मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा या ऑनलाईन सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी दूरदर्शनवर १२ तासांचा स्लॉट देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. मात्र, केंद्राने अद्यापही त्याला दाद दिली नाही. यामुळे नाराज झालेल्या वर्षा गायकवाड यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याविषयी साकडे घातले आहे.
ग्रामीण भागातील जवळपास 80 टक्के विद्यार्थ्यांकडे इंटरनेट उपलब्ध नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहतात. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने दूरदर्शन या वाहिनीवर 12 तासाचा स्लॉट महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावा; अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय महिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना केली होती. त्यांनी याबाबत २९ मे रोजी जावडेकरांना पत्र लिहिले होते. मात्र, अद्यापही या पत्राची दखल माहिती व प्रसारण विभागाने घेतली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.