मुंबई -शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाव न घेता पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 'एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वत:चे कर्तृत्व समजू लागतो. त्या दिवसापासून त्याच्या ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो,' असे ट्विट राज ठाकरेंनी केले ( Raj Thackeray Reaction Uddhav Thackeray ) आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषेत राज ठाकरेंनी हे ट्विट केलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आणि अपक्ष आमदारांसोबत बंडखोरी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले होते. म्हणून अखेर बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.
रुग्णालयातून घरी परतले - दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवेळी राज ठाकरे रुग्णालयात दाखल होते. त्यांच्यावर हिपबोनची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर आता राज ठाकरेंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून आल्यावरच राज ठाकरेंनी राजकीय घडमोडींवर भाष्य केलं आहे.
भोंग्याप्रकरणी कार्यकर्त्यांची केली धरपकड -राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या कारभारावर टीकास्त्र डागले होते. तसेच, भोंग्याच्या वादाप्रकरणी मनसैनिकांची धरपकड करण्यात आली होती. तेव्हा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. महाराष्ट्र राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. सहनशीलतेचा अंत पाहू नका, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी येत नाही, उद्धवजी तुम्हीही नाही!, अशी टीका राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केली होती.
हेही वाचा -Mumbai High Court : "आठ बंडखोर मंत्र्याविरोधातील याचिका राजकीय हेतूनं प्रेरित; सुनावणी हवी असल्यास..."