मुंबई -श्रीमंत तिरुपती देवस्थानाला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरातील शासकीय जमीन 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुंबई तिरूपती देवस्थानावर सरकार मेहरबान, कोट्यावधींची जमीन एक रुपया भाडेपट्टीने दान - तिरुमला तिरुपती देवस्थान मुंबई
श्रीमंत तिरुपती देवस्थानला मुंबईतली कोट्यवधींची जमीन एक रुपया भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. देवस्थानच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरात शासकीय जमीन 30 वर्षांसाठी भाडेपट्याने देण्यात येणार आहे.
जगभरात प्रसिद्ध असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानला मुंबईतली कोट्यवधी रुपये किमतीची जमीन केवळ एक रुपया भाडेपट्याने देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तिरुमला देवस्थानाने विविध उपक्रमासाठी शासकीय जमीन विनामूल्य देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या मागणीनुसार मुंबईतील वांद्रे उपनगरात शासकीय जमीन भाडेपट्ट्याने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही जमीन तिरूमला तिरुपती देवस्थान, लहान तिरुपती बालाजी मंदिर, माहिती केंद्र, ई-दर्शन काऊंटर, पुस्तक विक्री केंद्र या प्रयोजनांसाठी वापरात आणली जाणार आहे.
तिरूमला तिरुपती देवस्थान ही संस्था आंध्र प्रदेश चॅरिटेबल अॅण्ड हिंदू रिलिजिअस इन्स्टिट्यूशन्स अॅण्ड इंडोव्हमेंट्स अॅक्ट 1987 अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेने वांद्रे येथे 648 चौरस मीटर शासकीय जमीन विनामूल्य देण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यानुसार ही शासकीय जमीन तिरूमला तिरुपती देवस्थान या संस्थेस 30 वर्ष इतक्या कालावधीसाठी 1 रुपया इतक्या नाममात्र दराने वार्षिक भुईभाडे आकारून भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुढच्या काही दिवसातच जमीन भाडेतत्वावर देण्याची शासकीय प्रक्रिया पूर्ण करून देवस्थानाच्या ताब्यात दिली जाणार आहे.