मुंबई -शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी सोमवारी सकाळी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांची स्वतंत्र भेट घेतली. दिवाकर रावते आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी स्वतंत्रपणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यामुळे आता या भेटींवरून तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट पाडव्याच्या मुहुर्तावर मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेनेची धावपळ सुरु आहे. सत्तेचा फॉर्म्युला अद्याप ठरला नसला तरी दोन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करताना पहायला मिळत आहेत.
हेही वाचा... शिवसेना नेते दिवाकर रावतेंनी घेतली राज्यपालांची भेट
सोमवारी सकाळी शिवसेना नेते दिवाकर रावते राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला पोहचले. जवळजवळ तासभर ते राजभवनात होते. मात्र, या भेटीचा उद्देश फक्त शुभेच्छा देणे हाच होता असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनात दाखल झाले आणि कोश्यारींची भेट घेतली. दोन्ही पक्षांकडून ही भेट वैयक्तीक असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभा निवडणूक एकत्रित लढवल्यानंतर शिवसेना आणि भाजपचे नेते राज्यपालांची वेग-वेगळी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राज्यपाल भेटीचे मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट
राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारीजी यांची आज सकाळी राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन दिवाळीनिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. राज्यातील सद्यस्थितीची माहिती त्यांना यावेळी दिल्याचे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले.