महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणत राज्यभरात बाप्पाला निरोप... - महाराष्ट्र गणपती विसर्जन

Maharashtra Ganesh Visarjan LIVE Updates
'पुढच्या वर्षी लवकर या' : राज्यभरात बाप्पाला निरोप...

By

Published : Sep 1, 2020, 1:09 PM IST

Updated : Sep 1, 2020, 10:35 PM IST

20:46 September 01

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब केले गणरायाचे विसर्जन

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या कुटुंबासोबत लाडक्या गणरायाचे विसर्जन केले आहे.  

20:42 September 01

श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे मुख्य मंदिरामधील गणेश कुंडामध्ये विसर्जन

श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे मुख्य मंदिरामधील गणेश कुंडामध्ये विसर्जन

पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... निर्विघ्न या... अशी प्रार्थना करत सनई चौघडयांच्या गजरात दगडूशेठ गणपती बाप्पांचे मंदिरामधील विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत चतुर्दशीला सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी 'श्रीं'चे विसर्जन ट्रस्टच्या मोजक्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत झाले. 

19:53 September 01

श्यामनगर तलावात शिस्तबद्ध पद्धतीने गणरायाला निरोप

मुंबई - जोगेश्वरी पूर्वेकडील श्यामनगर येथील लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलावात शासनाचे नियम पाळून आज गणेश विसर्जन सुरळीत पार पडले. गेले 10 दिवस मनोभावे पूजाअर्चा केल्यावर आज लाडक्या बाप्पाला 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजरात निरोप दिला.

19:51 September 01

बीड : नगरपालिकेकडून 40 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

नगरपालिकेकडून 40 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

बीड-यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नगरपालिका प्रशासनाने बीड शहरातील गणेशमूर्ती संकलन केले आहे. गणेश भक्तांनी जड अंतकरणाने लाडक्या गणरायाला मंगळवारी निरोप दिला. केवळ बीड शहरात 40 हजार गणेश मूर्तींचे नगरपालिकेच्यावतीने विसर्जन करण्यात आले असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्कर्ष गुटे यांनी दिली.  

बीड शहरासह परिसरात सकाळपासूनच नगरपालिकेने वेगवेगळ्या प्रभागांमध्ये 30 पेक्षा अधिक गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारले होते. सार्वजनिक गणेश मंडळांसह नागरिकांनी आपल्या घरातील गणरायाची मूर्ती नगरपालिकेच्या संकलन केंद्रावर जाऊन प्रशासनाकडे सुपूर्द केल्या असल्याची माहिती गणेश भक्त मनोज डहाके यांनी दिली.

19:30 September 01

कराडच्या प्रीतिसंगमावर गृहराज्यमंत्र्यांनी बोटीतून केले गणेशमूर्तींचे विसर्जन

कराड(सातारा) - प्रीतिसंगमावर गणेश विसर्जनास मनाई करण्यात आल्यामुळे नगरपालिकेकडे संकलित झालेल्या घरगुती गणेशमूर्तींची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थित विधिवत पूजा, आरती करण्यात आली. त्यानंतर स्वत: गृहराज्यमंत्री देसाई यांनी बोटीतून जात कोयना-कृष्णा नदीच्या प्रीतिसंगमावर गणेशमूर्तींचे विसर्जन केले.  

19:29 September 01

सोलापुरात ढोल-ताशा व मिरवणुकीविना लाडक्या बाप्पाला निरोप

सोलापुरात ढोल-ताशा व मिरवणुकीविना लाडक्या बाप्पाला निरोप

सोलापूर - दरवर्षी ढोल-ताशा व लेझीमच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो. परंतु यंदाच्या वेळी गणरायाला अत्यंत साध्या पद्धतीने सोलापुरकरांनी निरोप दिला. सोलापूर महानगरपालिकेचे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी परिवारासह आपल्या निवासस्थानी गणेश विसर्जन केले. या निमित्ताने श्रीगणेशाची विधीवत पूजन करून आपल्या घरातच श्रीगणेशाचे विसर्जन केले.

18:09 September 01

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी बाप्पाचे केले विसर्जन

विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी बाप्पाचे केले विसर्जन

मुंबई - विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी भक्तीभावाने लाडक्या गणरायाला निरोप दिला. पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले.‘पुढच्यावर्षी लवकर या’ हे मागणे मागूनच फडणवीस कुटुंबीयांनी जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप दिला.

17:51 September 01

अमरावतीकरांनी साध्या पद्धतीने दिला बाप्पांना निरोप

अमरावतीकरांनी साध्या पद्धतीने दिला बाप्पांना निरोप

अमरावती - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात यावर्षी अतिशय सध्या पद्धत्तीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पांना निरोपही ढोल, ताशांच्या नादाला फाटा देत अतिशय साध्य पद्धतीने देण्यात आला.

गणपती विसर्जनासाठी धृतगती मार्गालगत बिच्चू टेकडी परिसरात प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव याठिकाणी महापालिकेच्यावतीने व्यवस्था करण्यात आली. छत्री तलाव परिसरात 80 फूट लांब आणि 20 फूट रुंद व 8 फूट खोल कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली. प्रथमेश तलाव येथे 50 बाय 20 फूट आकाराचा खड्डा तयार करण्यात आला. निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. गणपती विसर्जनाच्या या दोन्ही स्थळी पोलिसांचा बंदोबस्त होता.  

17:50 September 01

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आज ११ दिवसांच्या गणपतींचे मोठ्या थाटात विसर्जन करण्यात आले. कुडाळ येथे खासदार नारायण राणे यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या सिंधुदुर्गच्या राजाचे पावशी तलावात विसर्जन करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत हा विसर्जनाचा सोहळा सुरू होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

17:13 September 01

पुणे : कोरोनामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला साधेपणाने निरोप

पुणे - गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...असे म्हणत आज लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दरवर्षी ढोल ताशांच्या गजरात, वाजतगाजत गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. पण यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे गणेशोत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि शांततेत सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला.  

17:13 September 01

कोरोनाचे विघ्न लवकर दूर करा; भक्तांचे बाप्पाकडे साकडे

मुंबई - आज भक्ती भावाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. बाप्पाला निरोप देताना भारतातील आणि मुंबईतील कोरोनाचे विघ्न लवकर दूर कर, असे साकडे भक्तांनी घातले आहे. मुंबईत गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. कोरोनाचे संकट असल्याने मुंबईत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. पालिकेच्या आवाहनाप्रमाणे भक्तांनी कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन करण्यावर भर दिला आहे.  

17:12 September 01

ठाण्यात गणपती विसर्जनाला सुरुवात

ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन देखील धूमधडाक्यात न करता साधेपणाने केले जात आहे. ठाण्यातील अनेक मंडळांनी यावर्षी अकरा दिवसांचे गणपती न ठेवता दीड दिवसांचे गणपती ठेवले होते. मात्र, ज्यांनी अकरा दिवसांचे गणपती विराजमान केले त्यांनीदेखील तलावात किंवा खाडीमध्ये मूर्तींचे विसर्जन न करता आपल्याच मंडपात हौद तयार करून त्यात विसर्जन करायचे ठरवले आहे. ठाण्यातील श्रीनगर येथे बाल मित्र मंडळ आहे. या मंडळाने बाप्पाच्या विसर्जनासाठी खास तयारी केली आहे. मंडपातच हे हौद तयार करून सजवण्यात आले आहे. बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विसर्जनाआधी मूर्तीवर पंचामृतांचा अभिषेक देखील करण्यात येत आहे. त्यासाठी हंडी बांधण्यात आले आहे. पालिका प्रशासन आणि पोलिसांनी या वर्षी कोणत्याही डीजे मिरवानुकांवर बंदी घातली आहे.  

17:12 September 01

100 वर्षात पहिल्यांदाच नाशिकच्या मानाच्या बाप्पाचे मंदिरासमोर विसर्जन

नाशिक -कोरोनामुळे 100 वर्षात पहिल्यांदाच नाशिकच्या रविवार कारंजा मित्र मंडळाच्या मानाच्या चांदीच्या गणपतीचे विसर्जन साध्या पद्धतीने मंदिरासमोर करण्यात आले.

नाशिकच्या पाच मानाच्या गणपतीं पैकी एक म्हणजे रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती. हा बाप्पा नाशिककरांचे श्रद्धास्थान आहे. अनेक भाविक रोज सकाळी या बाप्पाचे दर्शन घेऊन कामास सुरुवात करतात. या बाप्पाकडे मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची मान्यता आहे. दरवर्षी रविवार कारंजा मित्र मंडळाकडून गणेशोत्सवात भव्य देखावा सादर करण्यात येतो. तसेच विसर्जनाच्या दिवशी भव्य मिरवणूक काढली जाते. 

16:36 September 01

कोल्हापुरातील गणेश मूर्तींचे इराणी खणीमध्ये विसर्जन

प्रतिनिधी शेखर पाटील यांनी घेतलेला आढावा...

कोल्हापूर - सकाळी 6 वाजल्यापासून कोल्हापुरातील इराणी खणीमध्ये सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाले आहे. दरवर्षी येथील पंचगंगा नदीमध्ये सर्वच मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. म्हणून येथील इराणी खणीमध्ये यावर्षी मूर्ती विसर्जनाचे नियोजन करण्यात आले आहे. याठिकाणी प्रशासनाकडून नेटके नियोजन केल्याचेसुद्धा पाहायला मिळत आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक मंडळाच्या केवळ 3 सदस्यांना याठिकाणी मूर्ती घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावर्षी प्रत्येक मंडळांच्या मूर्तीसुद्धा लहान आहेत. त्यामुळे प्रशासनाने सुद्धा शक्य त्यांनी आपल्या मंडळांच्या समोरच विसर्जन कुंडामध्ये विसर्जन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक मंडळांनी याला प्रतिसाद देत मूर्ती आपापल्या मंडळांच्या समोरच मूर्तींचे विसर्जन केले आहे.  

16:22 September 01

पुणेकरांनी संयमाने गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल त्यांचे आभार - महापौर मुरलीधर मोहोळ

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे - कोरोनाचे मोठे संकट असताना आणि या काळात अत्यंत काळजी घेण्याची गरज असताना पुणे शहराची शान असलेला गणेशोत्सव संयमाने साजरा केला. पुणेकर नागरिकांनी आपल्या उत्साहाला भावनांना मुरड घालत संयमाने उत्सव साजरा केला. याबद्दल सर्व पुणेकरांचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आभार मानले आहेत. महापौरांच्या उपस्थितीत मानाच्या गणपतींचे विसर्जन करण्यात आले. सर्व पाच मानाच्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर महापौर बोलत होते.

16:21 September 01

जालना : ना ढोल ताशा, ना गुलालाची उधळण; पालिकेच्या वाहनातून बाप्पांचे विसर्जन

जालना - ना ढोल-ताशे, ना गुलालाची उधळण अशा परिस्थितीमध्ये नगरपालिकेच्या वाहनातून बाप्पांचे विसर्जन करण्यात येत आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्यावतीने भक्तांनी स्वतः येऊन गणपती विसर्जन करण्यावर बंदी आणली आहे. त्यामुळे नगरपालिकेचे दोन वाहन प्रत्येक प्रभागांमध्ये फिरत आहेत. एका वाहनात गणपती बाप्पा व दुसऱ्या वाहनात निर्माल्य अशा पद्धतीने हे गणपती विसर्जनासाठी जमा करण्यात येत आहेत. त्यानंतर नगरपालिकेच्यावतीने मोती तलावात विसर्जन होत आहे. पोलीस आणि प्रशासन या दोन्ही यंत्रणा यावर बारकाईने लक्ष देऊन आहेत. मात्र, भक्तच नसल्यामुळे इथे कसल्याही प्रकारची गर्दी नाही.

16:20 September 01

रत्नागिरी : घरोघरी उमटतायेत आरतीचे सूर...

रत्नागिरी - आज अनंत चतुर्दशीदिवशी, जिल्ह्यात ३६,७२० घरगुती तर ४८ सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तब्बल अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर आज अखेर गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. कोकणातला गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण समजला जातो कारण इथे घरगुती गणेशोत्सवाचं स्वरूपही सार्वजनिक गणेशोत्सवासारखं असतं, यावर्षी गणपती उत्सवावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे अतिशय साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. आगमन मिरवणुका तसेच विसर्जन मिरवणुकांवर प्रशासनाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर विसर्जनावेळी केवळ २ व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. समुद्रकिनारी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. आज जिल्ह्यात ३६,७२० घरगुती तसेच ४८ सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाणार आहे. अत्यंत साध्या पद्धतीने हे विसर्जन होणार आहे. 

15:15 September 01

बीड; जड अंतकरणाने दिला गणरायाला निरोप; नगर पालिका प्रशासनानेच केले विसर्जन

बीड -यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नगर पालिका प्रशासनाने बीड शहरातील गणेशमूर्तींचे संकलन केले आहे. गणेश भक्तांनी जड अंतकरणाने लाडक्या गणरायाला निरोप दिला. मंगळवारी सकाळपासूनच नगरपालिकेने बीड शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये गणेश मूर्ती संकलन केंद्र उभारले होते. सार्वजनिक गणेश मंडळांसह नागरिकांनी आपल्या घरातील गणरायाची मूर्ती नगरपालिकेच्या संकलन केंद्रावर घेऊन येऊन नगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द केल्या.

15:15 September 01

मुंबईत दुपारी 12 पर्यंत 492 गणेश मूर्त्यांचे विसर्जन

मुंबई -आज सकाळपासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत 492 गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यात 16 सार्वजनिक तर 476 घरगुती गणेश मूर्त्यांचा समावेश आहे. एकूण 492 गणेश मूर्तींपैकी 209 गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. कृत्रिम तलावात 10 सार्वजनिक तर 199 घरगुती गणेश मूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले. मुंबईत विसर्जना दरम्यान कोणतीही दुर्घटना घडलेली नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.  

यंदा शांततेत गणपती विसर्जन  

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', अशा जयघोषात भक्तिमय वातावरणात आणि जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला आज निरोप दिला जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मुंबईत विसर्जनाला गर्दी दिसत नाही. पालिका व राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करत यंदा विसर्जन होत आहे. कोणतीही मिरवणूक नाही , अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्याच भाविकांसह विसर्जन सोहळा पार पडत आहे. पोलीस बंदोबस्त तसेच पालिका कर्मचारी गिरगाव चौपाटीवर तैनात आहेत. 

15:14 September 01

नंदुरबार; मानाच्या गणपतींचे शांततेत व साध्या पद्धतीने विसर्जन

नंदुरबार - शहरातील मानाच्या दादा व बाबा गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन साध्या पद्धतीने संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने मंडळांना हरिहर भेट न करण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत दोन्ही मानाच्या गणपती मंडळाच्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत शांततेत मिरवणूक काढली.  

शंभर वर्षांची परंपरा असलेल्या हरिहर भेट यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. सकाळी नऊ वाजेपासून अगोदर शहरातील मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. अत्यंत साध्या पद्धतीने विसर्जन मिरवणूक संपन्न झाली.

13:46 September 01

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन..

पुण्यातील मानाचा पाचवा गणपती, म्हणजेच केसरीवाडा गणपतीचे विसर्जनही पार पडले आहे. मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन नियोजित वेळेच्या एक तास अगोदरच पार पडले आहे.

13:22 September 01

मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे विसर्जन संपन्न

पुण्यातील मानाचा चौथा गणपती, म्हणजेच तुळशीबाग गणपतीचे विसर्जनही पार पडले आहे.

13:22 September 01

लातुरात अनोखा उपक्रम : रोपांचे वाटप करून वृक्षरूपी गणरायाचे विसर्जन

यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट होते. मात्र, गणेश भक्तांचा उत्साह हा कायम होता. लातूर येथील वृक्ष प्रेमींनी साकारलेली गणेश मूर्ती ही वेगळी तर होतीच शिवाय या मंडळाचे कार्यही कौतुकास्पद होते. वृक्षलागवडीने या महोत्सवाला सुरवात झाली होती आणि विसर्जनदीवशी सुमारे 1 हजार रोपांचे वाटप करण्यात आले. यामुळे पर्यावरणाचे संतुलन तर राहणार आहे शिवाय या वृक्षप्रेमींनी केवळ औपचारिकता म्हणून नाही, तर लातूर शहरातील मुख्य रस्त्यावरील झाडांचे संवर्धनही केले आहे. 
 

13:18 September 01

धुळ्यात पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी केले विधिवत गणेश विसर्जन..

धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी आपल्या घरगुती गणरायाचे शहरातील गांधी पुतळा परिसरात ठेवण्यात आलेल्या हौदात विधीवत विसर्जन केले यावेळी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांचे कुटुंबीय उपस्थित होते धुळे जिल्ह्यामध्ये गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून नागरिकांनी कोरोना चा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करीत गणरायाचे विसर्जन करावे असे आवाहन पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले. 

13:10 September 01

पुण्यातील मानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या गणपतीचे विसर्जन..

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती, आणि मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीचे विसर्जन पार पडले आहे..

12:58 September 01

अहमदनगर- ग्रामदैवत श्री विशाल गणेशाचे पहिल्यांदाच मिरवणुकीविना विसर्जन..

नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरातील उत्सवमूर्तीचे आज परंपरे नुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी उत्थापन पूजा करण्यात आली. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक नसल्याने उत्थापन पूजे नंतर श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. मोजके विश्वस्त आणि भक्तांच्या उपस्थितीत उत्थापन पूजा करण्यात आली. श्री विशाल गणेश हे शहराचे ग्रामदैवत असून दरवर्षी विसर्जन मिरवणूकीत विशाल गणेशाची उत्सवमूर्ती ही मानाची आणि अग्रभागी मिरवणुकीत असते. शहरात सर्वठिकाणी स्वागत, आरती होत विशाल गणेशाला शहरवासीय भावपूर्ण निरोप देत गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या संकटात विसर्जन मिरवणूक टाळण्यात आली. मात्र उपस्थित जिल्हाधिकारी, विश्वस्थ आणि मोजक्या भक्तांच्या उपस्थित जागेवरच विसर्जन करण्यात येत गणेशाला पुढल्या वर्षीचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले.. 

12:55 September 01

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', या जयघोषाने अकोल्यात बाप्पाला निरोप..

गेल्या दहा दिवसांपासून विराजमान असलेल्या लाडक्या गणपतीला आज जड अंतकरणाने भाविकांनी निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या बारभाई गणपतीचे विसर्जनही घरीच करण्यात आले. यावेळी विविध गणपती मंडळाचे पदाधिकारी आणि काही लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती होती. महापालिका प्रशासन तसेच सामाजिक संघटना आणि नगरसेवकांनी आपापल्या परिसरामध्ये, प्रभागांमध्ये गणेश विसर्जनासाठी कृत्रिम घाट तयार केले होते. या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी गणेशाचे विसर्जन केले.

12:54 September 01

पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन

पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे आज विसर्जन करण्यात आले. सकाळी 11 वाजून 44 मिनिटांनी आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्तांनी निरोप दिला. दरवर्षी मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला हार घालून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. परंतु यंदा covid-19 च्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून बाप्पाचे विसर्जन ही साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. यंदा विसर्जन मिरवणूकही निघणार नाही. त्यामुळे कसबा गणपतीच्या मंदिरात बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्येच कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. 

12:51 September 01

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत नाशकात घरगुती बाप्पाला निरोप

यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये भविकांनी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तीला पसंती दिल्याचे दिसून आले. नाशिक महानगरपालिकेने यंदाच्या वर्षी शहरातील 36 ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करून भाविकांना मूर्ती दान करण्याचे आवाहन केले. याला भाविकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला. तसेच अनेक सामाजिक संस्थानी देखील ठिकठिकाणी स्टॉल थाटून मूर्ती दान करण्याचे आवाहन केले.

12:50 September 01

जुहू समुद्रकिनारी घरगुती गणपती विसर्जनाला सुरुवात

गेले 10 दिवस गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केल्यावर अनंतचतुर्थीला लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. मुंबईच्या जुहू समुद्रकिनारी घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली आहे. समुद्राला भरती असल्याने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने नेमलेले स्वयंसेवक गणेशमूर्तींचे विसर्जन करत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने इथे लाईफगार्ड, पोलीस, अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे. मात्र, दरवर्षी जुहू समुद्रकिनारी होणारी गर्दी यावर्षी दिसून आली नाही.

12:49 September 01

पुण्यात यंदा विसर्जन मिरवणूक नाही, मंडपातच होणार बाप्पाचे विसर्जन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. अगदी त्याच पद्धतीने विसर्जन सोहळा पार पडणार आहे. खरेतर दरवर्षी विसर्जन मिरवणूक म्हटलं की संपूर्ण शहरात उत्साह असतो. पुण्यातील प्रमुख लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता या रस्त्यावर गणेशभक्तांची गर्दी असते. ढोल ताशांचा आवाज गर्जत असतो, सनईचे सूर निनादत असतात. मंगलमय वातावरण असते. मात्र, यंदा कोरोनामुळे हा उत्साह दिसून येत नाही. गणेशोत्सवाप्रमाणेच यंदा बाप्पाचे विसर्जनही साध्या पद्धतीने होणार आहे.

12:47 September 01

मुंबईचा राजा गणेशगल्ली मंडळाने विसर्जनासाठी तयार केले कृत्रिम तलाव..

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यावर्षी पहिल्यांदाच मुंबईच्या राजाचे विसर्जन समुद्रात न होता कृत्रिम तलावात केले जात आहे. यासाठी मंडळाच्या आवारात कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. यापूर्वी अगोदर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला साथ देत गणेशगल्ली मंडळाने यंदाचा गणेशोत्सव साधा पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे दरवर्षी 20 फुटांपेक्षा उंच असणारी गणेशमूर्ती यावर्षी चारच फुटांची ठेवण्यात आली होती.
 

12:46 September 01

गणपती बाप्पाला आज निरोप! मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त..

गणपती बाप्पाला आज निरोप! मुंबईत चोख पोलीस बंदोबस्त..

मुंबई -गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्थीच्या दिवशी सांगता होत आहे. आज दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार असून यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. विसर्जनासाठी ४४५ स्थळं निश्चित करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण शहरात ३५ हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

12:43 September 01

'पुढच्या वर्षी लवकर या' : राज्यभरात बाप्पाला निरोप...

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज अनंत चतुर्थीच्या दिवशी सांगता होत आहे. आज दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होणार असून, राज्यभरात यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विसर्जन मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही लोक उत्साहाने फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत बाप्पाला निरोप देत आहेत...

Last Updated : Sep 1, 2020, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details