मुंबई - फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले असून, “शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार” असं ते म्हणाले आहेत.नाना पटोले यांनी आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पत्रकारपरिषदेत बोलताना सांगितले की, “महाराष्ट्राच्या जनतेने बंदला जो प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. भाजपाने ज्या पद्धतीने या बंदला विरोध केला, खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या घटनेचं, या देशाच्या अन्नदात्यावर गाडी चालवून त्यांना जीवे मारणं, हा पद्धतीच्या हत्यारी व्यवस्थेला महाराष्ट्र भाजपा समर्थन करत असेल, तर ही बाब निषेधार्ह आहे.
आज महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला जनतेने उत्सफूर्त प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांच्या हत्येला भाजप समर्थन करत असेल तर त्यांचा आम्ही निषेध करतो. भाजपने बंदला विरोध केला. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा या बंदला विरोध पाहता त्यांची भूमिका स्पष्ट होते, असे नाना पटोले म्हणाले.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे. तर, भाजपाकडून मात्र या बंदवरून महाविकासआघाडीवर जोरादार टीका केली जात आहे. हा बंद म्हणजे ढोंगीपणा आहे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर, फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले असून, “शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार” असं ते म्हणाले आहेत.