मुंबई- मागील निवडणुकांच्या तुलनेत यंदा राज्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. सन 2014 मध्ये तृतीयपंथी मतदारांची एकूण संख्या 972 होती. यंदा या संख्येत भर पडली असून, राज्यात 2 हजार 593 तृतीयपंथी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी ही आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या आखेरीस नोंद केलेल्या मतदारांची एकूण संख्या 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 आहे. यामध्ये 4 कोटी 64 लाख 37 हजार 841 पुरुष मतदार असून, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार तृतीय पंथियांची 2 हजार 593 मतदार आहेत. 2014 मध्ये ही आकडेवारी केवळ 972 होती.