महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - महाराष्ट्र कोरोना रुग्ण

Maharashtra Corona situation LIVE updates on ETV Bharat
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

By

Published : Apr 30, 2021, 6:20 AM IST

Updated : Apr 30, 2021, 10:37 PM IST

22:35 April 30

राज्यात दिवसभरात 62 हजार 919 रुग्णांची नोंद, ८२८ रुग्णांचा मृत्यू

मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जरी वाढत असलं तरी नव्याने रुग्ण वाढीचे प्रमाण जैसे थेच आहे आजही राज्यात 62 हजार 919 रुग्णांची नोंद झाली आहे तर आज उपचारादरम्यान 828 रुग्णांचा मृत्यू झालाय., राज्यात मृत्यूदर 1.5% इतका आहे. तसेच राज्यात 24 तासात 69 हजार 710 रुग्णांनी कोणावर मात केली आहे, असे असले तरी मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत भर घालणारी आहे.

20:47 April 30

दिलासादायक.. मुंबईत आज नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जवळपास दुप्पट

कोरोना

मुंबईत आज 3 हजार 925 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 48 हजार 624 वर पोहचला आहे. आज 89 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 13 हजार 161 वर पोहचला आहे. 6 हजार 380 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 72 हजार 431 वर पोहचली आहे.  

20:45 April 30

मुंबईत रोजच्या चाचण्यांची संख्या ५० हजारावरून ३५ हजारावर

मुंबईत रोजच्या चाचण्यांची संख्या ५० हजारावरून ३५ हजारावर

मुंबईत कॅम्प लावून तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांच्या कोविड चाचण्याही करण्यात येत होत्या. आता हे प्रमाण कमी झाल्याने चाचण्याची संख्या कमी झाली आहे. कोविडच्या रोजच्या चाचण्याची संख्या ५० हजारावरुन ३५ हजारांवर आली आहे. तसेच बाधित रुग्णांची संख्याही कमी झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. मुंबईत एप्रिल महिन्याच्या मधल्या काळात १०० चाचण्यामागे २५ ते २६ व्यक्ती बाधित असल्याचे आढळत होते. ते प्रमाण आता १२  ते १४ टक्‍क्‍यांच्या दरम्यान आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

20:12 April 30

कोल्हापुरात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे एक मेपासून प्रायोगिक तत्वावर लसीकरण

कोल्हापुरात एक मेपासून प्रायोगिक तत्वावर लसीकरण

कोल्हापूर - १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना प्रायोगिक तत्वावर उद्यापासून लसीकरणास सुरुवात होणार आहे. १ मे पासून जिल्ह्यातील ५ केंद्रावर ही लस देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक १ मे २०२१ रोजी प्रायोगिक तत्वावर ग्रामीण रुग्णालय शिरोळ, वसाहत रुग्णालय गांधीनगर, ग्रामीण रुग्णालय कागल, प्राथमिक आरोग्यकेंद्र भेडसगाव( ता. शाहुवाडी), भगवान महावीर दवाखना, विक्रमनगर कोल्हापूर या पाच शासकीय संस्थेच्या ठिकाणी १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करुन शुभारंभ होणार आहे. 

17:27 April 30

महाराष्ट्र दिनानिमित्त लसीकरणाचा मुहूर्त.. १८ ते ४४ वयोगटापर्यंतच्या व्यक्तींना मिळणार लस

पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई - कोरोना लसींअभावी राज्यातील लसीकरण केंद्र बंद झाली असताना, महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटापर्यंतच्या व्यक्तींना लस देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली. लस अतिशय कमी स्वरुपात उपलब्ध असल्याने सुरुवातीला राज्यातील निवडक केंद्रावर लस दिली जाईल. मात्र, ज्यांची नोंदणी होईल, त्यांनीच केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन मंत्री टोपे यांनी केले. मुख्यमंत्री याबाबत अधिकृत घोषणा करतील, असेही ते म्हणाले.

17:09 April 30

तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल तर वेगात लसीकरण होणे गरजेचे

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत भाष्य करताना डॉक्टर

पुणे - राज्यात सध्या कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे मोठ्या वेगाने दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि आरोग्य यंत्रणा दुसऱ्या लाटेच्या प्रकोपाला धैर्याने तोंड देत असताना सप्टेंबर मध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार असे सांगितले आहेत आहे, मुख्यमंत्र्यांनी देखील याबाबत भाष्य केले असून तिसरी लाट गृहीत धरून राज्यात जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

17:09 April 30

घरच्यांनी अंत्यविधीला येण्यास नाकारले मात्र खाकीने दिला अग्नी

पुणे - शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका परप्रांतीय व्यक्तीचा मृत्यू झाला. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये हजर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या व्यक्तीचा मृतदेह शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला शवविच्छेदन झाले. मात्र मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यास कोणीच नाही, मात्र यावेळी घरच्यांनी अंत्यविधी नाकारला असताना पोलीस शिपाई अंबादास थोरे यांनी सदर व्यक्तीचा मृतदेहाला अग्नी देत अंत्यविधी केला असल्याने खाकीतील माणुसकीचे अनोखे दर्शन शिक्रापुरात घडले आहे.

14:50 April 30

21 ते 30 एप्रिल दरम्यान राज्यासाठी केवळ 4 लाख 35 हजार रेमडेसिवीरचा साठा, टंचाई कायम

मुंबई -गंभीर कोरोनासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन वावरले जात असून राज्यात मागील महिन्याभरापासून या इंजेक्शनचा मोठा तुटवडा राज्यात आहे. सध्या राज्याला अंदाजे 65 हजार इंजेक्शनची गरज असताना दिवसाला अंदाजे 30 हजार इतकेच इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. कारण केंद्र सरकारकडून 21 ते 30 एप्रिल या दिवसाच्या कालावधीसाठी 4 लाख हजार इंजेक्शन पुरवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार दिवसाला 28 ते 30 हजार इंजेक्शन उपलब्ध होत असून अंदाजे 35 हजार इंजेक्शनचा तुटवडा असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) ने दिली आहे. 

12:12 April 30

आज सायंकाळी मुख्यमंत्री जनतेशी साधणार संवाद..

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यात वाढवलेला लॉकडाऊन, कोरोना रुग्णांची संख्या, लसीकरण मोहीम आणि ऑक्सिजनचा पुरवठा यासंदर्भात ते बोलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

11:37 April 30

कोल्हापूरात एका दिवसात तब्बल 40 जणांचा मृत्यू, तर 1 हजार 122 नवे रुग्ण

कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः कहर सुरू केला आहे. गेक्या 24 तासात तर कोल्हापूरात तब्बल 40 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 122 नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात 391 जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 8 हजार 941 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 66 हजार 725 इतकी झाली आहे.

11:34 April 30

ठाण्यात आता लसीचादेखील काळाबाजार? पालिकेच्या आरोग्य केंद्रावर लसीचा हिशोब लागेना

ठाणे: महापालिकेच्या आरोग्य केंद्रावरील कोविड लस देण्यासाठी टोकन दिले जात असतानासुद्धा अर्ध्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. मग आलेला लसीचा साठा जातो कुठे, असा सवाल शिवसेनचे जेष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांनी स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित केला होता. केंद्रावर आलेल्या लसी जातात कुठे? या लस खासगी रुग्णालयांना परस्पर विकल्या जातात का? असा आरोप भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी उपस्थित केल्यानंतर ठाण्यात आता लसीचा देखील काळाबाजार होत आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

11:34 April 30

ठाकरे सरकारने करून दाखवलं आणि लसीकरण केंद्र बंद केलं : भाजप नेते किरीट सोमय्या

मुंबई -शहरात पुढचे तीन दिवस लसीकरण बंद असणार आहे. यावर ते भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी ठाकरे सरकार वर टीका केलेली आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने करून दाखवलेल आहे. गेल्या चार दिवसांमध्ये लसीकरणा संदर्भात लसीकरण केंद्रावर उडालेला गोंधळ आणि आता पुढचे तीन दिवस मुंबईतील लसीकरण केंद्र हे बंद असणार आहे. त्यामुळे सरकारने मोठ्या बाता करून जनतेसमोर सांगितलेलं होतं की आम्ही परदेशातून लसी विकत घेऊ, त्याचं काय झालं असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केलेला आहे.

11:34 April 30

कोरोनाने गोकुळच्या तिसऱ्या ठरावधारकाचा मृत्यू

कोल्हापूर :कोरोनामुळे आणखीन एका गोकुळच्या ठराव धारकाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी दोन ठराव धारकांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मात्र आता आणखीन एका ठरव धारकाचा मृत्यु झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. सज्जन विठोबा तोडकर (वय 72, रा. शेंद्री, ता. गडहिंग्लज) असे या ठराव धारकाचे नाव आहे. जनता दलाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. मात्र काल गुरुवारी सायंकाळी त्यांचा कोरोनाने बळी घेतला.

10:35 April 30

नागपूरात कोरोना रुग्णाचं पाच लाखांचं बिल ३० मिनीटांत आलं अडीच लाखांवर..

नागपुरातील न्यू इरा रुग्णालयात दिपक सोमानी यांच्या पत्नीवर कोरोना उपचार सुरू होते. त्यांचं एकूण बिल पाच लाख रुपये आलं होतं. त्यांनी यासंदर्भात माजी महापौर संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर जोशी यांनी चौकशी करण्यास सुरुवात करताच, पाच लाखांचं बिल अडीच लाखांवर आलं.

09:00 April 30

सुजय विखे पाटील रेमडेसिवीर प्रकरण : पुढील सुनावणी ३ मे रोजी

भाजपा खासदार सुजय विखे पाटील यांनी दिल्लीहून १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन आणले होते. हे इंजेक्शन अवैधरित्या आणल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. १० ते २५ एप्रिलदरम्यानच्या कोणत्या विमानाने हे आणण्यात आले याबाबत चौकशी करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ३ मे रोजी होणार असल्याची माहिती, याचिकाकर्त्यांच्या वकील प्रज्ञा तळेकर यांनी दिली.

08:35 April 30

रायगड : 28 एप्रिल रोजीची रेमडेसिवीर बॅच निघाली निकामी; 90 रुग्णांना जाणवला साईड इफेक्ट

रायगड : कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची रायगडात 28 एप्रिल रोजी आलेली 'कोविफॉर HCL21013' ही बॅच खराब निघाल्याने अन्न औषध प्रशासन विभागाने या इंजेक्शनचा वापर थांबविण्याबाबत आदेश जिल्ह्यातील रुग्णालयाला दिले आहेत. जिल्ह्यात 120 कोरोना रुग्णांना या बॅचचे इंजेक्शन देण्यात आले होते. यांपैकी 90 जणांना साईड इफेक्टचा जाणवला होता. डॉक्टरांनी त्वरित या रुग्णवर उपचार करून सुस्थितीत केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

08:17 April 30

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात कोविडची लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात कोविडची लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी करीत असून, याठिकाणी कोविडच्या नियमांचाही आता नागरिकांना विसर पडत असल्याचे चित्र सिल्लोड तालुक्यातील उंडण गाव येथील आरोग्य केंद्रावर दिसून आले आहे.

08:17 April 30

कोल्हापूर- मी सांगेल त्यालाच लसीकरण करा, माजी उपमहापौरला दादागिरी पडली महागात

कोल्हापूर :मी सांगेल त्यालाच लसीकरण करा, अशी दादागिरी करून शिवीगाळ, मारहाण करणे काही महिलांना महागात पडले आहे. या महिलांना मारहाणीस प्रवृत्त करून दादागिरी करणाऱ्या माजी उपमहापौर महेश सावंत यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम लसीकरण केंद्रावर घडला.

06:18 April 30

जेएसडब्ल्यू स्टील रोज १ हजार टन ऑक्सिजनचा रोज करणार पुरवठा

बंगळुरू- कोरोनाच्या संकटात रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडत असताना स्टील कंपन्या मदतीसाठी पुढे येत आहे. जेएसडब्ल्यू स्टीलने शुक्रवारपासून रोज १ हजार टन द्रवरुपातील ऑक्सिजन (एलएमओ) पुरवठा करणार असल्याचे जाहीर केले आहे.

06:17 April 30

मुंबई आयआयटीकडून देशाला मोठा दिलासा; नायट्रोजन युनिटचे ऑक्सिजन युनिटमध्ये यशस्वी रूपांतरणाचा प्रयोग

मुंबई- मुंबईसह राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यातील अनेक कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याने देशभरात ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. मात्र, आता ऑक्सिजन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) बॉम्बेने नुकताच प्रयोग केला आहे. त्यात आयआयटी मुंबईला यश सुद्धा आले आहे.

06:17 April 30

महाराष्ट्रात आता 15 मेपर्यंत कडक निर्बंध

मुंबई -राज्यात कोरोनाचा संसर्ग आणि संक्रमण वाढत असल्याने धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ मेपर्यंत कडक निर्बंध वाढवल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. यासंदर्भातील अद्यादेश काढले असून आपत्कालीन कायद्यातंर्गत सरकारने १ मे सकाळी ७ वाजल्यापासून ते १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू असणार आहे.

05:52 April 30

राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

मुंबई - राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी वाढत असले तरी नव्याने रुग्ण वाढीचे प्रमाण जैसे थेच आहे. आजही (दि. 29 एप्रिल) राज्यात 66 हजार 159 रुग्णांची नोंद झाली आहे तर आज उपचारादरम्यान 771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूदर 1.5 टक्के इतका आहे. तसेच राज्यात 24 तासांत 68 हजार 537 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तरी मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत वाढ घालणारी आहे.

Last Updated : Apr 30, 2021, 10:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details