महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महापूरग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य, मुख्यमंत्र्यांची घोषणा - fadnavis

पूरग्रस्त नागरिकांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच, नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. पूरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

maharashtra flood update affected families will get rupees five thousand in cash cm fadnavis announces

By

Published : Aug 11, 2019, 7:45 PM IST

मुंबई - पूरग्रस्त नागरिकांना प्रतिकुटुंब पाच हजार रुपये रोख अर्थसहाय्य तातडीने वितरीत करावी, तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे आणि आपत्ती निवारण प्रभागाचे संचालक अभय यावलकर आदी उपस्थित होते.

राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला

पूरग्रस्त नागरिकांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच, नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. पूरग्रस्त गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.

स्वच्छतेच्या मोहीमेसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी स्तरावर उपलब्ध होणारी सर्व यंत्रणा कामाला लावा. पूरग्रस्त गावांमध्ये औषधांची फवारणी तसेच पेट्रोल, डिझेल, गॅसपुरवठा आणि खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे आदेश आणि शिरोळ येथे तातडीने चारा पोहोचविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी, महामार्गांवर ज्याठिकाणी वारंवार पाणी साचून वाहतूक बाधीत होते, अशाठिकाणी उड्डाणपुले बांधण्याचे प्रस्ताव करण्याच्याबाबत, तसेच सांगलीत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी कवलापूर येथे सुसज्ज विमानतळ बनविण्याबाबत सूचना दिल्या.

काय आहे सध्या परिस्थिती?
राज्यातील 10 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत. 4,47,695 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्यात मदतकार्यासाठी एनडीआरफ (32 पथके), एसडीआरफ (3 पथके), आर्मी (21 पथके), नेव्ही (41 पथके) आणि कोस्ट गार्ड (16 पथके) कार्यरत आहेत. 226 बोटींद्वारे बचावकार्य सुरु आहे. पूरपरिस्थितीमुळे 32 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे, तर 4 व्यक्ती जखमी झाल्याची नोंद आहे. तसेच, 48 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.

कोल्हापूर येथे पाण्याची पातळी 1 फुट 11 इंचाने व सांगलीतील पाण्याची पातळी 3 फूटाने ओसरली आहे. शिरोळ येथे 62.9 फुट पाण्याची पातळी आहे. आलमट्टी धरणामध्ये इन फ्लो 6 लाख 8 हजार 33 क्यूसेक असून, 5 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग होत आहे. पुणे विभागातील 27 तालुके पूरग्रस्त असून, 585 गावांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये 2 महानगरपालिका आणि 15 नगरपालिकांचा समावेश आहे.

बचावकार्य..
सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतून 4,13,985 नागरिकांना 535 आश्रय शिबीरांत सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात एकूण 51 पथके, 95 बोटी व 569 जवानांमार्फत बचाव कार्य सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 54 पथके, 74 बोटी आणि 456 जवानांमार्फत बचाव कार्य सुरु आहे. सांगली जिल्ह्यात 80, कोल्हापूर जिल्ह्यात 150 आणि सातारा जिल्ह्यात 72 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.

रस्ते वाहतूक..
सांगली जिल्ह्यात 66 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 33 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 91 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 39 पूल पाण्याखाली आहेत. सातारा जिल्ह्यात 5 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 3 पूल पाण्याखाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात 33 रस्ते बंद असून 14 पूल पाण्याखाली आहेत.

पाऊस..
राज्यात आज अखेर 802.70 मि.मी. पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या 109.43 टक्के आहे. मागील वर्षी यावेळी ती 79.22 टक्के होती. राज्यात आतापर्यंत 58 टक्के पाणीसाठा पावसामुळे निर्माण झाला आहे. जायकवाडी धरण 80 टक्के तर उजनी धरण 100 टक्के भरलेले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांना दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details