मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे 'इयत्ता दहावीचा परीक्षेचा सोमवार, दि. 23 मार्च रोजी होणारा पेपर रद्द करण्यात आला आहे. रद्द करण्यात आलेल्या पेपरची पुढील तारीख ३१ मार्चनंतर जाहीर करण्यात येईल' अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...VIDEO : 'ईटीव्ही भारत' कोरोना विशेष बुलेटिन...
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सध्या सुरू आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांचा भूगोल विषयाचा पेपर सोमवार, दि. 23 मार्च रोजी होणार होता. मात्र, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता, विद्यार्थ्यांना याचा संसर्ग होऊ नये, यासाठी हा पेपर रद्द करण्यात आला आहे. तसेच या पेपरची पुढील तारीख 31 मार्चनंतर जाहीर करण्यात येईल. अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन दिली.
आज राज्यभरात राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेचा इतिहासाचा पेपर होता. तो पेपर सकाळच्या सत्रात संपण्यापूर्वीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सोमवारी भूगोल विषयाचा असलेला पेपर तात्पुरता रद्द झाला आहे. दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आले असली तरी भूगोलाचा केवळ एकच पेपर शिल्लक असल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा...कोरोनाच्या प्रभावात राज्याची उपराजधानी लॉक डाऊन
मागील काही दिवसात महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना त्यासोबत राज्य शिक्षक परिषदआदी शिक्षक संघटनांनी दहावीची परीक्षा सीबीएसईच्या धर्तीवर पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात दिरंगाई केली असल्याचा आरोप संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे दहावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अगोदर घेण्याऐवजी पहिली ते आठवीचा परीक्षेचा निर्णय घेऊन आपल्या अकार्यक्षमतेचा दाखला शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिला असल्याचा आरोप शिक्षण तज्ज्ञांनी केला आहे.