मुंबई - राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसने चांगली ( Congress Nagar Panchayat Election ) मुसंडी मारली आहे. याचे सर्व श्रेय महाराष्ट्रातील जनतेचे आहे. त्यांच्या आर्शीवादामुळेच निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि हा निकाल लागला, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ( Nana Patole On Nagar Panchayat Election ) दिली आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
पक्ष विस्तारासाठी वेगळ लढावे लागते
"महाराष्ट्रात विदर्भात काँग्रेस पुढे आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही काही ठिकाणी पुढे आहोत. कोकणात आम्ही खाते उघडले आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काम केले आहे. भंडाऱ्याचा निकाल अजून मिळायचा आहे. अनेक ठिकाणी जागा वाटपात गोंधळ होऊ नये, यासाठी स्वबळावर आम्ही निवडणूक लढलो. जनतेने त्याला भरभरुन यश दिले. तसेच राज्यात जनतेने महाविकास आघाडीला ( Nana Patle On Mahavikas Aghadi ) पसंती दिली आहे. राज्यात काँग्रेस वेगळी लढल्याने जागा घटल्याचे बोलले जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला असता मला राष्ट्रवादी किंवा कोणावर आरोप करायचा नाही. आम्ही अनेक भागात वाढलो आहोत. पक्ष विस्तारासाठी वेगळ लढावे लागते," असेही पटोले यांनी स्पष्ट केले.