मुंबई -गेल्या आठवडाभरात राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं बघायला मिळालं. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. तर काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. दरम्यान, कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती, त्या ठिकाणी पाणी हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे.
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, कर्नाटक आणि उत्तर केरळ किनारपट्टीजवळ हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात अनेक भागात पावसाने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यामध्ये पूर आल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेतीला देखील मोठा फटका बसला आहे. विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यात गंभीर स्थिती झालीी आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली या भागात देखील पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे.
बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी -बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. इतर ठिकाणी कुठेही पाऊस झालेला नाही.
वर्धा जिल्ह्यात पावसाचा जोर कमी - गेल्या आठवडाभरापासून वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणचे मार्ग ठप्प झाले आहेत. कालपासून पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे.
कोल्हापुरात पुराचा धोका टळला - गेल्या आठवडाभर कोल्हापूर जिल्ह्यात आणि शहरात पावसाने धूमशान घातल्यावर पावसाचा जोर कमी होऊ लागला आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये पुराचा धोका टळला आहे. पंचगंगा नदी स्थिर पातळीवर राहिल्यानंतर आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. दिलासादायक म्हणजे अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला होता. अलमट्टीतून दीड लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा जोर ओसरू लागला असला, तरी अजून जिल्ह्यामधील 61 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच कमी राहिल्यास पाणी वेगाने कमी होण्याची शक्यता आहे.