मुंबई -कोरोना काळात सांस्कृतिक आणि कला क्षेत्रातील विविध कलाकार आणि रंगमंच कामगारांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. या कलाकारांची दिवाळी राज्य शासनाने गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. 56 हजार कलाकारांसाठी पाच हजार रुपयांप्रमाणे मदत दिली जाणार आहे. सुमारे 35 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यासंदर्भातील परिपत्रक पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने आज जारी केले.
कलाकारांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारकडून मदतीचा हात - Financial Assistance To Artists
कलाकारांची दिवाळी राज्य शासनाने गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. 56 हजार कलाकारांसाठी पाच हजार रुपयांप्रमाणे मदत दिली जाणार आहे. सुमारे 35 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

कलाकारांना 5 हजार रुपयांची मदत -
राज्यात कोरोना नियंत्रणात आल्याने निर्बंध शिथील केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी शासनाकडून खबरदारी घेतली आहे. सध्या सांस्कृतिक, रंगमंच, चित्रपटगृहे, नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरु करण्यात येत आहेत. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू होता. सुमारे दीड वर्षांपर्यंत कला विभागामार्फत सादर करण्यात येणारे कार्यक्रम स्थगित होते. परिणामी संघटीत आणि असंघटीत कलाप्रकारातील विविध कलाकारांना उत्पन्नापासून वंचित राहावे लागले होते. ही बाब विचारात घेत, राज्य शासनाने कलाकारांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 56 हजार कलाकारांना पाच हजार रुपये प्रति माणसी प्रमाणे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. यासाठी 35 कोटींच्या निधीची तरतूद केल्याचे पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागाने म्हटले आहे. वंचित कलाकारांनी आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन शासनाने केले आहे.
कलाकारांची मागणी -
कोरोनामुळे राज्यात 'ब्रेक द चेन' अंतर्गत निर्बंध लावले होते. नाट्यसृष्टी गरजू कलाकार आणि रंगमंच कामगारांना राज्य सरकारने आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी ऑनलाइन बैठक घेऊन नाट्यसृष्टीला पूर्ण सहकार्य आणि गरजूंना अर्थसहाय्य करण्याची घोषणा केली होती. आता महिनाभरानंतर निर्णयाची अमंलबजावणी करत, राज्य शासनाने कलाकारांना दिलासा दिला आहे.