मुंबई -विधान परिषद निवडणूक ( Legislative Council ) उद्या (सोमवार) होणार आहे. या निवडणुकीकरीता शिवसेना ( Shivsena ), काँग्रेस ( Congress ) , राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) महाविकास आघाडी आणि भाजपने ( BJP ) आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र, आतापर्यंत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचे निकाल पाहता अनेकदा धक्कादायक निकाल लागले आहेत. या धक्कादायक निकालांची परंपरा ( Tradition Of Defeating Result ) कायम राहणार का असा प्रश्न अनेक जाणकारांना पडला आहे. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणूक असो यामध्ये अनेकदा धक्कादायक निकाल समोर आले आहेत या निकालांमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असो किंवा विद्यमान परिवहन मंत्री अनिल परब असो अशा दिग्गजांना पराभव पत्कारावा लागला होता. त्यामुळे या निवडणुकीत देखील ही परंपरा कायम राहणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
धक्कादायक निकालांची परंपरा - विधान परिषद निवडणुकीमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे अवघ्या 0.59 मताने पराभूत झाले होते. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला मिळालेली कलाटणी, मतांच्या फाटाफुटीमुळे शेकापचे गणपतराव देशमुख यांचा पराभव, विजयी उमेदवारापेक्षा पहिल्या पसंतीची अधिक मते मिळूनही विद्यमान परिवहनमंत्री अनिल परब यांचा झालेला पराभव किंवा पुरेशी मते असतानाही काँग्रेस उमेदवाराचा पराभव अशा विविध निकालांची परंपरा राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेतही कायम राहिली आहे.
10 जागांसाठी 11 उमेदवार -विधान परिषदेच्या सोमवारी होणाऱ्या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने चुरस निर्माण झाली आहे. कोण पराभूत होणार याचीच चर्चा रंगली आहे. गेल्याच आठवड्यात सुमारे दोन दशकांनंतर झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत शेवटपर्यंत उत्कंठा कायम राहिली. साडेआठ तास विलंबाने सुरू झालेल्या मतमोजणीत भाजपच्या धनंजय महाडिक यांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या आधारे विजय प्राप्त केला तर शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. यापूर्वी राज्यातील विधान परिषद निवडणुकीतही असेच काही धक्कादायक निकाल लागले आहेत.
विलासरावांचा पराभव अवघ्या 0.59 मताने - 1996 मध्ये 9 जागांसाठी झालेली विधान परिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे चांगलीच गाजली होती. 1995 मध्ये लातूर मतदारसंघात पराभव झाल्याने विलासरावांनी विधान परिषद निवडणुकीत नशीब अजमाविले. काँग्रेसने उमेदवारी देण्यास नकार दिल्याने विलासरावांनी मातोश्रीचे द्वार ठोठावले होते. शिवसेनेच्या पाठिंब्यावर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. तेव्हा छगन भुजबळ, शिवाजीराव देशमुख, रामदास फुटाणे (काँग्रेस), अण्णा डांगे व निशिगंधा मोगल (भाजप), शिशिर शिंदे, रवींद्र मिर्लेकर व प्रकाश देवळे (शिवसेना) हे राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून आले होते. नवव्या जागेकरिता दोन अपक्ष लालसिंह राठोड आणि विलासराव देशमुख यांच्यात लढत झाली होती. विलासरावांना पहिल्या पसंतीची 19 तर राठोड यांना 20 मते मिळाली होती. पुढील पसंतीक्रमानुसार राठोड यांना 2468 तर विलासरावांना 2409 मते मिळाली. शेवटी सर्व मते मोजून झाल्याने विलासराव हे अवघ्या 0.59 मतांनी पराभूत झाले होते. तेव्हा अर्ध्या मताने पराभूत झाल्याचे विलासरावांना दु:ख झाले होते. विशेष म्हणजे विलासरावांना पराभूत करणारे राठोड हे त्यांचे मित्र होते. विलासराव तेव्हा शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले असते तर 1999 मध्ये काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली नसती.
गणपतराव देशमुखही झाले होते पराभूत -सर्वाधिक 11 वेळा विधानसभेवर निवडून आलेले गणपतराव देशमुख हे 1995 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. शेकापने त्यांना 1996 मध्ये विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. पण पुरोगामी लोकशाही आघाडीची मते फुटल्याने गणपतरावांचा त्या निवडणुकीत पराभव झाला होता. 2010 च्या निवडणुकीत पहिल्या पसंतीची सर्वात कमी मते मिळालेले काँग्रेसचे विजय सावंत हे विजयी झाले होते. भाजपच्या माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांना 24, शिवसेनेचे अनिल परब विद्यमान परिवहनमंत्री 21 तर काँग्रेसचे विजय सावंत यांना 13 मते मिळाली होती. 2619 मतांचा कोटा होता. विजय सावंत यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाच उमेदवारांची दुसऱ्या पसंतीची मते मिळाल्याने ते कोटा पूर्ण करू शकले. शेवटी शोभाताई फडणवीस यांना 2415 तर परब यांना 2291 मते मिळाली. म्हणजेच सावंत यांच्यापेक्षा पहिल्या पसंतीची 8 मते अधिक मिळूनही परब पराभूत झाले होते.