण्याबाबत राष्ट्रवादीचा आग्रह होता, मात्र काँग्रेसच्या विरोधामुळे त्यांचा हा विचार बारगळला. यानंतर काही दिवसांत मनसेनेही 'एकला चलो रे'ची भुमिका घेतली.
राष्ट्रवादी आणि मनसेमधील स्नेह गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. त्यामुळे अनेक जागांवर राष्ट्रवादी आणि मनसेचे परस्पर सामंज्यस्य झालेले दिसते. त्याचा थेट फायदा दोन्ही पक्षांना होवू शकतो. ठाणे शहर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुहास देसाई निवडणूक लढवणार होते. मात्र, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. इथे राष्ट्रवादीची पूर्ण ताकद मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्या मागे उभी रहाणार आहे. त्याची परतफेड मुंब्रा-कळवा मतदारसंघात मनसेने उमेदवार न देता केली आहे. हाच पॅटर्न कल्याण ग्रामीणमध्येही पाहायला मिळाला आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीने आपला उमेदवारच उभा केलेला नाही. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला असून शिवसेनेकडून रमेश म्हात्रे यांना तिकीट देण्यात आलंय तर मनसेकडून राजू पाटील यांना उमेदवारी मिळालीय.