ठाणे- सीबीएससी, आयसीएसई शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचा पालकांचा वाढता कल आहे. या शाळांचे महत्व कमी करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शैक्षणिक बोर्ड (एमआयईबी) स्थापन केले आहे. यावर्षी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील खासगी मान्यताप्राप्त 64 मराठी माध्यम शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ व कल्याण येथील सेंच्युरी रेयान शाळेचा यात समावेश करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय जाणीवा समृद्ध करणारे शिक्षण मातृभाषेतून देता यावे, यासह मराठी माध्यमांच्या शाळांकडे पुन्हा पालकांचा कल वाढावा हा यामागील मुख्य उद्देश आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे (एमआयईबी) पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची निवड करण्यात आली होती. यावर्षी दुसऱ्या टप्प्यात राज्यातील खासगी मान्यताप्राप्त 64 मराठी माध्यम शाळांची निवड करण्यात आली आहे. विश्वस्त सल्लागार मंडळाची यासाठी नेमणूक करण्यात आली असून या समितीवर डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भाटकर, सोनम वांगचूक, डॉ. स्वरुप संपत, अच्युत पालव या तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे.