मुंबई - कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत असून आज केवळ चार हजार 359 रुग्ण सापडले आहेत. तर, 32 रुग्ण दगावले आहे. राज्याला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तर, दुसरीकडे ओमयक्रोनचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आज एकाच दिवशी 237 बाधितांची नोंद झाली. त्यापैकी सर्वाधिक 226 रुग्ण मुंबईतील असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
हेही वाचा -सचिन वाझे यांना माफीचा साक्षिदार करायचे की नाही हा न्यायालयाचा अधिकार - ज्येष्ठ कायदेतज्ञाचे मत
कोरोनाची तिसरी लाट ओसरत असून आज रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. शुक्रवारी 5 हजार 455 रुग्ण तर, 63 जणांचा मृत्यू झाला होता. आज 4 हजार 359 बाधितांची नोंद झाली. पैकी 32 जण दगावले. तर, आज 12 हजार 968 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 97.45 टक्के इतके आहेत. आजपर्यंत 7 कोटी 61 लाख 69 हजार 626 कोविड चाचण्या केल्या. त्यापैकी 10.27 टक्के इतके म्हणजेच 78 लाख 39 हजार 447 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 13 हजार 457 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2 हजार 387 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 52 हजार 238 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रोनचे 237 रुग्ण
कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमयक्रोनने मुंबईत हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत पुणे, नागपूर मनपा हद्दीत रुग्ण आढळून येत होते. आज सापडलेल्या 237 रुग्णांपैकी 226 रुग्ण मुंबईतील आहेत. तर, 11 रुग्ण पुणे मनपातील असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. राज्यात मागील दोन आठवड्यांत ओमायक्रोनचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र, गुरुवारपासून पुन्हा रुग्ण आढळून येत आहेत. आजपर्यंत 3 हजार 768 एवढे रुग्ण बाधित झाले आहेत. तर, 2 हजार 334 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 8 हजार 804 जणांची जनुकीय चाचणी केली. 7 हजार 273 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 1 हजार 531 नमुने प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 349
ठाणे - 13
ठाणे मनपा - 65
नवी मुंबई पालिका - 72
कल्याण डोबिवली पालिका - 29
मीरा भाईंदर - 17
वसई विरार पालिका - 14
नाशिक - 178
नाशिक पालिका - 74
अहमदनगर - 197
अहमदनगर पालिका - 74
पुणे - 254
पुणे पालिका - 550
पिंपरी चिंचवड पालिका - 194
सातारा - 138
नागपूर मनपा - 272
हेही वाचा -Rahul Bajaj Passes Away : पद्मभूषण राहुल बजाज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार - मुख्यमंत्री