महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'८० टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेट नाही, डीडी चॅनेलवर महाराष्ट्र राज्यासाठी १२ तासांचा स्लॉट द्यावा' - ऑनलाईन शिक्षण

महाराष्ट्रातील शहरी भागाचा काही अपवाद वगळता राज्यातील ग्रामीण भागातील ८० टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेट उपलब्ध नसल्याने ते शिक्षणापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने डीडी चॅनेलवर महाराष्ट्र राज्यासाठी १२ तासांचा स्लॉट द्यावा, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्राकडे केली आहे.

School Education Minister Varsha Gaikwad
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

By

Published : May 30, 2020, 10:59 AM IST

मुंबई - राज्यात कोरोनामुळे नियोजित वेळेत शाळा सुरू करणे शक्य दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा कार्यक्रम असला तरी त्यासाठी अनेक अडचणी आहेत. शहरी भागाचा काही अपवाद वगळता राज्यातील ग्रामीण भागातील ८० टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे केंद्र सरकारने डीडी चॅनेलवर महाराष्ट्र राज्यासाठी १२ तासांचा स्लॉट द्यावा, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना एक पत्र लिहून केली आहे.

राज्यात ज्या विद्यार्थ्यांकडे डिजीटल अभ्यासक्रमांसाठी योग्य प्रकारचे मोबाईल आणि इतर सुविधा नाही, तसेच जे ग्रामीण आणि दूर्गम भागात राहतात, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्हाला हा वेळ हवा असल्याचे गायकवाड यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या १२ तासात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात येईल. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले नाही पाहिजे, म्हणून राज्य शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका अहवालाने राज्य शिक्षण विभागाची झोप उडवली आहे. ग्रामीण भागातील २० टक्के विद्यार्थीच शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन क्लासेसचा फायदा घेत असल्याची माहिती उघडकीस आली होती. त्यामुळे ८० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी त्यांना मोफत आणि सुलभ पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देण्याचे राज्य शिक्षण विभागाने ठरविले असून त्यासाठी आम्हाला डीडीवर अधिकचा वेळ हवा, अशी मागणी शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केली आहे.

दीक्षा ॲपची कमतरता -
यासोबतच आकाशवाणीच्या मुख्य केंद्रातून प्रसारित होत असेलल्या रेडिओवर दोन तास देण्याची मागणीही गायकवाड यांनी केली आहे. आम्ही शिक्षणासाठी दीक्षा अॅप तयार केले आहे, मात्र ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नाही, अशी कबुली गायकवाड यांनी आपल्या या पत्रात दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details