मुंबई : राज्यातील खासगी शाळांकडून घेण्यात येणाऱ्या शुल्काबाबत गेल्या अनेक दिवसापासून पालक संघटना आक्रमक झाल्या होत्या. विशेष म्हणजे, कोरोना काळात खासगी शाळांकडून अतिरिक्त शुल्क घेत असल्याने पालक संघटनांकडून महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियममध्ये सुधारण्याची मागणी करण्यात आलेली होती. त्याची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने खाजगी शाळांमधील शुल्काबाबत महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियमांमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी पालक, पालक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून सूचना मागवल्या आहेत.
पालकांच्या होत्या तक्रारी..
खाजगी शाळांमधील शुल्काबाबत शासनाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम २०११ व महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) नियम-२०१६ तसेच महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) (सुधारणा) अधिनियम २०१८ तयार केलेले आहेत, या अधिनियमांची/नियमाची अंमलबजावणी करताना प्रशासकीय स्तरावर अडचणी येतात. तसेच दरवर्षी शाळातील शुल्काबाबत पालकांच्या सातत्याने तक्रारी शासनाकडे येत आहेत.