मुंबई -काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होते. मुंबई आणि ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी समाज गेल्यास पैसाच राहणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केलं होते. त्यांच्या वक्तव्यानंतर सर्वस्तरातून टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आपली चूक मान्य केली आहे. त्यांनी एक निवेदन जारी करत माफी मागितली ( Bhagat Singh Koshyari Apologised For His Mumbai Remark ) आहे.
राज्यपालांचा माफीनामा -
दिनांक २९ जुलै रोजी अंधेरी येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाज बांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडुन कदाचित काही चुक झाली.
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वांचेच उल्लेखनीय असे योगदान आहे. विशेषतः संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगती पथावर अग्रेसर होत आहे.
गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
परंतु, त्या दिवशीच्या भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल ही कल्पना देखील मला करवत नाही.
महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करुन आपल्या विशाल अंतःकरणाचा पुनर्प्रत्यय देईल, असा विश्वास बाळगतो.
काय म्हणाले होते राज्यपाल? -एका कार्यक्रमात संवाद साधताना राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी म्हटलं की, मुंबई आणि आसपासच्या शहरातून गुजराती आणि राजस्थानी माणून बाहेर काढला, तर मुंबई, ठाण्यात पैसाच राहणार नाही. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून पाहिलं जातं. पण, हे लोक गेल्यानंतर मुंबई देशाची आर्थिक राजधानीही उरणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल कोश्यारींनी केलं होते.
'कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मीठ खाल्ले, पण...' -राज्यपाल कोश्यारींनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी तिकट शब्दांत हल्ला चढवला होता. राज्यपाल राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून राज्यात काम करत असतात. पदभार स्वीकारताना जात-भाषा-प्रांत-धर्म यावरून भेद न करण्याची शपथ घेतली जाते. पण, कोश्यारी यांनी भाषा-प्रांत यावरून लोकांमध्ये भेद निर्माण करून आग लावण्याचे काम करत घटनात्मक पदाची प्रतिष्ठा घालवली आहे. मराठी माणसाचे योगदान-श्रम यावर मुंबई उभी राहिली आहे. देशातील इतर भागातील लोकांनीही त्यात योगदान दिले. पण भाषा-प्रांत यावरून समाजात दुही निर्माण करणारे विधान कोश्यारी यांनी केले. गुण्यागोविंदाने एकत्र राहणारे गुजराती-राजस्थानी-मराठी यांच्यात म्हणजेच हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचा व मराठी माणसाचा अपमान केला. अशा कोश्यारी यांना घरी पाठवायचे का तुरुंगात याचा विचार सत्ताधाऱ्यांनी करावा. गेले तीन वर्षे कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मीठ खाल्ले, पण ते खाल्ल्या मिठाला जागले नाहीत. राज्यपालांना तात्काळ परत पाठवावे लागेल, अशी मागणीही ठाकरेंनी केली होती.
'राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून...' - महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती नसेल तर बोलत जाऊ नका, कुणीतरी सांगितले म्हणून मराठी माणसाला डिवचू नका, अशा शब्दांत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही राज्यपालांना खडसावले होते. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे, म्हणून आपल्याविरुद्ध बोलायला लोक कचरतात. परंतु, आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का? असा सवालही त्यांनी केला आहे. उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका, असा सल्लाही राज ठाकरेंनी राज्यपालांना दिला होता. दरम्यान, तिथेच भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांनीही या वक्तव्याबाबत असहमती दर्शवली होती.
हेही वाचा -Shinde Government: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी?, पावसाळी अधिवेशन लांबणीवर