नागपूर - केंद्र सरकारला ऑक्टोबर महिन्यातच कोरोनाची दुसरी लाट जास्त धोकादायक राहणार असे कळले होते. मात्र, केंद्र सरकारने त्याच्या पासून बचावासाठी धोरण तयार केले नाही. उलट मार्च महिन्यात भारतातून कोरोना संपला आहे असे जाहीर केले, त्यामुळे लस बनवणार्या कंपन्यांनी त्यांच्याकडचा साठा परदेशात विकणे सुरू केले . त्यामुळे आज लोकांना लस उपलब्ध होत नाही. केंद्र सरकारने लस उपलब्धतेसंदर्भात एक धोरण तयार करावे, असे नाना पटोले यांनी सांगितले आहे.
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण
16:11 May 13
केंद्र सरकारने लस उपलब्धतेसंदर्भात एक धोरण तयार करावे - नाना पटोले
13:03 May 13
काँग्रेसच्या माजी आमदार पुत्राची कोविड सेंटरमधील डॉक्टरला मारहाण
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्राचे कॉंग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेन्स गेडाम याने आरमोरी शासकीय कोवीड सेवा केंद्रावरील कर्तव्यावर असलेले डॉ अभिजित मारबते यांना मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ वायरल होताच तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. तेव्हा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीसांनी लारेन्स गेडाम याच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
13:02 May 13
राज्यात एक जूनपर्यंत कडक लॉकडाऊन
मुंबई - राज्यात एक जूनच्या सकाळी 7 वाजे पर्यंत कडक लॉकडाऊन वाढवण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले आहेत. या लॉकडाऊनमध्ये कोणत्याही वर्गाला दिलासा देण्यात आलेला नाही.
13:02 May 13
लसीकरण केंद्रावर पाहाटेपासून रांग, केंद्रावर मोठी गर्दी..
वर्ध्यात आजपासून लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे 5 वाजतापासून नागरिकांनी नंबर लावण्यासाठी गाठले लसीकरण केंद्र असल्याने मोठी गर्दी झालेली दिसून येत आहे.
13:01 May 13
उत्तर पुणे जिल्ह्यात आढळला म्युकोरमायकोसिसचा पहिला रूग्ण
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात धनगरवाडी गावात 65 वर्षीय महिलेला कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन दिवसांनी बुरशीजन्य आजार म्युकोरमायकोसिसचा संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी सकाळी नारायणगाव येथील डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्या अथर्व नेत्रालय नारायणगाव येथे सदर महिला डोळे तपासणीसाठी आली असता ही बाब निदर्शनास आली.
13:01 May 13
अहमदनगर- जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची दस्तक, ग्रामीण भागात दोन रुग्ण आढळले..
अहमदनगर - कोरोना रुग्णाला बाधित करणारा घातक असा म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आता नगर जिल्ह्यातही आढळून आल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यात एक-एक म्युकरमायकोसिसचा रुग्ण आढळला असून जामखेडच्या रुग्णांवर नगरमध्ये तर श्रीगोंदा येथील रुग्णांवर पुण्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
13:00 May 13
जळगाव जिल्ह्यात हातपाय पसरतोय 'म्युकरमायकोसिस'; आतापर्यंत 13 जणांना लागण, 6 जणांचा बळी!
जळगाव -जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ आता म्युकर मायकोसिस नावाचा बुरशीजन्य आजार हातपाय पसरत आहे. हा आजार दुर्मिळ आणि जुनाच आजार आहे. मात्र, कोरोनामुळे रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने त्याने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या स्टिरॉइड्समुळे हा आजार बळावत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाची दुसरी लाट धडकल्यानंतर जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. त्यात 6 जणांचा बळी गेला आहे.
13:00 May 13
एकीकडे कोरोनाचा कहर तर दुसरीकडे मोफत श्रीखंडासाठी सभासदांच्या रांगा
कोल्हापूर :कोरोनाने कोल्हापूरात अक्षरशः कहर केला आहे. काल दिवसभरात तब्बल 2300 नवे रुग्ण आढळले आहेत तर 58 जणांचा मृत्यू झाला आहे. असे असताना मोफत श्रीखंडासाठी नागरिकांनी भल्या मोठ्या रांगा लावल्याची घटना घडली आहे. वारणा दूध संघाच्या सभासदांसाठी हे वाटप सुरू होते. कोणतीही परवानगी घेतली नसतानाही हे वाटप सुरू असल्याने पोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले.
09:04 May 13
लसीकरण करा, साखर व तांदूळ घेऊन जा; आ. राजेश पाडवी यांचा उपक्रम
नंदुरबार - कोरोना प्रतिबंधक लसीकरणात वाढ व्हावी यासाठी शहादा-तळोदा मतदार संघाच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी लसीकरण केल्यास त्यांना प्रत्येकी दोन किलो तांदुळ व दोन किलो साखर दिली जाणार आहे. लॉकडाऊनमुळे अगोदरच मजुरांचा रोजगार गेला असून त्यांच्यासाठी ही एक मदत असणार आहे. म्हणुन नागरीकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन आ.राजेश पाडवी यांनी केले आहे.
09:03 May 13
कोरोना काळात राजकीय कार्यक्रम नको, औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश
औरंगाबाद -कोरोना काळात राजकीय नेत्यांचे कोणतेही कार्यक्रम नको असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. कोरोनाची दुसरी लाट भीषण असतानाही अनेक लोकप्रतिनिधी बिनधास्तपणे कार्यक्रम घेऊन गर्दी जमवत आहेत. याची गंभीर दखल घेत, हायकोर्टाने भूमीपूजन, आंदोलनं आणि मोर्चांना सध्या थारा नकोच, असे स्पष्ट केले आहे. राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्या हा काय फक्त लोकांसाठी नसून लोकप्रतिनिधी या कायद्यापेक्षा श्रेष्ठ नसल्याचा टोलाही औरंगाबाद खंडपीठाने लगावला.
09:03 May 13
पहिल्या लाटेतच जिल्ह्यातील दहा टक्के मुलांना झाला कोरोना
अकोला -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरी लाट सुरू झाली असली तरी या रुग्णांच्या संख्येत घट झाली नाही. परंतु, जिल्ह्यात पहिल्या लाटेपासूनच आतापर्यंत जवळपास पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी दहा टक्के मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. या मुलांपैकी एकही रुग्ण दगावला नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
08:17 May 13
नियम मोडाल तर कोविड सेंटरमध्ये जाल - आयुक्त बलकवडे
कोल्हापुर-घरी उपचार घेणाऱ्या कोविड रुग्ण व संशयितांनी नियम मोडले, तर त्यांना थेट कोविड सेंटर मध्ये पाठवण्यात येईल असा इशारा कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांनी दिला आहे. जर नियम मोडणाऱ्याची माहिती प्रशासनाला दिली तर त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
08:17 May 13
पंतप्रधान मोदींच्या दुर्लक्षामुळे देशावर कोरोनाचे संकट - बच्चू कडू
अहमदनगर- कोरोनाचे संकट महाराष्ट्रासह देशावर वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जगाला ओरडून सांगत होते की भारतातील कोरोना गेला म्हणून, पण झाले काय, आज भारतातील कोरोनाचा संसर्ग जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे पंतप्रधान नियोजन करण्यात चुकले असल्याची टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
06:25 May 13
सोलापुरात कोरोनाची रुग्णसंख्या घटली; मात्र मृतांचा आकडा वाढलेलाच
सोलापूर -सोलापूर शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट कमी होताना दिसत आहे. बुधवारी सोलापुरात एकूण 1,322 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मात्र मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण वेगाने सुरूच आहे.आज बुधवारी शहर आणि जिल्ह्यातील एकूण 44 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. लागण झालेल्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. सोलापुरात बुधवारी 1,404 रुग्ण बरे झाले आहे.
06:24 May 13
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू
वाशिम :कोरोनाच्या संकटातून वाशिम जिल्हा सावरत असतानाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने एका 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्याचा थेट परिणाम डोळ्यांवर होत असून, या म्युकरमायकोसिस आजारात रुग्णांचे डोळे निकामी होत आहेत.
06:24 May 13
बीड: आपेगाव येथे राजेसाहेब देशमुख यांनी सुरू केले 100 खाटांचे कोविड सेंटर
बीड-कोरोनाच्या हाहाकारामुळे ग्रामीण भागातला सर्वसामान्य नागरिक भयभीत झाला आहे. शहराच्या ठिकाणी आपल्याला चांगले आरोग्य सेवा मिळेल याचा विश्वास उडत चालला आहे. अशा बिकट परिस्थितीत ज्या त्या भागातील नागरिकांना त्यांच्या जवळच्याच कोविड सेंटरवर उपचार मिळाले तर कोविड रुग्णांना आपल्या लोकांमध्ये आपण उपचार घेत असल्याचे समाधान मिळते. याचाच विचार करून माजी शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख यांनी अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे शंभर खाटांचे कॉमेडी सेंटर सुरू केले असून येथे रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
06:22 May 13
ईद मुळे सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवत खरेदीसाठा गर्दी..
ठाणे : एकीकडे राज्य सरकार लॉकडाऊनच्या दिशेने असून कोरोनाच्या संख्याची घट कशी होईल याकडे लक्ष असताना, मुंब्रामध्ये रात्रीच्या वेळी ईद या सणापूर्वी दुकाने व बाजार पेठा सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र पोलीस आणि पालिका प्रशासनाचा या ठिकाणी कुठलाही धाक दिसून येत नाही.
06:20 May 13
राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
मुंबई - आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज (12 मे) 58 हजार 805 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 46 लाख 196 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागच्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं तरी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. राज्यात गेल्या 24 तासात 816 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, राज्यात 24 तासात नवीन 46 हजार 781 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संक्षिप्त माहिती
- राज्यात नवीन 46 हजार 781 जणांना कोरोना.
- राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या - 52,26,710.
- राज्यात 24 तासात 816 रुग्णांचा मृत्यू.
- राज्यात 24 तासात 58 हजार 805 रुग्ण कोरोनामुक्त.
- राज्यात आतापर्यंत 46 लाख 196 रुग्णांची कोरोनावर मात.
- राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या - 5 लाख 46 हजार 129.