महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

By

Published : May 3, 2021, 7:17 AM IST

Updated : May 3, 2021, 9:29 PM IST

21:28 May 03

आज मुंबईत कोरोनाचे 2662 नवे रुग्ण; 78 रुग्णांचा मृत्यू

मुंबई -गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होताना दिसत आहे. आज सोमवारी 2662 नवे रुग्ण आढळून आले असून 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 5746 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या प्रमाणात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

21:05 May 03

राज्यात सोमवारी 48 हजार 621 कोरोनाबाधितांची नोंद, 567 जणांचा मृत्यू

मुंबई - राज्यातील कोरोबाधितांच्या प्रमाणात काही अंशी घट झाल्याचे चित्र आहे, मात्र अद्यापही धोका टळलेला नाही. सोमवारी दिवसभरात राज्यामध्ये 48 हजार 621 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 59 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचले असून, दिवसभरात कोरोनामुळे 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोना स्थिती

राज्यात सोमवारी 48 हजार 621 रुग्णांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 47 लाख 71 हजार 022 पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 59 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांची एकूण संख्या 40 लाख 41 हजार 158 वर पोहचली आहे. तर आज दिवसभरात 567 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 6 लाख 56 हजार 870 रुग्ण सक्रिय आहेत.

20:39 May 03

आर्थिक मदतीसाठी रिक्षा चालकांना आपले आधार कार्ड बँक खात्याला करावे लागणार लिंक

मुंबई -राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील १२ लाख परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यामुळे  राज्यातील रिक्षा चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र हे दीड हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी संबंधित रिक्षाचालकांना आपले आधार कार्ड बॅंकेशी संलग्न (लिंक) करावे लागणार आहे. आपले आधार कार्ड बॅंकेला लिक करण्याचे आवाहन रिक्षा चालकांना राज्य परिवहन आयुक्तांकडून करण्यात आले आहे. दरम्यान यासाठी लवकरच एक नवी प्रणाली विकसीत करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी आयुक्तांनी दिली.

20:11 May 03

मुंबईच्या वाट्याचा ऑक्सिजन नवी मुंबई, ठाण्याकडे वळवला; महापालिकेची पुरवठादाराला नोटीस

मुंबई -कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याने ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. या पार्श्वभूमीवर पुरेसा ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी पालिका प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. असे असताना पुरवठादार कंपन्यांकडून मुंबईसाठी आलेला ऑक्सिजन ठाणे आणि नवी मुंबईकडे वळवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेने पुरवठादाराला नोटीस बजावली असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

19:42 May 03

मुंबईकरांनो कोरोना चाचण्यांसाठी पुढे या, महापालिका आयुक्तांचे आवाहन

मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईमधून कोरोनाला हद्दपार करायचे असल्यास कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी लागेल, त्यामुळे चाचण्यांसाठी मुंबईकरांनी पुढे यावे, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी केले आहे.

मुंबईत गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेकडून कोरोना चाचण्या आणि लसीकरण यावर भर देण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, महापालिकेकडून चाचण्यांचा देखील वेग वाढवण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात दररोज सरासरी 24 हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत होत्या. तर एप्रिल महिन्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवून दिवसाला सरासरी 44 हजार एवढे करण्यात आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोना चाचण्याचे प्रमाण घटले असून, ते आता दिवसाकाठी २८ हजारांवर आले आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आयुक्तांकडून कोरोना चाचण्या करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

19:03 May 03

यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी 1 हजार 399 कोरोनाबाधितांची नोंद, 28 जणांचा मृत्यू

यवतमाळ -गेल्या 24 तासांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात 1 हजार 399 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 1 हजार 161 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे गेल्या 24 तासांमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांपैकी तीन जण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 21 जणांचा मृत्यू झाला असून, कोविड हेल्थ सेंटरमध्ये एक तर खासगी रुग्णालयात 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

18:06 May 03

यवतमाळ : जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात

यवतमाळ -महाराष्ट्र दिनापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे, या लसीकरणासाठी जिल्ह्यात साडेसात हजार लसींचे डोस प्राप्त झाले असून, जिल्ह्यात पाच केंद्रांच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. यात यवतमाळ शहरातील लोहारा व पाटीपुरा केंद्र तर पुसद, दारव्हा आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे.

18:05 May 03

मुंबई : आज लसीचा साठा उपलब्ध होणार, उद्यापासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात

मुंबईमध्ये 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेदरम्यान सध्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी वेगळा लसीचा साठा देण्यात आल्याने त्यांनाही 1 मे पासून लस दिली जात आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद आहे. आज रात्री लसीचा साठा आल्यावर 45 वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण केले जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

15:20 May 03

नागपूरमध्ये आढळला 'डबल म्यूटंट' कोरोना व्हायरसचा स्ट्रेन

नागपूरमध्ये 'डबल म्यूटंट' कोरोना व्हायरसचा स्ट्रेन आढळून आला आहे. 74 नमुन्यांपैकी 35 नमुन्यात हा नवा स्ट्रेन आढळून आला.

15:10 May 03

आदर पुनावाला यांना जीवे मारण्याची धमकी, कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी

आदर पुनावाला यांना जीवे मारण्याची धमकी, कॉंग्रेस राष्ट्रवादीकडून चौकशीची मागणी

पुणे -सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख आदर पुनावाला यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. पुनावाला यांनी वॅक्सिनसाठी भारतातील शक्तिशाली लोक त्रास देत असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. पुनावाला यांना नुकतीच भारत सरकारने वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. पुनावाला यांनी टाईम या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारतातील शक्तिशाली लोक कोविशील्ड लस मिळवण्यासाठी फोन करून दबाव टाकत आहेत. त्यांच्या या आरोपानंतर भारतात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता राजकारण पेटलं असून, काँग्रेस नेते नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

12:58 May 03

चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांनी फोडले पनवेल मधील पटेल रुग्णालय..

नवी मुंबई :पनवेल मधील पटेल हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीने महिलेवर उपचार केल्याने महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत, रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

12:58 May 03

जैन मुनींना ओळखपत्राविना मिळणार लस, शिवसेनेच्या मागणीला यश

मुंबई : कोरोनाचे संकट देशात पाय पसरताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करायचा असेल तर जास्तीत जास्त लसीकरण हाच मार्ग सध्या दिसत आहे. मात्र जैन मुनी, सर्वधर्मीय साधुसंत ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि लसीकरणासाठी लागणारी कागदपत्रे नसल्यामुळे त्यांचे लसीकरण कसे होणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र कागदपत्रे नसले तरी त्यांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी महापालिका आयुक्त यांना केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती सावंत यांनी दिली आहे.

12:57 May 03

ऑक्सिजन निर्मितीचा श्रीगणेशा! राहाता व कोपरगाव तालुक्यातील रूग्णांना संजीवनी मिळणार..

अहमदनगर :राहाता तालुक्यातील लोहारे येथील लिक्वीड अभावी बंद असलेल्या ऑक्सीजन प्लॅन्टला आज दहा टन लिक्वीड उपलब्ध झाले आहे. या प्लॅन्टमध्ये ऑक्सिजन निर्मितीला तातडीने सुरूवात करण्यात आली असून राहाता व कोपरगाव तालुक्यातील रुग्णांना संजीवनी मिळणार आहे.

10:42 May 03

शासकीय कोविड केंद्रामध्ये विनामूल्य सेवा देण्याचा उरणच्या डॉक्टर संघटनेचा निर्णय..

रायगड :उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन या डॉक्टर संघटनेने येथील शासकीय कोव्हीड केंद्रामधील रुग्णांसाठी मोफत सेवा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे उरण तालुक्यातील रुग्णांना अधिक चांगली सेवा मिळणार असून, मोठ्या शहरांमधील रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची आकडेवारी कमी होणार आहे. या केंद्रामध्ये डॉक्टर आणि इतर कर्मचारी संख्या कमी असल्याने, रुग्णसेवेत अडथळा येत असल्याने खाजगी डॉक्टर संघटनेने हा निर्णय घेतला आहे.

10:41 May 03

पुणे : लससाठा न आल्याने 45 वर्षावरील नागरिकांसाठी आजही लसीकरण नाही

पुणे :शासनाच्या सूचनेनुसार एक मे पासून पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनावरील लसी देण्यास सुरुवात झाली आहे. या लसीकरणासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे शहरातील कमला नेहरू रूग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय या दोन्ही रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय 45 वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी असलेली पुणे महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्र पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्या कारणाने बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

10:40 May 03

बीड : २४ तासांत दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू; आतापर्यंत सात जणांनी गमावले प्राण

बीड- स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होऊ लागली आहे. २४ तासांत दोन पोलीस अंमलदारांचा कोरोनामुळे बळी गेला. पोलीस नाईक सुबराव जोगदंड व पोलीस अंमलदार दीपक सुळ अशी त्यांची नावे आहेत. त्यांना वाचविण्यासाठी नातेवाईकांनी शर्थीचे प्रयत्न केले;परंतु दुर्दैवाने ते असफल ठरले. दरम्यान, आतापर्यंत जिल्हा पोलीस दलातील सात जणांना कोरोनाने हिरावून नेले आहे.

08:57 May 03

नागपूर : आज बहुतांश लसीकरण केंद्र राहणार बंद..

लसीअभावी आज नागपूरातील बहुतांश लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे १८ वर्षांवरील व्यक्तींना देण्यासाठी सहा हजार डोस आले होते. दोन दिवसात यातील हजार डोस संपले. आता केवळ पाच हजार डोस शिल्लक आहेत. हे डोस १८ वर्षांवरील वयोगटातील लाभार्थ्यांना द्यावयाचे आहेत. साठा संपल्याने रविवारीच शहरातील १८९ केंद्रांपैकी १५९ केंद्रांवरील लसीकरण ठप्प होते, त्यामुळे आता सोमवारीही शहरातील लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत.

08:51 May 03

लसीचा तुटवडा - आज १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण सुरू, ४५ वर्षावरील बंद

मुंबई -मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असल्याने लसीचा तुटवडा आहे. यामुळे पालिकेने ४५ वर्षावरील सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण बंद केले आहे. मात्र त्याचवेळी १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. आज १८ ते ४४ या वयोगटातील लाभार्थ्यांचे ५ लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जाणार असून प्रत्येक केंद्रांवर ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. कोविन ऍपवर संदेश आले आहेत अशा लाभार्थ्यांनाच लस दिली जाणार असल्याने इतर लोकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. 

08:50 May 03

अहमदनगर - शहरात लसीकरण केंद्रावर नागरिकांची झुंबड..

अहमदनगर -महापालिकेच्या आरोग्य विभागाने 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेचा रविवारी दुसरा दिवस होता, यावेळी नागरीकांनी लस घेण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्या परंतु अनेकांनी ऑनलाइन नोंदणी केलेली नसल्याने केंद्रावर एकच गोंधळ उडाला होता. राज्य शासनाने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिली आहे त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी नुसार केंद्र, दिनांक आणि वेळ संबंधितांना दिली जाते. असे असले तरी केवळ आधार कार्ड घेऊन नागरिक लसीची मागणी करत आहेत.

08:50 May 03

औरंगाबाद : कोरोनामुळे 9 महिन्याच्या मुलीचा मृत्यू, आता पर्यंत चार बालकांनी गमावला जीव

औरंगाबाद - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वयोवृद्धांसह तरुणांची मृत्यू संख्या वाढत आहे. त्यातच आता लहान मुलांचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 9 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. आतापर्यंत 4 बाळांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

08:49 May 03

अमरावती : चिखलदऱ्यासह आठ गावं सील..

  • मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात कोरोनाचा कहर.
  • चिखलदरा पर्यटनस्थळासह आठ गावे सील.
  • चिखलदऱ्याच्या नाक्यावरून ये-जा करणारी वाहतूक पूर्णपणे बंद.
  • चिखलदरा तालुक्यातील चिखलदरा, काटकुंभ, डोमा, चुरणी, चिखली, सेमाडोह, खंडूखेडा, हतरु या गावांचा समावेश.
  • जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा बैठकीत निर्णय.

06:28 May 03

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई -राज्यात आज (दि. 2 मे) नव्या 56 हजार 647 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे असून 669 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 51 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.31 टक्क्यांवर आहे.

राज्यातील कोरोनाची स्थिती

  • राज्यात 51 हजार 356 रुग्ण 24 तासात कोरोनामुक्त झाले आहेत.
  • राज्यात आतापर्यंत 39 लाख 81 हजार 658 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
  • राज्यात नव्या 56 हजार 647 रुग्णांची नोंद झाली आहे.
  • राज्यात 24 तासांत 669 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.
  • राज्यात एकूण 47 लाख 22 हजार 401 रुग्णांची नोंद झाली आहे.
  • राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 68 हजार 353 इतकी झाली आहे.
Last Updated : May 3, 2021, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details