पुणे दहशतवादी विरोधी पथकाने दहशतवादी फंडिग प्रकरणी अटक केलेल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ३ जून पर्यंत १० दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे दहशतवादी विरोधी पथकाने आज सकाळी जुनेद मोहोम्मद या १८ वर्षीय तरुणाला दहशतवादी फंडिग पुण्यातील दापोडी परिसरातून अटक करण्यात आली होती.
Maharashtra Live Breaking News; दहशतवादी फंडिग प्रकरण, आरोपीला ३ जून पर्यंतची पोलीस कोठडी
18:53 May 24
दहशतवादी फंडिग प्रकरण, आरोपीला ३ जून पर्यंतची पोलीस कोठडी
16:31 May 24
कुशिवली धरण मोबदल्यात कोट्यवधींचा घोटाळा; ४ गुन्हे दाखल,२५ आरोपी अटक
बनावट कागदपत्रांच्या आधारे कुशिवली धरणातील प्रकल्पग्रस्तांचे कोट्यवधी रुपये लाटल्याच्या प्रकार समोर आला आहे. काहींनी बनावट ओळखपत्रांच्या आधारे बोगस शेतकरी तयार करून कोट्यवधी रुपये लाटले आहेत. कुशिवली धरणासाठीच्या १८ कोटी रुपयांच्या रक्कमे पैकी ११.५१ कोटी वाटप करण्यात आले आहेत. यामध्येच काहींनी बनावट कागदपत्र सादर करून हि रक्कम लाटल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल झाले असून २५ जणांना अटक करण्यात आली आहे.
15:30 May 24
परतूर नगर पालिकेचा कारनामा गल्लीचं नाव 'पाकिस्तान गल्ली'
जालन्यातील परतुरमध्ये एका गल्लीचे नाव चक्क पाकिस्तान गल्ली असे समोर आले आहे. परतूर नगर पालिकेच्या मालमत्ता कर आकारणीच्या पावतीत हा प्रकार समोर आला. सध्या परतूर नगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. त्यातच परतुरमध्ये पाकिस्तान गल्ली असल्याचा उल्लेख पालिकेच्या वतीने देण्यात आलेल्या मालमत्ता कर आकारणीच्या पावतीत समोर आल्याने संतापाची लाट उसळली आहे.
14:41 May 24
तारकर्ली समुद्रकिनारी पर्यटकांना घेऊन गेलेली बोट बुडाली दोघांचा जागीच मृत्यू
मालवण तारकर्ली समुद्रकिनारी 20 पर्यटकांना घेऊन गेलेली बोट बुडाली आहे. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर चार पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे. मालवण शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पर्यटक स्कुबा डायविंग साठी गेले असता हा अपघात घडला. खराब हवामानामुळे बोट बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.
13:21 May 24
पंजाब सरकारची मोठी कारवाई, आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना मंत्रिपदावरून हटवले
चंदिगड -पंजाब सरकारची मोठी कारवाई आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना मंत्रिपदावरून हटवले. एक टक्का कमिशन मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता
11:41 May 24
जुनेद मोहोम्मद या तरुणाला दापोडी परिसरातून अटक
पुणे - दहशतवादी विरोधी पथकाकडून जुनेद मोहोम्मद या तरुणाला दापोडी परिसरातून अटक केली आहे. काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून फंडींग झाल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पुणे न्यायालयात आज दुपारी त्याला हजर करणार आहेत.
11:35 May 24
कारसेवेचा विषय काढून देशात आणि राज्यात शांतता बिघडवण्याचा प्रयत्न - दिलीप वळसे पाटील
मुंबई - कारसेवेचा विषय काढून देशात आणि राज्यात शांतता बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. जर अशी काही कृती केली गेली तर मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज पत्रकार परिषदेत सांगितले. शरद पवार कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत तर ब्रीजभूषण हे त्यांच्या राज्यातली कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे सध्या मनसेने शेअर केलेला फोटो जुना आहे. जाणीवपूर्वक असे फोटो व्हायरल करत आहेत असेही पाटील म्हणाले. किरीट सोमैया यांच्या आरोपात तथ्य वाटत नाही, ते जास्त गांभीर्याने घ्यायची गरज नाही असेही पाटील म्हणाले. मंदा म्हात्रे यांनी एक पत्र मला दिलं आहे. मी त्या पत्रावरुन चौकशी करण्याचे आदेश डीजींना दिले आहेत. त्याचा चौकशी अहवाल प्राप्त होईल आणि जर त्यात तथ्य आढळल तर कारवाई केली जाईल असेही ते म्हणाले.
11:09 May 24
संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता
संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. संभाजीराजे यांची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. संभाजीराजे काही केल्या शिवबंधन बांधणार नाहीत अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीची अपक्ष उमेदवारी मिळावी यासाठी संभाजीराजे प्रयत्नशील आहेत. तसं झालं नाही तर शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून संभाजीराजे हे उमेदवारी घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आज संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची भेट होण्याचीही शक्यता आहे. आजच्या भेटीनंतर संभाजीराजे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होवू शकते असेही समजते.
10:25 May 24
भाजप खासदार बृजभूषण सिंह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एकत्र, मनसेने केला सूचक फोटो ट्विट
मुंबई - मनसेकडून एक फोटो शेअर करण्यात आला असून, त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडवा विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) एकत्र दिसत आहेत.
10:01 May 24
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्येच - हसिनाच्या मुलाची माहिती
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराची, पाकिस्तानमध्ये आहे. त्याची बहीण हसिना पारकरचा मुलगा अलीशाह पारकरने ही माहिती ईडीला दिली आहे. ईडीला हे देखील सांगितले आहे की, तो तसेच त्याचे कुटुंब दाऊदच्या संपर्कात नाही. दाऊदची पत्नी मेहजबीन सणांच्यावेळी त्याच्या पत्नी आणि बहिणींशी संपर्क साधते, असेही त्याने सांगितले.
08:03 May 24
कर्नाटकातील हुबळीजवळ अपघातात महाराष्ट्रातील ८ जणांचा मृत्यू
हुबळी :ट्रक आणि खासगी बस यांच्यात झालेल्या धडकेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर किमच्या रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला आहे.
या अपघातात 26 जण जखमी झाले असून त्यांना हुबळी येथील किमबॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरहून बेंगळुरूला जाण्यासाठी खासगी बसने निघाल्याचे सांगण्यात येत आहे. यातील ७ मृत हे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
07:18 May 24
क्वाड समिटमध्ये पंतप्रधान मोदींसह इतर देशांच्या प्रमुखांची हजेरी
टोकियो - पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा टोकियोमध्ये क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी झाले. यावेळी अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. तसेच विविध सामंजस्य करार होतील.
06:47 May 24
महाराष्ट्रात 66 हजार रोजगार निर्माण होतील - आदित्य ठाकरे
डावोस - मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० कार्यक्रमात महाराष्ट्राला मोठे यश मिळाल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन दिली आहे. त्यांनी "आजचे मोठे यश @WEF #Davos2022. USD 4 अब्ज (INR 30k cr) किमतीच्या एकूण 23 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली ज्यामुळे महाराष्ट्रात 66 हजार रोजगार निर्माण होतील" असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
06:29 May 24
1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना सीबीआय कोठडी
मुंबई - सीबीआयने 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना गुजरात एटीएसकडून ताब्यात घेतले आहे. त्यांना काल न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली.
06:22 May 24
Maharashtra Live Breaking News
पुणे -नागफणी पीक ट्रेकवरून २० मे रोजी बेपत्ता झालेल्या दिल्लीस्थित फरहान सिराजुद्दीनचा शोध सुरू आहे. लोणावळ्यात त्याचा रस्ता चुकल्याचा अंदाज आहे. पुणे ग्रामीण पोलिस डीएसपी म्हणाले, "२० मे पासून व्यापक शोध मोहीम सुरू आहे. हा घनदाट जंगलाचा परिसर असून दृश्यमानता कमी आहे, त्यामुळे शोधकार्यात अडथळा येत आहे."