महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Floods : राज्यात अतिवृष्टी, पुराचे 65 बळी; पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा - कोकण पाऊस

संपूर्ण राज्यात सध्या पावसाचे थैमान सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणसह मुंबई, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. कोकणातील रायगडमधील तळई गावात दरड कोसळून 38 जणांचा तर पोलादपुरात भूस्खलनात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर साताऱ्यातही वेगवेगळ्या दुर्घटनांत 12 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर मुंबईतील गोवंडीमध्येही एक घर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पावसाशी निगडीत दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगडमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांच्या मदतीची घोषणा केली आहे.

Maharashtra Floods : राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना, दुर्घटनांत 47 ठार
Maharashtra Floods : राज्यात अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना, दुर्घटनांत 47 ठार

By

Published : Jul 23, 2021, 3:18 PM IST

Updated : Jul 23, 2021, 5:46 PM IST

मुंबई/रायगड : संपूर्ण राज्यात सध्या पावसाचे थैमान सुरू असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकणसह मुंबई, कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. कोकणातील रायगडमधील तळई गावात दरड कोसळून 38 जणांचा तर पोलादपुरात भूस्खलनात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर साताऱ्यातही वेगवेगळ्या दुर्घटनांत 12 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर मुंबईतील गोवंडीमध्येही एक घर कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पावसाशी निगडीत दुर्घटनांमध्ये राज्यात आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगडमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर राष्ट्रपतींनीही राज्यातील पुराशी निगडीत दुर्घटनांवर दुःख व्यक्त करत पीडित कुटुंबियांविषयी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनीही या दुर्घटनांवर शोक व्यक्त करत केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

अतिवृष्टीमुळे बचावकार्यात अडचणी - मुख्यमंत्री

राज्यात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. कोकणातील चिपळूण, रायगड परिसरात भयानक परिस्थिती होती. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने बचावकार्यात अडचणी आल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. अजून एखादा दिवस अशीच परिस्थिती राहील अशी भीतीही ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या आहेत. शुक्रवारी राज्यातील पूरस्थितीचा मुख्यमंत्री आढावा घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकूमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे आदी अधिकारी बैठकीला उपस्थित होते. दरम्यान, राज्यात दरड कोसळण्यासह विविध दुर्घटनांत 44 जणांचा मृत्यू झाल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची संरक्षणमंत्र्यांशी चर्चा

रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर तसेच दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलाची मदत तत्काळ उपलब्ध करण्यात आली असून अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

रायगडमध्ये दरड कोसळून 38 ठार, पोलादपुरात भूस्खलनात 11 ठार

रायगडमधील तळई गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत सुमारे ५० ते ६० नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यातील 38 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले असून अजूनही 40 हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या ठिकाणी एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरू आहे. तर रायगडच्या पोलादपुरातही भूस्खलनात 11 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे.

साताऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन, 8 ठार

साताऱ्यातील वाई तालुक्यातील देवरुखकर वाडी या वस्तीमधील पाच ते सहा घरांवरही दरड कोसळली आहे. ही घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत पाच रहिवासी अडकले आहेत. देवरुखकर वाडी परिसरात 20 घरे आहेत. त्यातील पाच ते सहा घरे रहिवाशांसह ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. पंधरा लोकांना बाहेर काढण्यात यश आले असून अद्याप मदतकार्य सुरू आहे. याशिवाय वाई तालुक्यातील कोंढवळे येथेही पाच घरे पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात दबली असून दोन व्यक्ती मयत आढळून आल्या आहेत. या ढिगाऱ्यात अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील मिरगाव, आंबेघर, हुंबरळी, ढोकावळे या ठिकाणीही भूस्खलन झाले आहे. सध्या या ठिकाणी एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात विविध घटनांमध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे.

पाटणमध्ये 4 ठार, तीन कुटुंब बेपत्ता

साताऱ्यातील पाटण तालुक्यात आंबेघर, ढोकावळे, मोरगिरी, कामरगाव, गुंजाळी, काठेवाडी (घेरादात्तेगड), टोळेवाडी, कातवडी-मेष्टेवाडी आदीसह अनेक ठिकाणी डोंगर-दरडी कोसळल्या आहेत. यात काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन कुटुंब बेपत्ता झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत. मदतकार्यास सुरवात झाली आहे. मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून व पाण्याखाली गेल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासकीय यंत्रणा देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. या ठिकाणी एनडीआरएफच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

रत्नागिरीतील खेड, पोसरेमध्ये दरड कोसळली, अनेक जण अडकल्याची भिती, आतापर्यंत 1800 जणांना वाचविले

रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये महापुराने हाहाकार घातला असून आतापर्यंत पुरात अडकलेल्या 1800 लोकांना सुरक्षितपणे वाचविण्यात आले आहे. चिपळूणमधल्या पोसरे-बौद्धवाडी येथे 17 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय खेड तालुक्यातील धामनंदमध्येही 17 घरांवर दरड कोसळून काहीजण दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या ठिकाणी बचाव कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी दिली आहे. सध्या चिपळूणमध्ये एनडीआरएफच्या चार टीम दाखल झाल्या आहे. पुरात अडकलेल्या लोकांनी रेस्क्यू ऑपरेशनला सहकार्य करून त्यांच्यासोबत सुरक्षित स्थळी यावं असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

दूधसागर एक्सप्रेस घसरली

मंगळुरूहून मुंबईला येणारी एक्सप्रेस रेल्वे दूधसागर धबधब्यानजीक रुळावरून घसरल्याची घटनाही समोर आली आहे. या ठिकाणी दरड रेल्वे रुळावर घसरल्याने हा अपघात घडला. सोनालीम आणि दूधसागर स्थानकादरम्यान ही घटना घडली. तर सिंधुदुर्गातील आंबोली मुख्य धबधब्याजवळ दरड कोसळल्याने सावंतवाडी-बेळगाव मार्ग ठप्प झाला आहे. दरम्यान, गोव्यात पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी प्रशासनाच्या हलर्जीपणाबद्दल अधिकाऱयांना खडे बोल सुनावले.

मुंबईत घर कोसळून 4 ठार

मुंबईच्या गोवंडी शिवाजी नगर येथे एक घर कोसळून 11 जण जखमी झाले आहेत. घटनेतील जखमींना महापालिकेच्या राजावाडी आणि सायन रुग्णालयात दाखल केले असून त्यापैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 7 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा -LANDSLIDE AT MAHAD : महाडमधील तळईत दरड कोसळून 35 जण ठार; अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

Last Updated : Jul 23, 2021, 5:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details