मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Heavy Rain ) सुरू आहे. हवामान खात्याने कालच ( Rain monsoon Update ) माहिती दिली होती की, राज्यात आणखी चार ते पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच, विदर्भाला सावधानतेचा इशारा देण्यात ( Vidarbha was also alerted ) आला होता. त्याचबरोबर जोराच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणेच विदर्भात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. नदीनाल्यांना पूर आला आहे. त्याचबरोबर हजारो एकर शेतीला याचा फटका बसला आहे.
राज्यातील घाटभागातील पावसाचा आढावा : महाराष्ट्रातील पश्चिम घाट भागात अंशतः ढगाळ आकाश. कर्नाटक आणि उत्तर केरळच्या किनारपट्टीवर दाट ढगांची स्थिती राहणार आहे. विदर्भासह महाराष्ट्राच्या आतील भागात विखुरलेले कोरडे ढग पाहायला मिळतील. परंतु, जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबईसह उपनगरात पडतोय संततधार पाऊस : गेल्या आठवड्यात मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये संततधार पाऊस सुरू ( Mumbai rains update news ) आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने काहीशी विश्रांती घेतलेली पाहायला मिळाली. अधूनमधून पावसाच्या सरी मुंबईवर बरसत असल्या तरी, राज्याच्या विविध भागांमध्ये होत असणाऱ्या मुसळधार पावसाच्या तुलनेने मुंबई पावसाची संततधार नव्हती. मात्र, पुढील दिवसांत पुन्हा एकदा मुंबई, मुंबई उपनगरात आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील ह्या जिल्ह्यांत सुरू आहे जोराचा पाऊस :अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. नदी-नाल्यांना पूर आला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर हजारो एकर शेतीला याचा फटका बसला आहे. वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सहा तालुके बाधित झाले आहेत. पाहूयात कोणकोणत्या जिल्ह्यांना फटका बसलाय.
वर्धा :वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सहा तालुके बाधित झाले आहेत. यामध्ये वर्धा, आर्वी, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर हे तालुके बाधित झाले आहेत. पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील एकूण 61 गावं बाधित झाली आहेत. पुरामुळे बाधित कुटुंबाची संख्या 1 हजार 303 इतकी आहे. तर 835 गावातील शेतीचं नुकसान झालं आहे. 63 हजार 325 हेक्टर वरील शेती बाधित झाली आहे. हजारो नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
अकोला :अकोला जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरूच असून नदीनाल्यांना पूर आला आहे. अकोट, अकोला, तेल्हारा, बाळापुर, मूर्तिजापुर बार्शीटाकळी आणि पातुर या तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाचे थैमान; सर्वच नदी-नाल्यांना पूर... 30 हजार एकर शेतीला फटका बसला आहे असा प्राथमिक अंदाज आहे. अनेक मुख्य रस्ते पुरामुळे बंद झाले आहेत. अकोला-दर्यापूर रस्ता बंद; म्हैसांगच्या पूर्णा नदीला पूर, पुलावरून पाणी. अंदुरा-अकोट-शेगाव मार्ग पूर्णपणे बंद; अकोट-अकोट मुख्य रस्ताही बंद. गांधीग्रामच्या सात ते आठ फूट पुलावरून पाणी अकोला : गांधीग्राम पुलावरुन 7 ते 8 फूट पाणी; अकोट-अकोला रस्ता बंद
अकोला जिल्ह्यातील पूर्णा नदीला पूर : अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम येथील पूर्णा नदीला मोठा पूर आला, या पुलावरून पाणी जात असल्याने अकोट-अकोला आणि अकोला-अकोट मार्ग बंद झाला. हा अकोला शहर आणि अकोट तालुक्याला जोडणारा मार्ग आहे. नागरिकांनी सदर मार्गावर प्रवास टाळावा जेणेकरून आपल्याला होणारा त्रास टाळता येईल. असे आवाहन दहिहांडा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत यांनी केलं आहे. जसे जसे पाण्याचे प्रवाह कमी होईल तसं तसं पाणी खाली जाणार अन् मार्ग पुन्हा सुरु होणार असेही ते बोलले. दरम्यान, अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुकामधील पुर्णा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे उंची 30 सेमीने उघडले आहे.
धरणातून विसर्ग चालू आहे : यातून विसर्ग 193 घ.मी.प्र.से. पाणी पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे आता अकोल्यातील गांधीग्रामच्या पूर्णा नदी पुलावरून तब्बल सात ते आठ फूट पाणी वाहत. सध्या प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागपूर : सखल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील नांद गावात सोमवारी दिवसभर दमदार पाऊस झाला. त्यानंतर गावातील सखल भागातील काही घरांमध्ये पाणी शिरलं. चिखलयुक्त पाणी घरात शिरल्यामुळे लोकांचं मोठं नुकसान झालं आहे. नांद ग्रामपंचायतीने सुमारे दीडशे लोकांना समाजभवनात हलवले आहे.
अमरावती :भातकुली-दर्यापूर मार्ग सुरू आहे. वाहतूक धीम्या गतीने सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील पेढी नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीला पूर आल्याने अमरावती-भातकुली-दर्यापूर हा मार्ग सोमवारी दिवसभर बंद झाला होता. तसेच पुराचे पाणी भातकुली गावातील घरं आणि शेतात शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. आज सकाळपासून पुन्हा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अमरावती-भातकुली-दर्यापूर मार्ग आज सकाळी सुरू झाला असून काही ठिकाणी रस्ते खचल्याने वाहतूक मात्र धीम्या गतीने सुरू आहे.
अमरावतीच्या पेढी नदीला पूर : संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील 25 ते 30 वृद्धांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. अमरावतीत सोमवारी पेढी नदीला पूर आल्याने वलगाव जवळील पेढी नदीला लागून असलेल्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील 25 ते 30 वृद्धांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं. सोमवारी अमरावती जिल्ह्यात संततधार पावसाने पेढी नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांना याचा मोठा फटका बसला. सोमवारी सायंकाळी पावसाने मेळघाट वगळून विश्रांती घेतली पण आज सकाळपासून परत जिल्ह्यात कुठं रिमझिम तर कुठं संततधार पाऊस सुरु झाला आहे.
भंडारा : पुरामुळे बेटावर अडकलेल्या सहा जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. मासेमारीकरता गेलेले सहा तरुण पुराच्या पाण्यात नदीच्या मधोमध बेटावर अडकले. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी येथील पाथरी येथे घडली. त्याच्या बचावासाठी SDRF चे एक चमू पाचरण करण्यात आलं, त्यानंतर त्यांची सुखरूप सुटका झाली आहे.
बुलढाणा : पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचं मोठं नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीच्या पात्रातील पाणी नदीकाठच्या शेकडो एकर शेतीत घुसल्याने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. नदीकाठच्या सोयाबीन, कापूस इत्यादी पिके पाण्याखाली गेली आहेत. अजूनही अकोला, अमरावती जिल्ह्यातील धरणातील विसर्ग पूर्णा नदीत सोडण्यात येत आहे. पुराची पाणीपातळी वाढत असल्याने धोका वाढला असून शेतीचं नुकसान वाढणार आहे. गेल्या आठ तासांपासून जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी मात्र पूर परिस्थिती वाढती आहे.
विदर्भाला दिले आहेत मुसळधार पावसाचा इशारा :विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपुरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे. तर आज अकोला आणि अमरावतीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील (Vidarbha) नागपूरमध्ये रविवारी पावसाने दिवसभर उसंत घेतल्यानंतर त्याच रात्री मात्र शहराला चांगलेच झोडपले होते. मात्र सोमवारी सकाळपासून पुन्हा थोड्या थोड्या वेळाच्या विश्रांतीनगर पावसाची रिपरिप सुरु होती. दरम्यान, महानगरपालिकेने नियोजन केले नसल्याने शहरातील रस्ते जलमय झाले तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याचं चित्र पाहायला मिळालं.
हेही वाचा : Pedhi River Flooded Due to Heavy Rains : अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पेढी नदीला पूर, अनेक गावांचा तुटला संपर्क