मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत सलग दोन दिवस 8 हजारांहून कोरोनाची नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज तब्बल 8, 832 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आज झाली आहे.
22:17 April 02
मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी 8 हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित, 20 जणांचा मृत्यू
मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत सलग दोन दिवस 8 हजारांहून कोरोनाची नवीन रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज तब्बल 8, 832 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 20 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद आज झाली आहे.
20:09 April 02
मुंबईत महिनाभरात कोरोनाचे ४६ हजार सक्रिय रुग्ण वाढले
मुंबई - मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. काही प्रमाणात हा प्रसार कमी झाला असतानाच फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचा प्रसार सुरू झाला. रुग्णसंख्या वाढत असतानाच सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. १ मार्च ते १ एप्रिल या महिनाभरात सक्रिय रुग्णांची संख्या ४६ हजाराने वाढली असून सध्या मुंबईत ५५ हजार ६९१ सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभरातील ही सर्वाधिक सक्रिय रुग्णांची नोंद आहे.
18:43 April 02
तासाभरापासून मुख्यमंत्री आणि टास्ट फोर्सची बैठक सुरू
मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी मागील एक तासांपासून बैठक सुरू आहे. मुख्य सचिव, पालिकेतील अधिकारी, आरोग्य तज्ज्ञ या बैठकीला उपस्थित आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक सुरू आहे. यात टाळेबंदीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
18:21 April 02
पुण्यातील संचारबंदीमधील काही निर्बंधांना भाजपचा विरोध
पुणे - काही कारणास्तव बाहेर असलेल्या नागरिकांना पोलिसांनी उठसुठ मारहाण करू नये, तारतम्य ठेऊन वागावे, असें खासदार गिरीश बापट म्हणाले. पीएमपीएमएल बस सेवा बंद ठेवण्याला आमचा विरोध आहे. शहरात बेडची संख्या वाढवण्याची गरज आहे. सायंकाळी सहानंतर संचारबंदी न करता रात्री आठनंतर संचारबंदी करावी, अशी मागणी बापट यांनी केली आहे. हॉटेल बंद ठेवायलाही बापट यांनी विरोध केला आहे. अनेकदा लोकं हॉटेलात बसून गप्पा मारत जेवतात, तर मग हॉटेलमध्ये उभे राहून खाद्यपदार्थ खायला परवानगी द्या, असे बापट यांनी सांगितले. त्यामुळे हॉटेल पूर्ण बंद न करता उभे राहून खायला परवानगी द्या, असे बापट म्हणाले.
18:06 April 02
नागपुरात आज 4108 नवे कोरोनाबाधित, 60 जणांचा मृत्यू
नागपूर - नागपुरात आज (2 एप्रिल) 4108 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 60 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 3214 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे नागपुरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
17:07 April 02
कोरोना उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स समितीची थोड्याच वेळात बैठक
मुंबई - कोविड उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स समितीची बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे. बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, टास्क फार्स आणि आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. कोरोनाबाबत राज्यासाठी नवीन गाईडलाईन तयार केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
16:27 April 02
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचे धोरण चुकीचे - नारायण राणे
मुंबई -मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी तयार आहेत, पण त्यांचे दोन पक्ष हे अनुकूल नाहीत. मुख्यमंत्र्यांचे धोरण चुकीचे आहे. अन्य राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होते, तर महाराष्ट्रात कशी वाढत आहे? असा प्रश्न विचारत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
16:21 April 02
मुंबई उच्च न्यायालय 18 एप्रिलपर्यंत ऑफलाईन सुनावणी सुरू ठेवणार
मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रधान खंडपीठ 18 एप्रिलपर्यंत ऑफलाईन सुनावणी सुरू ठेवणार आहे.
16:18 April 02
ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर पुरवठ्याबाबत सुक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी
नाशिक - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर पुरवठ्याबाबत सुक्ष्म नियोजन करुन जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागातील रुग्णालय व कोविड केअर सेंटरमधील बेडची संख्या वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
14:42 April 02
पुण्यात अंशत: लॉकडाऊन; 7 दिवसांसाठी बस, हॉटेल, धार्मिक स्थळं बंद
पुणे :पुण्यातील कोरोना परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधून माहिती दिली. पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.
14:32 April 02
अमिताभ बच्चन यांनी घेतली कोरोनाची लस
मुंबई-ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आज कोरोनाची लस घेतली आहे.
12:28 April 02
शासनाच्या नियमांचं पालन गरजेचं - डॉ. तात्याराव लहाने
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जी चिंतेची बाब असून, शासनाकडून जे नियम लागू करण्यात आले आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन केले जाण्याची गरज असल्याचे मत टास्क फोर्सचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केलं आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी, शासनाने आरोग्य व्यवस्था तयार करून ठेवली आहे. त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊन करायची गरज नाही. मात्र नियम कडक करण्याची गरज असल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितलं. राज्यात कोरोनाच्या दुसरी लाट असून नवीन विषाणू आहे का? याचा शोध घेतला जात आल्याची माहिती त्यांनी दिली. बदलत्या विषाणूमुळे आता संक्रमण तरुणांमध्ये तसेच लहान मुलांमध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र घाबरण्याचे कारण नसल्याचं देखील डॉ. तात्याराव लहाने यांनी स्पष्ट केलं.
11:30 April 02
मुंबईमध्ये कठोर निर्णय घेण्याची गरज - वडेट्टीवार
मुंबईत कोरोना चा प्रादुर्भाव वेगाने होत आहे, या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सध्या मुंबई लोकल बंद होणार नाही, मात्र कठोर निर्बंध नक्कीच लावण्यात येतील अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवरुन दिली आहे.
10:13 April 02
मुख्यमंत्र्यांची सायंकाळी बैठक..
राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत आढावा आणि पुढील निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सायंकाळी बैठक बोलावली आहे.
09:56 April 02
कोरोना आढावा घेण्यासाठी पुण्यात अजित पवारांची बैठक..
पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन निर्बंधाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
09:17 April 02
नागपूरच्या महापौरांना कोरोनाची लागण..
नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
09:00 April 02
रुग्णसंख्या वाढूनही लोकांना नाही गांभीर्य..
राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाही लोकांना अद्याप परिस्थितीचं गांभीर्य नाही. दादरमध्ये आज सकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळाली.
08:03 April 02
नाशकात कोरोना वाढतोय, मात्र तूर्तास लॉकडाऊन नाही - भुजबळ
नाशिकमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र गरीब, सर्वसामान्य नागरीकांचा विचार करता लॉकडाऊन करणं संयुक्तिक ठरणार नाही,अर्थचक्र चालू ठेवण्यासाठी लॉकडाऊन करणार नसून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिकमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
06:31 April 02
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा, वाचा एका क्लिकवर..
मुंबई -गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात कोरोनाच्या उद्रेकानं उच्चांक गाठला होता. त्यानंतर रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. फेब्रुवारी महिन्यात परिस्थिती नियंत्रणात आल्याचं चित्र होतं, पण आता रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्यानं वाढते आहे. गुरुवारी राज्यात नव्या 43 हजार 183 रुग्णाची नोंद झाली आहे. तर 249 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रोज वाढणारी रुग्णसंख्या आणि वाढणाऱ्या मृत्युंमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.