महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

By

Published : May 4, 2021, 6:32 AM IST

Updated : May 4, 2021, 10:21 PM IST

22:18 May 04

राज्यात 51 हजार 880 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; बरे होण्याचे प्रमाण 85.16 टक्के

मुंबई -राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. आज 65 हजार 934 रुग्ण कोरना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 41 लाख 7 हजार 92 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.16 टक्के एवढे झाले आहे. तर, दुसरीकडे राज्यात आज 51 हजार 880 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एकीकडे रुग्ण जरी बरे होत असले, तरी 24 तासांत 891 रुग्णांनी उपचारादरम्यान आपले प्राण गमावले आहेत.

21:21 May 04

जळगावात लपून छपून व्यवसाय करणारी ११ दुकाने सील; महापालिकेकडून कारवाई

जळगावात लपून छपून व्यवसाय करणारी ११ दुकाने सील; महापालिकेकडून कारवाई

जळगाव - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने उघडण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र, तरीही शहरातील अनेक दुकानदार जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करताना दिसून येत आहेत. मंगळवारी (४ मे) देखील बळीराम पेठ भागातील अनेक दुकानदारांनी लपून छपून व्यवसाय सुरू ठेवला होता. महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने या भागात जाऊन तब्बल ११ दुकाने सील केली. प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला.

21:20 May 04

'राज्यातील 15 जिल्ह्यांत कोरोनाग्रस्तांची संख्या घटली'

मुंबई- राज्यात 36 पैकी सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या घटल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच अन्य 25 जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढ झाली आहे. मात्र, लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

19:42 May 04

सांगली जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक 'लॉकडाऊन', पालकमंत्र्यांची घोषणा

बोलताना मंत्री पाटील

सांगली- जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. 5 मे मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

19:40 May 04

दिलासादायक..! दिवसभरात 306 नवे कोरोनाग्रस्त, 704 झाले कोरोनामुक्त

जालना -गेल्या दोन महिन्यांपासून दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा आज (दि. 4 मे) घसरल्याचे दिसत आहे. दिवसभरामध्ये 306 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. मात्र, आणखी 2 हजार 990 संशयितांचे अहवाल येणे बाकी आहे. तर 13 कोरोनाग्रस्तांचा आपला जीव गमवावा लागला आहे.

18:50 May 04

उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात 10 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

कोल्हापूर - जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन लावण्याचा निर्णय आज (मंगळवारी) घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यात दूरदृश्यप्रणालीव्दारे बैठक पार पडली.

18:49 May 04

रेमडेसिवीर न घेताही 91 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज

पुणे - पुण्यातील 91 वर्षे वयाच्या वसंतराव पिसाळ या आजोबांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. शहरातील साई स्नेह कोविड सेंटरमध्ये हे आजोबा उपचार घेत होते. याशिवाय सुचेता केसरकर (वय 71) या ज्येष्ठ महिलेने देखील कोरोनावर मात केली आहे. या दोघांनाही आज (मंंगळवार) कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. विशेष म्हणजे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरा शिवाय हे दोघेही बरे झाले आहेत. कोविड सेंटरचे प्रमुख डॉ. सुनील जगताप, डॉ. सुमीत जगताप, वॉर्डबॉय आणि परिचारिका यांनी टाळया वाजवत नातेवाईकांच्या उपस्थितीत आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

17:25 May 04

कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी स्वराज्य प्रतिष्ठानकडून रत्नागिरीतील स्मशानभूमीला मोफत लाकूड

माहिती देताना सरपंच इलियास बंदरी

रत्नागिरी -लांजा तालुक्यातील वाघ्रट गावचे सुपूत्र, उद्योजक ऋषीनाथ पत्याणे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आज रत्नागिरी नगर परिषदेच्या स्मशानभूमीसाठी सुमारे 25 टन इतके लाकूड मोफत देण्यात आले. कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची अंत्यसंस्कारावेळी परवड होऊ नये या सामाजिक जाणीवेतून ही लाकडे देण्यात आली.

17:08 May 04

सिल्लोड तालुक्यात कोरोना उपाय योजनेसाठी भाजपचे धरणे आंदोलन

आंदोलक

सिल्लोड (औरंगाबाद) -सोयगाव तालुक्यातील कोरोनाच्या उपाय योजना करण्यासंदर्भात दि 3 मे रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयात धरणे आंदोलन करण्यात आले होते. मागण्या 8 दिवसात पूर्ण न झाल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालयात टाळे ठोक आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.

14:46 May 04

नागपुरात खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकडून ॲडव्हान्स वसुली- माजी महापौर संदीप जोशी यांचा आरोप

बोलताना माजी महापौर जोशी

नागपूर -खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरुच आहे, सरकारचा आदेश झुगारुन बहुतांश खासगी रुग्णालय रुग्णांकडून ॲडव्हान्स स्वरूपात वसुली करत आहेत. नागपुरातील आयुष्यमान नामक रुग्णालयाने एक रुग्णाकडून चक्क ॲडव्हान्स म्हणून तीन लाख रुपये वसूल केले. या संदर्भात रुग्णालयाने दिलेली ॲडव्हान्स रक्कम वसुलीची पावती दाखवत माजी महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्तांकडे याबाबत तक्रार केलीय. आणि संबंधित हॅास्पिटलवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

14:11 May 04

सांगली जिल्ह्यात तातडीने आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन

मुंबई -सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल(सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयंत पाटील यांनी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली.

14:11 May 04

कोरोना रूग्णाच्या उपचारामध्ये पोर्टेबल व्हेटींलेटरची उपयुक्तता तपासावी - पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूर :कोणत्याही परिस्थीतीत रुग्णांचा जीव वाचला पाहीजे या उद्देशाने व्हेटींलेटर,ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन या वैद्यकीय उपकरणांच्या उपलब्धतेची गरज आहे. त्यादृष्ट्रीनेच विदर्भातील तरुण अभियंत्यांनी तयार केलेल्या पोर्टेबल व्हेंटीलेटरच्या उपयुक्ततेची तपासणी करावी,असे आदेश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज प्रशासनाला दिले.

14:11 May 04

मुंबईकरांना मोफत आणि त्वरित लस द्या - भाजपा नगरसेवकांची महापौर दालनाबाहेर निदर्शने

मुंबई -'कोविड लस द्या..! लस द्या.. सर्वांना मोफत लस द्या, सर्वांना त्वरित लस द्या...!! मुंबईकरांचे प्राण वाचवा..!' अशा घोषणा देत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनाबाहेर आज जोरदार निदर्शने केली आहेत. पालिकेने लसीचे योग्य नियोजन करावे,प्रत्येक वयोगटातील नागरिकांना वेगळी रांग लावावी तसेच आलेल्या लसीच्या साठ्यातून मुंबईकरांना लस द्यावी अशी मागणी यावेळी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली.

14:10 May 04

जिल्ह्यात आणखी पाच ठिकाणी नवीन ऑक्सिजन युनिट सुरु करण्यात येणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

रत्नागिरी - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची अधिक आवश्यक भासत आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी पाच ठिकाणी नवीन ऑक्सिजन युनिट सुरु करण्यात येणार आहेत. पाली, रायपाटण, संगमेश्वर लांजा, मंडणगड या ग्रामीण रुग्णालयात नवीन ऑक्सिजन युनिट सुरु करण्यात येणार आहे. महिनाभरात प्रत्यक्षात सर्व युनिट सुरु होतील अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी ऑनलाइन पत्रकार परिषेदत दिली.

14:10 May 04

देशातील पहिल्या 'ड्राईव्ह इन' लसीकरण मोहिमेला सुरुवात

मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या राज्यात वाढताना दिसत आहे. पूर्ण चा प्रादुर्भाव जर कमी करायचा असेल तर लसीकरण हाच एक मार्ग सध्या दिसत आहे यामुळे जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. त्याच लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी देशातील पहिले 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्राचे लोकार्पण खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.या लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्यांच्या कारमध्येच लस देण्यात येणार आहे.

14:09 May 04

कोविडमुळे अनाथ बालकांच्या फायदा घेणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई - कोविड-19 च्या आजारात दोन्ही पालक गमवावे लागलेल्या बालकांना बेकायदेशीररित्या दत्तक वा त्यांची विक्री करण्याचे प्रयत्न होत असल्याचे समाजमाध्यमांवरील पोस्ट पाहता दिसून येत आहेत. अशा घटनांना रोखण्यासाठी त्याची माहिती मिळाल्यास 1098 या हेल्पलाईनशी संपर्क साधावा अथवा सारा महाराष्ट्रच्या (स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) 8329041531 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन महिला व बालविकास आयुक्तालयाने केले आहे. समाजकंटकांकडून अनाथ बालकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेण्याच्या घटना गंभीर असून त्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही विभागाने कळवले आहे.

10:52 May 04

अहमदनगर- रेमडीसीवीरचा काळा बाजार करणार्यांवर गुन्हे अन्वेषणची धडक कारवाई, तिघांना अटक

अहमदनगर- जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत रेमडेसिवीर इंजेक्शनची काळ्या बाजारात जास्त दराने विक्री करणारे तीन आरोपी ,वाहन आणि तीन रेमडेसिवीर इंजेक्शन असे एकूण ७ लाख ३२ हजार ८५० रुपये किमतीचे मुद्देमालासह आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून अटक केली आहे. 

10:52 May 04

खा. सुजय विखे रेमीडिसिव्हीर वाटप प्रकरण - राजकीय हेतूसाठी इंजेक्शन वाटप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

औरंगाबाद- विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शनाचा साठा व वाटप केल्याप्रकरणात अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांच्याविरोधात हायकोर्टात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत, याचिकाकर्त्यांनी दुरुस्ती अर्ज दाखल केला. एका बातमीच्या आधारे राज्यात विविध ठिकाणी काही राजकीय नेत्यांनी, त्यात माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, शरद पवार व रोहित पवार, आमदार अमरीश पटेल यांनीही कायदेशीर अधिकार नसताना रेमडेसिवीर इंजेक्शनचे वाटप केल्याचा आरोप केला आणि त्यांच्यावर कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.

10:51 May 04

बँकांमधील गर्दी देतेय कोरोनाला निमंत्रण ; बँक प्रशासनही हतबल

वाशिम : संचारबंदीच्या काळात प्रशासनाने विविध स्वरूपातील निबंध लागू केले; मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. विशेषतः बँकांमध्ये दैनंदिन नागरिकांची गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे. नागरिकांची होणारी गर्दी रोखण्यात बँक प्रशासनही हतबल झाले असून या प्रकारामुळे कोरोनाला निमंत्रण मिळत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचे संकट दिवसागणिक गंभीर होत चालले आहे . एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यात कोरोनाने बाधित ९ हजार रुग्ण आढळले होते; मात्र पुढील दोनच महिन्यांत हा आकडा तब्बल तिप्पटीने वाढून २७ हजारांवर पोहोचला आहे. असे असतानाही नागरिक अद्याप बेफिकीर असून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे अनेकांकडून उल्लंघन केले जात आहे.

09:08 May 04

जालना - किमान भाडे तरी रद्द करा; चौपाटीवरील व्यवसायिकांची मागणी

जालना -गेल्या वर्षभरापासून जालना शहरातील एकमेव असलेली मोतीबाग बंद आहे. त्यामुळे या परिसरात खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे काम बंद आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे अवघड झाले असताना नगरपालिकेचे भाडे भरायचे कसे? असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे. त्यामुळे शासनाने उदरनिर्वाह भत्ता द्यावा, नाहीतर किमान पालिकेने एका वर्षाची तरी भाडे माफ करावे अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.

09:08 May 04

वेळ घेऊनच लसीकरण, प्रत्येक वयोगटासाठी वेगळ्या रांगा, भाजपाची मागणी

मुंबई - मुंबईत कोरोना लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व मुंबईकरांचे लसीकरण मोफत करावे, 45 वर्षावरील नागरिकांसाठी वेगळी रांग असावी, 80 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी स्वतंत्र रांगेची सोय करावी, नोंदणी नंतर वॉक इन लसीकरण न करता कोविन ऍपवर वेळ घेऊनच लसीकरणाची तारीख आणि वेळ मिळाल्यावर लसीकरण करावे आदी मागण्या भाजपाचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल व अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 

09:08 May 04

वर्धा - इथं गावात कोणालाही प्रवेश नाही!

वर्धा - कोरोनाचा संक्रमण आता शहरांपासून ग्रामीण भागातही जाऊन पोहचले आहे. कोरोनाने गावे भीतीच्या सावटाखाली जगत आहे. यासाठी आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी या गावात बाहेरच्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. या गावात 70 पेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे बाहेर गावातून भाजीपाला असो की अन्य व्यवसायिकांना आठ दिवसासाठी प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

09:08 May 04

कोरोनामुळे आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा मृत्यू

औरंगाबाद -कोरोनाचा उद्रेक वाढत असून त्यात प्रतिभावान अधिकारी देखील गमावले आहेत. आयआरएस अधिकारी अनंत तांबे यांचा ३२ व्या वर्षी कोरोनामुळे औरंगाबादेत उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे अतिरिक्त खासगी सचिव म्हणून ते काम पाहत होते. शहरातील खासगी रुग्णालयात २३ एप्रिल रोजी त्यांना दाखल केले होते.मात्र सोमवारी कोरोनासोबतचा लढा देताना त्यांचा मृत्यू झाला.

08:51 May 04

नागपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी विविध विषयाचा घेतला आढावा

नागपूर - जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग काळात संपूर्ण यंत्रणा रुग्णसेवेत लागली आहे. या सोबतच लॉकडाऊमध्ये अन्नधान्य पुरवठा, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, लसीकरण, गृह अलगीकरण, मायक्रो झोन निर्मिती, कॉल सेन्टरची संपर्क व्यवस्था आदी बाबींची काळजी घेण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. आयुक्त कार्यालयात बैठकीत हे निर्देश प्रशासनाला दिले.

08:50 May 04

नागपूर - सर्व दहन घाटांवर निःशुल्क लाकडांसंदर्भात फलक लावा, आरोग्य समिती सभापती यांचे निर्देश

नागपूर :कोरोनामुळे मृत्यू होणा-या व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी मनपाच्या सर्व दहन घाटांवर नि:शुल्क लाकडे पुरविण्याचा नागपूर महानगरपालिकेद्वारे निर्णय घेण्यात आलेला आहे. याशिवाय इतर व्यक्तींच्या अंत्यसंस्कारासाठी सर्व घाटांवर ब्रिकेट्स सुद्धा नि:शुल्क आहेत. मात्र यासंबंधी नागरिकांमध्ये अनेक संभ्रम दिसून येतात. शिवाय दहन घाटांवर काही लोक शुल्क घेत असल्याचे सुद्धा दिसून येत आहेत. यासंबंधी तातडीने कार्यवाही करून दहन घाटांच्या दर्शनी भागावर नि:शुल्क लाकडांच्या पुरवठ्याबाबत मनपाच्या आदेशाचे फलक लावण्यात यावे, असे निर्देश वैद्यकीय सेवा आरोग्य विशेष समिती सभापती महेश महाजन यांनी दिले.

08:49 May 04

वाशिम - रिक्षामध्येच ऑक्सिजन लावत केली कोरोना रुग्णाची तपासणी

वाशिम : रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि डिस्चार्जनंतरही ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना वाहनांमध्येच ऑक्सिजनची व्यवस्था करुन वाशिम येथील खासगी कोविड हॉस्पिटल येथे यावे लागत आहे. असाच एक रुग्ण एका खासगी कोविड हॉस्पिटल येथे ऑटोमध्ये ऑक्सिजन लावून आला असता, त्याला ऑटोमध्येच तपासण्यात आले. वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आणि मागणीच्या तुलनेत लस, ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा होत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांनादेखील गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

08:48 May 04

नागपूर - ४५ वर्षे वयोगटाच्या वरील नागरिकांचे आजही लसीकरण होणार नाही..

नागपूर -शहरातील ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे आजही (मंगळवारी) मनपाच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली आहे. महत्वाचे म्हणजे लसींचा साठा उपलब्ध नसल्याने गेल्या चार दिवसांपासून लसीकरण ठप्प झालेलं आहे. पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध न झाल्यामुळे लसीकरण होणार नसले तरी लस उपलब्ध झाल्या नंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल, असे ही त्यांनी सांगितले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यलय व रुग्णालयामध्ये कोव्हॅक्सीनचा दुसरा डोज दिला जाईल असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

08:47 May 04

सिल्लोड येथील कोविड सेंटरचे काम येत्या 15 दिवसात पूर्ण करा - राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

औरंगाबाद : सिल्लोड कोरोना साथ रोगाचा प्रादुर्भाव पाहता तालुक्यातील सद्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी तसेच तज्ञांनी वर्तवलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासंदर्भात महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार ( दि.3 ) रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक संपन्न झाली. बैठकी नंतर उपजिल्हा रुग्णालय जवळ सुरू असलेल्या कोविड सेंटर कामाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. सिल्लोड येथील सुरू असलेले कोविड सेंटर चे काम येत्या 15 दिवसात पूर्ण करा असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणेला दिले आहेत.

08:47 May 04

बुधवारपासून इस्लामपुरात जनता कर्फ्यू..

इस्लामपूर :नागरिकांना पुरेशी व्यवस्था करण्यासाठी मध्ये एक दिवसाचा वेळ देत शहरात बुधवार (५) पासून कडक जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला. शहरातील रुग्णसंख्या 300 वर गेल्याने पदाधिकारी आणि प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ५ ते ९ मे अखेर हा जनता कर्फ्यु असेल, असे जाहीर करण्यात आले आहे.

08:46 May 04

मुंबईत १८ व ४५ वर्षावरील वयोगटातील लसीकरण आज सुरू..

मुंबई - मुंबईत कोरोना लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लसीचा तुटवडा जाणवत आहे. लसीच्या तुटवड्यामुळे ४५ वर्षावरील लसीकरण गेले चार दिवस बंद होते. ते लसीकरण आज मंगळवार पासून सुरू होत आहे. त्याचप्रमाणे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण केले जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

08:46 May 04

पुणे जिल्ह्यात निम्म्यापेक्षा कमी रेमडीसिव्हिर इंजेक्शन..

पुणे : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांना मागणीच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी रेमडीसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांना अजूनही रेमडीसिव्हिरचा तुटवडा भासत आहे. जिल्ह्यातील 626 खासगी कोविड रुग्णालयांमध्ये 16 हजार 68 ऑक्सिजनयुक्त आणि आयसीयू बेड्स उपलब्ध आहेत. येथील कोरोना बाधित रुग्णांसाठी प्रशासनामार्फत सोमवारी (दिनांक 3) पाच हजार 65 रेमडीसिव्हिरचा पुरवठा करण्यात आला आहे.
 

05:56 May 04

राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई -राज्यातील कोरोबाधितांच्या प्रमाणात काही अंशी घट झाल्याचे चित्र आहे, मात्र अद्यापही धोका टळलेला नाही. सोमवारी दिवसभरात राज्यामध्ये 48 हजार 621 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 59 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचले असून, दिवसभरात कोरोनामुळे 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात सोमवारी 48 हजार 621 रुग्णांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 47 लाख 71 हजार 022 पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 59 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांची एकूण संख्या 40 लाख 41 हजार 158 वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात 567 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 6 लाख 56 हजार 870 रुग्ण सक्रिय आहेत.

Last Updated : May 4, 2021, 10:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details