मुंबई -राज्यसभेच्या सहा जागांसाठी दहा जूनला निवडणुका होणार आहेत. मात्र, या सोबतच विधान परिषदेच्या दहा जागांसाठी 20 जूनला निवडणूक होणार ( Vidhan Parishad Election ) आहे. या निवडणुकीबाबतचा कार्यक्रम 2 जून रोजी घोषित करण्यात येईल. 9 जून पर्यंत या निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला आपले नामांकन भरता येणार आहे. तसेच, 13 जून पर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे या दहा जागांमध्ये कोणाची वर्णी लागेल, यासाठी प्रत्येक पक्षात लॉबिंग सध्या सुरू झालेली पाहायला मिळत आहे.
हे आमदार होणार निवृत्त - विधानपरिषद मधील 10 जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी भाजपातील विधान परिषदेवर आमदार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सदाभाऊ खोत तसेच दिवंगत नेते आर एस सिंह यांचा समावेश आहे. तर, शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते आणि आमदार दिवाकर रावते, मंत्री सुभाष देसाई हे निवृत्त होणार आहेत. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस कडून रामराजे निंबाळकर आणि संजय दौंड यांचाही कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे एकूण दहा आमदार यांचा कार्यकाळ संपणार आहे.