महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

By

Published : May 17, 2021, 9:28 AM IST

Updated : May 17, 2021, 10:58 PM IST

22:45 May 17

राज्यात 26 हजार 616 नवे कोरोनाग्रस्त, 48 हजार 211 कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज (दि. 17 मे) 26 हजार 616 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 516 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 48 हजार 211 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 54 लाख 5 हजार 68 जणांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत 48 लाख 74 हजार 582 जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण 82 हजार 486 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 4 लाख 45 हजार 495 सक्रिय रुग्ण आहेत.

22:24 May 17

मंगळवार, बुधवारी मुंबईत लसीकरण सुरू राहणार, काही लसीकरण केंद्र बंद राहणार

मुंबई- मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. आज (दि. 17 मे) तौक्ते वादळ येणार असल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. उद्या मंगळवार आणि परवा बुधवारी लसीकरण सुरू राहील, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

21:12 May 17

परभणी : शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी

बोलताना सहायक पोलीस निरीक्षक

परभणी - 'कोरोना' चा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि मनपा प्रशासनाने 3 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. या ठिकाणी वाहनधारकांची चौकशी करून, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आज तब्बल 632 विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहनधारकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच काही वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

21:01 May 17

'केंद्राकडून डिसेंबरपर्यंत दोनशे कोटी लस निर्मितीसाठी प्रयत्न'

बोलताना फडणवीस

औरंगाबाद -देशात सर्वाधिक लस महाराष्ट्राला देण्यात आल्या आहेत. लोकसंख्येप्रमाणे लस पुरवठा होत आहे. केंद्र सरकारकडून डिसेंबरपर्यंत दोनशे कोटी लसींची निर्मिती करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

20:35 May 17

नाशिकमध्ये आम आदमी पक्षाने मोदी सरकारला विचारला जाब, पोस्टर्स लावत फडणवीसांवर निशाणा

बोलताना पदाधिकारी

नाशिक - देशभरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, देशातील तरुण वर्गाला याचा लाभ मिळालेला नाही, यामुळे नाशिकमध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने जागतिक नेता म्हणून मिरवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लस निर्यात करुन देशातील तरुणांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्षाच्या वतीने मोदींना जाब विचारणारे पोस्टर्स पंचवटी परिसरात लावण्यात आले आहेत. लस नसल्याने जिल्ह्यासह राज्यभरातील 18 ते 44 वयोगटातील तरुणांचे लसीकरण थांबवण्यात आले आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात हीच परस्थिती असल्याने देशातील तरुणवर्ग संतप्त झाला आहे, असाही आरोप आपच्या वतीने करण्यात आला.

20:31 May 17

परभणी जिल्हा कोरोना अपडेट - जिल्ह्यात आज 280 कोरोनाबाधितांची नोंद, 10 जणांचा मृत्यू

परभणी -जिल्ह्यात एप्रिल महिन्यात प्रचंड वेगाने वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या मे महिन्यात मात्र आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. आज सोमवारी जिल्ह्यात 280 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, 10 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 15 दिवसांपासून नव्याने आढळणाऱ्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आज 650 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

20:15 May 17

मुंबईत 2 हजार 587 कोरोनामुक्त, 1 हजार 240 नवे रुग्ण

मुंबई- आज (दि. 17 मे) 1 हजार 240 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (सोमवारी) 2 हजार 587 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

20:10 May 17

जळगावात कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंधांची अंमलबजावणी; सकाळी 11 नंतर बाजारपेठेत 'शटर डाऊन'

आढावा घेताना प्रतिनिधी

जळगाव - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय घट होत आहे. मात्र, अद्याप कोरोनाची संपूर्ण साखळी तुटलेली नाही. सोमवारपासून (दि. 17) जळगाव जिल्हा प्रशासनाने 'ब्रेक दी चेन' अंतर्गत लागू केलेले निर्बंध आणखी कठोर केले आहेत. सकाळी 7 ते 11 दरम्यानच अत्यावश्यक सेवा खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यातदेखील गर्दी करणारे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. सकाळी 11 नंतर शहरातील संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे शटर डाऊन झाली. रस्त्यांवर अघोषित संचारबंदी पाहायला मिळाली. विनाकारण रस्त्यावर हिंडणाऱ्यांवर पोलिसांनी दंडुका उगारला.

20:01 May 17

केंद्रसरकार कडून जनतेचा आवाज दाबण्यात येतोय - नवाब मलिक

बोलताना मलिक

मुंबई -केंद्रातील मोदी सरकारकडून जनतेचा आवाज दाबण्यात येत आहे, अशी टीका अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी केली. विदेशात हक्काची लस पाठवली तर लोक प्रश्न विचारणारच ना? मात्र, तरही किती लोकांना भाजप सरकार अटक करणार? असा सवाल मंत्री नवाब मलिक यांनी केला.

17:42 May 17

ऑक्सीजन सिलिंडरचा अवैध साठा; 'त्याचा' परवाना रद्द करण्याचे आदेश

जालना -गरीबशहा बाजारात 9 एप्रिल रोजी मध्यरात्री एका गोदामावर छापा टाकून महसूल विभाग आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत ऑक्सिजनचे अवैध सिलिंडर जप्त केले होते. परवाना दिलेले ठिकाण सोडून इतरत्र या सिलिंडरचा साठा केल्या प्रकरणी परवाना धारकाचा परवाना रद्द करावा व पुढील कारवाई करावी, असे आदेश तहसीलदारांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले.

16:30 May 17

कोरोनामुळे 10 दिवसात एकाच कुटुंबातील 5, तर दुसऱ्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नाशिक -सिन्नर तालुक्यातील नांदूर-शिंगोटे येथे कोरोनामुळे शेळके कुटुंबियांच्या घरातील 5 व्यक्तींचा 10 दिवसात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाता आहे. तर, याच गावातील आव्हाड कुटुंबातील तिघेजण दगावल्याचीही घटना घडली आहे.

15:30 May 17

कोरोनाची तीसरी लाट रोखण्यासाठी शहरातील बालरोग तज्ज्ञांची स्थानिक प्रशासनासोबत बैठक

माहिती देताना महानगरपालिकेचे उपायुक्त आणि बालरोग तज्ज्ञ

सोलापूर -सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर व पालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार कोरोनाची तीसरी लाट रोखण्यासाठी आणि लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये यासंदर्भात आराखडा तयार करण्यात येत आहे. रविवारी सोलापूर शहरातील सर्व बाल रोग तज्ज्ञांची एकत्रित बैठक महापालिकेत घेण्यात आली. यात सोलापूर शहरातील बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते.

13:57 May 17

तातडीने उपचार देण्यासाठी अत्याधुनिक कोविड सेंटर महत्वाचे- देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद - कोविड काळात रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी कोविड सेंटर आवश्यक आहेत. भाजपचा उद्देश्य सेवा देणे असा आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील दोन भाजप आमदारांनी कोविड सेंटर सुरू केले असून तिथे मोफत उपचार मिळणार आहेत. अस मत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

12:47 May 17

कोरोनाने निधन तरी ही वीस पंधरा ते वीस हजारांच्यावर झाली अंत्यविधीला गर्दी

हिंगोली- कोरोनाशी झुंज देत अखेर 23 दिवसांनंतर राजीव सातव यांच रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर आज कळमनुरी येथे पंधरा ते वीस हजार जनसमुदायाच्या उपस्थित अंत्यसंस्कार पार पडले. वास्तविक पाहता कोरोनाने निधन झाल्यानंतर एवढा मोठा जनसमुदाय याठिकाणी उपस्थित होता. येथे कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात वारंवार सूचना दिल्या जात होत्या.

10:55 May 17

गोव्यात आणखीन ४३ कोरोनाबाधितांचा मृत्यू , कोरोना कहर थांबेना

पणजी (गोवा) - राज्यात गेल्या पाच दिवसांमध्ये १५,३७१ कोरोनाबाधित बरे झाले असून ११,०८२ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत ही गोव्यासाठी सकारात्मक बाब आहे. पाच दिवसांपूर्वी कोरोनाबाधित बरे होण्याची टक्केवारी ७० टक्क्यांपेक्षा खाली होती. ती आज ७७.७७ टक्के एवढी वाढली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये २९५ कोरोनाबाधित व्यक्ती मृत्यू पावल्या आहेत. तर रविवारी एका दिवसात ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

09:40 May 17

माढा कोरोना परिस्थिती - मदतीसाठी वेल्फेअरचा पुढाकार

माढा वेल्फेअर फौंडेशनच्या माध्यमातुन धनराज शिंदे यांच्या पुढाकारातुन ग्रामीण रुग्णालय माढा, जयश्री हॉस्पिटल टेंभुर्णी, पाटील हॉस्पिटल टेंभुर्णी,मित्रप्रेम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल माढा या ठिकाणी व्हेंटिलेटर मशीन तसेच आलेगाव, रांझणी, मोडनिंब, माढा, कंदर, करकंब व उंबरे येथील कोव्हिड केअर सेंटर; त्याचबरोबर कुर्डूवाडी येथील साखरे हॉस्पिटल, आधार हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

09:26 May 17

इथे डॉक्टरांच्या पुढाकाराने केले जातात कोरोना मृतकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार..

अमरावती :कोरोना मुळे देशात दरोरोज हजारो लोक मृत्यू मुखी पडतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामध्ये तर अगदी रक्ताचे नाते सुद्धा आपल्या आप्तस्वकीयांच्या अंत्यसंस्काराला देखील पाठ फिरावतानाचे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील काही देवमाणसांनी पुढाकार घेत "माणुसकी संघ" नावाचा एक उपक्रम सुरू करून कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत, माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.

09:25 May 17

लसीकरणाला निघताना सूचना तपासून घ्या, कोव्हिशील्ड लसीचा दुसरा डोस ३ महिन्यानंतर

नागपूर - केंद्र शासनाच्या लसीकरणासाठी नवीन सूचना आल्या आहेत. यानुसार आता कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसेसमधील अंतर बारा ते सोळा आठवडे असणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला असेल तर दुसरा डोस बारा ते सोळा आठवड्या नंतर दिला जाणार असल्याने घराबाहेर पडण्यापूर्वी तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे.

09:19 May 17

राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई -राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्यात आज (दि. 16 मे) एकाच दिवशी 59 हजार 318 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत राज्यात 48 लाख 26 हजार 371 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे 34 हजार 389 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत 53 लाख 78 हजार 452 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र, या लाटेत रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून राज्यात एकाच दिवसात 974 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

  • राज्यात 59 हजार 318 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
  • राज्यात आतापर्यंत 48 लाख 26 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
  • राज्यात नव्या 34 हजार 389 रुग्णांची नोंद झाली आहे.
  • राज्यात 24 तासांत 974 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.52 टक्के एवढा आहे.
  • राज्यात एकूण 53 लाख 78 हजार 452 रुग्णांची नोंद झाली आहे.
  • राज्यात एकूण 4 लाख 68 हजार 109 इतके सक्रिय रुग्ण आहेत.
Last Updated : May 17, 2021, 10:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details