मुंबई : राज्यातील विविध प्रकल्प कार्याला आता वेग आल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पायाभूत सुविधांवर अधिक भर देणारे राजकारणी म्हणून ओळखले जातात. देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला (Maharashtra Semi bullet train) पुन्हा एकदा गती दिली आहे. त्याचसोबत राज्यात महारेलच्या (Maharail ) माध्यमातून विविध प्रकल्प प्रस्तावित केले आहेत, तर काही प्रकल्पांचे काम प्रत्यक्षात सुरु झाले आहे. ( Mumbai Ahmedabad Bullet TrainProject )
सेमी बुलेट ट्रेन धावणार :नाशिक ते पुणे ( Pune Nashik Semi Bullet Train ) या 230 किलोमीटर मार्गावर लवकरच सेमी बुलेट ट्रेन धावणार आहे. सव्वाशे किलोमीटर प्रति तास या वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार असून; 230 किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन तासात पार केले जाईल, अशी माहिती महारेलचे वरिष्ठ अधिकारी दिलीप काशीद यांनी दिली. या रेल्वे प्रकल्पासाठी नाशिक ते पुणे दरम्यानच्या मार्गावरील भूमी अधिग्रहणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र कोरोनामुळे यात काही अडचणी आल्यामुळे प्रकल्पाला थोडा विलंब होण्याची शक्यता काशीद यांनी व्यक्त केली.
14 हजार कोटींचा प्रकल्प :पुणे नाशिक सेमी बुलेट ट्रेन प्रकल्प हा सुमारे 14000 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्याकडून प्रत्येकी 50 टक्के गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्राकडून 20% प्रत्यक्ष गुंतवणूक राज्याकडून 20% प्रत्यक्ष गुंतवणूक आणि 40% कर्जाच्या माध्यमातून पैसे उभारले जाणार असल्याचेही काशीद यांनी सांगितले.
शेतकरी व स्थानिक नागरिकांना प्रकल्पाचे फायदे :या बुलेट ट्रेन मार्गामुळे शेतकऱ्यांना शेजारील भागात आपली उत्पादने विकण्यासाठी उपलब्ध करून देता येणार आहेत. कृषी बाजार समिती येथे पोहोचण्यासाठी त्यांच्यासाठी हा वेगवान आणि सोपा पर्याय असणार आहे. सेमी बुलेट ट्रेनमुळे प्रवासी आणि मालवाहतूक जलद गतीने होणार आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी पुणे-नाशिक येथे स्थलांतरीत होण्याची गरज भासणार नाही. पुणे आणि नाशिक या दोन मोठ्या शहरांसोबत थेट कमी वेळेत संपर्क साधता येणार आहे. यामुळे केवळ रोजगाराच्या संधीचा विस्तार होणार नाही, तर वेळेची सुद्धा बचत होणार आहे. हा सेमी बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील प्रस्ताविक आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे कृषी आणि इतर मालवाहू उत्पादने थेट कार्गो टर्मिनल द्वारे पाठविले जाऊ शकतात. सिन्नर संगमनेर या भागात उत्पादित होणाऱ्या डाळिंब, दूध आणि अन्य कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. प्रकल्प बाधित क्षेत्रामध्ये 80 टक्के अन्नधान्य वाहतुकीस वाढ होण्याची शक्यता आहे. गोदाम आणि शीतगृहाची सुविधा आवश्यकतेनुसार स्थानकांवर विकसित होणार आहे. या प्रकल्पामुळे, प्रकल्प प्रभावी क्षेत्रामध्ये जमिनीच्या दरात सुद्धा वाढ होणार आहे. रोजगाराच्या दरात वाढ झाल्याने व्यवसाय, व्यापार, शिक्षण, आरोग्यसेवा आणि ईतर आवश्यक सेवांचा सर्वांगीस विकास होईल, असा दावाही काशीद यांनी केला.
कोणती असतील स्थानके?महारेल द्वारे या मार्गावर नियोजित रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये पुणे, हडपसर, मांजरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव भोरवाडी, आळेफाटा, बोटा, जांबुत, साकुर, अंभोरे, संगमनेर देवठाण, चास, दोढई, सिन्नर, मोहदारी, शिंदे, आणि नाशिक रोड मार्गावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे.
नागपूर -नागभीड, लातूर - नांदेड धावणार बुलेट ट्रेन :महारेल च्या वतीने राज्यात अन्य प्रकल्पही हाती घेण्यात आले असून या प्रकल्पांनाही वेग देण्यात येत आहे. नागपूर ते नागभिड या मार्गावर बुलेट ट्रेन चे काम सुरू असून 30 टक्के काम जवळपास पूर्ण झाले आहे. 83 किलोमीटर लांबीचा हा बुलेट ट्रेन मार्ग 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा उद्दिष्ट असून यासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर लातूर नांदेड या मार्गावरील बुलेट ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित असल्याचेही काशीद यांनी सांगितले.
हेही वाचा :Arvind Kejriwal : 'फक्त गुजरातची सत्ता ताब्यात द्या.. ३०० युनिट वीज मोफत देतो..', केजरीवालांचे नवे आश्वासन