मुंबई -मुंबईमध्ये जूनपासून पाऊस पडतो. पावसाळा सुरु झाला की पडझडीच्या घटनांचे सत्र सुरु होते. यात अनेकांचा मृत्यू होतो, काही जखमी होतात. पहिल्याच पावसांत वांद्रे येथे घर कोसळून एकाचा मृत्यू झासा. त्यानंतर काही दिवसांतच कुर्ला येथे तीन मजली इमारत कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला. या घटना ताज्या असतानाच सायन चुनाभट्टी येथे एका चाळीवर दरड कोसळून ३ जण जखमी झाले आहेत.
Maharashtra Rain Live : चुनाभट्टीत चाळीवर दरड कोसळली, ३ जण जखमी - ठाणे पाऊस अपडेट
18:32 July 06
चुनाभट्टीत चाळीवर दरड कोसळली, ३ जण जखमी
18:24 July 06
कोस्टर भागात ऑरेंज ते रेड अलर्टची ; एनडीआरएफच्या 17 टीम तयार
पुणे - गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस ( Torrential Rain ) सुरू आहे. आयएमडीच्या रिपोर्ट नुसार राज्यातील कोस्टर भागात ऑरेंज ते रेड अलर्ट ( Red alert ) ची सूचना देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या ( NDRF ) 17 टीम तयार करण्यात आल्या आहे. यातील 5 टीम मुंबईत,दोन दोन टीम कोल्हापूर,रत्नागिरी,ठाणे,तसेच रायगडला पाठविणार आहेत. तर एक-एक टीम पालघर, सिंधुदुर्ग, तसेच साताऱ्यात तैनात करण्यात आली आहे. अशी, माहिती 5 बटालियन एनडीआरएफ कमाडींग ऑफिसर एसएच अनुपम श्रीवास्तवा यांनी दिली आहे.
17:14 July 06
रामायणकालीन इतिहासाची साक्ष देणारा सहस्रकुंडचा धबधबा कालच्या पावसाने खळखळला
नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील इस्लापूर पासून ४ कि.मी.अंतरावर असलेला सहस्रकुंड धबधब्याचे मनोहारी दृश्य प्रती वर्षी पावसाळ्यात पहावयास मिळते. चार दिवसापूर्वी झालेल्या पहिल्या पावसाच्या हजेरीने धबधब्याच्या दोन्ही धारा थोड्या प्रमाणातच का होईना सळसळ करत वाहू लागल्या होत्या.
16:14 July 06
पुण्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर, धरणांच्या पाणी पातळीत वाढ
पुणे : जिल्ह्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यानं धरणाच्या पाणी पातळीने तळ घाटला होता, मात्र मागच्या दोन दिवसापासून पाणलोट क्षेत्रात पावसाने जोर पकडल्यानं धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.त्याचं बरोबर शेतात पेरणी केलेल्या भात आणि कडधान्य पिकांना पाऊस फायदेशीर ठरत असल्यानं शेतकरी आणि नागरिकांच्यात समाधानाचं व्यक्त करत आहेत.
13:53 July 06
धुळे जिल्ह्यात केवळ ७९.४ टक्के पाऊस
यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस असेल या हवामान विभागाच्या अंदाजानं शेतकऱ्याला दिलासा मिळाला खरा मात्र तो क्षणिक ठरला. जून महिन्यात धुळे जिल्ह्यात केवळ सहा दिवस पाऊस झालाय. गेल्या वर्षी धुळे जिल्ह्यात जून महिन्याची जिल्ह्याची पर्जन्यमानाची सरासरी पाहता साधारण ९० टक्के पाऊस झाला होता. मात्र यंदा केवळ ७९.४ टक्के पाऊस झाला. याचा परिणाम शेतीवर होऊन यंदा धुळे जिल्ह्यात जून अखेर ३५ टक्केच पेरणी झाली आहे.
13:47 July 06
साचलेल्या पाण्याचा निचरा लवकर हेच आमचे यश - किशोरी पेडणेकर
मुंबईत सलग पाऊस पडत आहे. पाणी साचले तरी त्याचा निचरा कमी वेळात झाला आहे. गेल्या ५ वर्षात जे काम केले त्याचे यश आता दिसत आहे. पाणी साचणार नाही असा कधीही दावा केला नाही, पण पाण्याचा निचरा कसा होईल हे पाहणे गरजेचे आहे. आम्ही केलेल्या कामाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी स्वागत केले आहे. मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळेल असे काम आम्ही करत आहोत, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
13:40 July 06
कराडमध्ये एनडीआरएफची टीम दाखल
सातारा - सातारा जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला असून पाटण तालुक्यात सध्या पावसाची संततधार आहे. कोयना नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी एनडीआरएफची टीम कराडमध्ये दाखल झाली आहे. या टीममध्ये ३ अधिकारी आणि २२ जवान आहेत. तसेच त्यांच्याकडे ४ रबरी बोटी, लाईफ जॅकेटस आहेत. कराड आणि पाटण तालुक्यातील संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी ही टीम सज्ज राहणार आहे.
12:57 July 06
एनडीआरएफच्या 17 टीम तयार
पुणे- गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. आयएमडीच्या रिपोर्टनुसार राज्यातील कोस्टर भागात ऑरेंज ते रेड अलर्टची सूचना देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या 17 टीम तयार करण्यात आल्या आहेत. 5 टीम या मुंबईत, प्रत्येकी दोन टीम या कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे,आणि रायगड या ठिकाणीआहेत. तर प्रत्येकी एक टीम या पालघर,सिंधुदुर्ग आणि साताऱ्यात तैनात करण्यात आली आहे. अशी माहिती 5 बटालियन एनडीआरएफ कमाडींग ऑफिसर एसएच अनुपम श्रीवास्तव यांनी दिली आहे
10:37 July 06
पुणेकरांची पाण्याची मिटणार चिंता
पुणे- पावसाने दिलेली ओढ आणि पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण साखळीत कमी झालेला पाणीसाठा, यामुळे पुणेकरांना एक दिवसा आड पाणी देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. त्यामुळे पुणेकरांना पाण्याची चिंता होती. गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे.
10:23 July 06
वसई विरार शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली, रस्त्यांना नदीचे स्वरूप
वसई- सलग दुसऱ्या दिवसी मुसळधार पावसाने सातत्य कायम ठेवल्याने वसई-विरारमधील सखल भागांत पाणी पाणी साचलेले पहायला मिळाले. विरार पश्चिमेचा विवा कॉलेजजवळचा परिसर, तिरुपती नगर, बोळींज-जकात नाका नेहमीप्रमाणेच पाण्याखाली गेला. तर नालासोपारा आचोळे रोड, सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी आणि अन्य परिसरात पुन्हा पाणी साचल्याने नागरिकांच्या त्रासात भर पडली. नालासोपारा अवधूत नगर, शिवाजी नगर, संभाजी नगर आणि परिसरातील औद्योगिक परिसरातही या पावसाचे परिणाम दिसून आले.
09:14 July 06
चोवीस तासात कोयना धरणातील पाणीसाठ्यात पावणे दोन टीएमसीने वाढ
सातारा- कोयना धरणात प्रति सेकंद 21, 232 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे चोवीस तासात कोयना धरणातील पाणीसाठ्यात पावणे दोन टीएमसीने वाढ झाली आहे. चोवीस तासात कोयनानगर येथे 156 मिलिमीटर नवजा येथे 244 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 197 मिलीमीटर पावसाची नोंद आहे.
09:11 July 06
पावसामुळे वाहतुकीत बदल, १० ठिकाणी बेस्टचे मार्ग वळविले
मुंबई- मुंबईत सोमवारपासून मुसळधार पाऊस पडला यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. आज सलग दुसऱ्या दिवशीही मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे रस्ते वाहतूक मंदावली असून १० ठिकाणी बेस्टचे मार्ग वळवण्यात आले आहेत. ५ जुलै सकाळी ८ ते ६ जुलै सकाळी ८ या २४ तासात शहर विभागात १०७, पूर्व उपनगरात १७२ तर पश्चिम उपनगरात १५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेच्या कुलाबा ९१.८७, भायखळा ९४.४७, दादर १५०.३३, गांधी मार्केट १७१.४१, हिंदमाता १५६.६५, अंधेरी येथे १२९.४९, बोरिवली १४२.७, दहिसर १७०.९१, दिंडोशी १४७.७४, भांडुप १२१.६२, घाटकोपर १६३.८३, गोवंडी १५१.०६, कुर्ला १४६.०४, चेंबूर १६८.३७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
08:49 July 06
काजळी नदीच्या पुराचा देवस्थानाला फटका, लांजा तालुक्यातील दत्तमंदिर पाण्याखाली...
रत्नागिरी मुसळधार बरसणाऱ्या पावसाने आज सकाळपासून काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. मात्र, गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तसेच नद्यांना आलेल्या पुरामुळे आजही शहर किंवा ग्रामीणचा काही भाग पाण्याखाली आहे.
08:02 July 06
मुंबईत काही भागात सकाळच्या सुमारास पावसाची विश्रांती
मुंबई - सलग दोन दिवस मुक्काम ठेवून मुंबईला झोडपून काढलेल्या पावसाचा जोर आज सकाळच्या सुमारास थोडा ओसरला. मात्र अधूनमधून पावसाची रिमझिम सुरुच होती. याचा तितकासा परिणाम जाणवला नाही. मध्य व पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत होती.
07:54 July 06
कोंडेश्वर धबधब्यासह बारवी धरण परिसरात पर्यटकांना बंदी
ठाणे - पर्यटनस्थळे, नदी किनारा, धबधबा येथे पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अंबरनाथ तालुक्यतील कोंडेश्वर परिसर तसेच बारवी धरण परिसरात तीन किलोमीटर हद्दीत 4 जुलै ते 31 जुलै पर्यटकांना बंदी घालण्यात आल्याचे आदेश अंबरनाथ तहसीलदारांनी दिले आहे.
07:05 July 06
कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल
संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी रात्री सव्वा 9 च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली.
07:02 July 06
पवई तलाव भरुन वाहू लागला...
मुंबई - मुंबईत गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव काल ५ जुलैला सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे.
06:53 July 06
नवी मुंबई विमानतळाच्या भराव कामामुळे पूरपरिस्थिती; गावात शिरले पाणी
नवी मुंबई -सततचा मुसळधार पाऊस आणि नवी मुंबई विमानतळ कामासाठी करण्यात आलेला भराव यामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात दीड ते दोन फूट पाणी शिरले आहे. घरात पाणी घुसल्यामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून डुंगी गावात पाणी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
06:49 July 06
दहिसरमधील खदानमध्ये पडून तरुणाचा मृत्यू, दुसऱ्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू
मुंबई- दहिसर पू येथील वैशाली नगर मधील सुहासिनी पावसकर मार्गवर असलेल्या खदानात दोन तरुण पडल्याची घटना रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. त्यातील एकाच मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दुसऱ्या बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे.
06:20 July 06
Maharashtra Mumbai Rains Live Updates : धुळे जिल्ह्यात केवळ ७९.४ टक्के पाऊस
मुंबई-भारतीय हवामान विभागाने ( IMD prediction on rain ) मुंबई, कोकणसह अमरावतीत अलर्ट जारी केल्याप्रमाणे मुसळधार पाऊस झाला. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी मुंबई आणि महाराष्ट्राच्या ( Mumbai and Maharashtra rain ) काही भागांमध्ये लावली. मुंबईतही पहाटेपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सकाळी कार्यालयाला पोहोचणार्या चाकरमान्यांना कसरत करावी लागली. गेली 2 दिवस मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही आज पावसाची धुवांधार बरसात सुरूच ( Kokan rain update ) आहे. हवामान खात्याने जिल्ह्यात 7 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीही कमालीची वाढ झालेली आहे.
ठाणे जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी पावसाने ( Thane rain update ) झोडपले. शहरात देखील पावसाने मध्यरात्री पासून जोरदार हजेरी लावली होती. शहरात सुमारे १३५.४३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी जिल्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला असल्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास धो धो पावसाने सुरुवात केली. कळवा खारेगांव येथे असलेल्या चाळीजवळ पाणी साचले होते.