वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ' आरटीपीसीआर'च्या चाचणीसाठी घेण्यात आलेले घशातील स्रावाचे नमुने जास्त दिवस पडून असल्याने त्या नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनंतर आरोग्य विभागाला जाग आली. काल घेतलेले आरटीपीसीआर टेस्टचे नमुने टेस्टिंग साठी लॅबवर तात्काळ पाठविण्यात सुरुवात झाली आहे.
राज्यातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर... - maharashtra Corona Upmaharashtra Coronavirus Live Updatesdate
13:55 March 03
धक्कादायक : आरटीपीसीआर'च्या 110 नमुन्यांमध्ये बुरशी
09:39 March 03
सोलापूरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई
सोलापूरात कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून पाऊले उचलली जात आहेत. शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, एस. टी.स्टँड, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी आणि शासकीय रुग्णालयाच्या परिसरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्यासह सर्व संबंधित विभागांनी आपआपल्या जबाबदारीचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. होम क्वारंटाईन कोणत्याही रुग्णास केले जाणार नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत दिली
09:39 March 03
औरंगाबादमध्ये रुग्ण संख्येत वाढ, तीनशेचा टप्पा पार
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही पुन्हा एकदा झपाट्याने वाढत चालली आहे. रुग्णांची संख्या जास्त वाढत असणाऱ्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येईल, असे महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी म्हटलं आहे. गेल्या दिवसांपासून रोज रुग्णसंख्येचा आकडा दोनशे पार जात आहे. मंगळवारी दिवसभरात मात्र 325 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50916 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1271 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2387 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
09:39 March 03
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रा मार्ग सील
सिंधुदुर्ग - भाविकांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रा मार्ग सील करण्यात आला आहे. ही कोकणातील सर्वात मोठी यात्रा असून कोरोनामुळे या यात्रेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आंगणे कुटुंबातील व्यक्तींना सुद्धा आरोग्य तपासणी करून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. यात्रा परिसरात दुकान लावण्यासही परवानगी नाही, असे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आदेश दिले आहेत. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गातील मालवण येथील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 6 मार्च रोजी संपन्न होत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ आंगणे कुटुंबीय मर्यादित यात्रा होणार आहे. आंगणेवाडीची जत्रा ही मालवणातील केवळ आंगणे या गावातील असते. मात्र त्याची ख्याती सर्वदूर पसरली असल्याने आता मोठ्या प्रमाणात भाविक येतात
08:13 March 03
लसीकरणाचा तिसरा टप्पा
राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. मंगळवारी (2 मार्च 2021) दुसऱ्या दिवशी 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 12 हजार 299 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असणाऱ्या 3 हजार 812 लाभार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे.
08:12 March 03
मुंबईतील 29 खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणाची परवानगी
मुंबईत 16 जानेवारीपासून महापालिका, सरकारी, खासगी रुग्णालय तसेच कोविड सेंटरमध्ये कोरोना विषाणूवरील लस दिली जात आहे. केंद्र सरकारने लसीकरण करण्यासाठी खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्यानुसार केंद्र सरकारने पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत येणाऱ्या 29 रुग्णालयांना लसीकरणाची मान्यता दिली आहे.
06:07 March 03
राज्यातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...
मुंबई - राज्यात कोरोनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय झालेला आहे. गेल्या 24 तासांत सहा हजार 332 कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 20 लाख 36 हजार 790 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93. 89% झाले आहे. राज्यात नव्या सात हजार 863 रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 21 लाख 69 हजार 330 इतकी झाली. तर राज्यात 24 तासात 54 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्युदर 2. 41 टक्के इतका आहे. तर राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 79 हजार 93वर पोहोचली.
राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू केली आहे. महाराष्ट्रासोबत केरळ, पंजाब, तमिळनाडू राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोमवारपासून सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरूवात झाली असून लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सॅनिटायझेशन, योग्य शारीरिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुण्याची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले जात आहे.