मुंबई -अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. १६ तारखेला हे चक्रीवादळ येणार असून केरळ, गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, कर्नाटक या भागांमध्ये याचा प्रभाव दिसून येईल. हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या काळात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. या चक्रीवादळाचा धोका मुंबईला नसेल. कारण चक्रीवादळाची दिशा ही आखाती देशाकडे असल्याचेदेखील सांगितले जात आहे.
हेही वाचा -'निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान.. मात्र, केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळाली नाही'
2021मधील पहिले चक्रीवादळ
2021 मधील पहिले चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण होणार आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने चक्रीवादळ सदृश्य धोकादायक स्थिती निर्माण झाली असून 16 तारखेला सकाळपर्यंत हे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे कुलाबा वैधशाळाच्या वैज्ञानिक शुभांगी भुत्ते यांनी सांगितले. या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गोव्याच्या किनारपट्ट्यांना बसणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
'मच्छीमारांनी शहरातील समुद्रात जाऊ नये'
वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस या भागात पडेल. सोबत त्याचा प्रभाव मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये सुद्धा बघायला मिळेल. त्यानंतर अरबी समुद्र रौद्ररूप धारण करेल. सोबतच वाऱ्याचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रतितास असेल. कधी-कधी त्याची तीव्रता ६० किलोमीटर इतके वाढेल. या दिवसांमध्ये मच्छीमारांनी शहरातील समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा -ई टीव्ही भारत विशेष : 'निसर्ग'मुळे कासवांचे गाव वेळासमधील जैवविविधता धोक्यात
‘येलो अलर्ट’ जारी
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अनेक राज्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. दक्षिण अरबी समुद्रात 15 मेच्या आसपास चक्रीवादळाची शक्यता आहे. 14 आणि 15 मे रोजी केरळ, लक्षद्वीपच्या काही भागांत तर 15 रोजी दक्षिण कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडेल. मच्छीमारांनी 12 मेच्या रात्रीपर्यंत समुद्रातून मागे परतावे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
निसर्ग चक्रीवादळाने गेल्यावर्षी केले होते नुकसान
3 जून 2020 रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्याला हानी पोहचवली होती. निसर्ग चक्रीवादळाने हजारो कोटीचे नुकसान झाले होते. अनेक कुटूंब या वादळात उध्वस्त झाली होती. वेळीच प्रशासनाने अनेक समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुस्थळी हलविल्याने अनेकांचे प्राण वाचले होते.