मुंबई :तीन फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईमध्ये सुरू ( Maharashtra Budget Session 2022 ) होईल. 25 मार्चपासून हे अधिवेशन चालेल. हे अधिवेशन पूर्णकाळ अधिवेशन असणार आहे. तसेच अधिवेशन नागपूरमध्ये करण्याचा विचार राज्य सरकारचा देखील होता. मात्र, राज्यपालांच्या अभिभाषणात दोन्ही सदनातील सदस्य हजर राहावे लागतात. मात्र, नागपूरमध्ये जागा अपुरी आहे. तसेच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी दिलेल्या आमदार निवासपुढच्या दोन इमारती अजूनही परत मिळाल्या नसल्याने मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे.
तीन मार्चपासून मुंबईत होणार राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ११ मार्चला मांडणार अर्थसंकल्प
अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 25 मार्च घेण्याचा निर्णय आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच अर्थसंकल्प 11 मार्चला मांडला जाणार आहे. गेल्या दोन वर्षात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अधिवेशन पूर्ण वेळ घेता आले नाही. मात्र, यावेळी होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्णवेळ घेणार असल्याचं बैठकीनंतर संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी सांगितले. तसेच हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत घेतले गेले. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूरला घेतले जाईल असे राज्य सरकारने जाहीर केले होते. मात्र, अधिवेशन आगोदर होणाऱ्या राज्यपालांच्या अभिभाषणासाठी दोन्ही सदनाचे सदस्य हजर असतात. त्या सदस्यांसाठी नागपूर विधान भवनात पुरेशी जागा सध्या नाही. तसेच अद्यापही कोविड रुग्णांच्या उपचारासाठी दिलेल्या आमदार निवासाच्या दोन इमारती परत मिळाल्या नसल्याने विधानमंडळाच्या समितीने अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला घेतलं जाणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितले. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अनिल परब यांनी ही माहिती दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेऊन विदर्भावर अन्याय
राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरला घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र आता अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्याकडून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्णवेळ घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने आता दिले असले तरी, पुढे जाऊन यामध्ये कोणतीही काटछाट होणार नाही अशा सूचना विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली आहे. महाविकासआघाडी सरकार विदर्भ आणि मराठवाड्यावर वेळोवेळी अन्याय करत आहे. राज्य सरकारच्या या अन्यायाला योग्य वेळी आपण उत्तर देऊ. मराठवाड्याच्या अनेक योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या असल्याचा आरोपही पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणीस यांनी केला.
त्यामुळे मुंबईत अधिवेशन
तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन मर्यादित दिवसाचे घेण्याचा घाट राज्य सरकारचा होता. मात्र, विरोधीपक्षांनी आग्रह केल्यामुळेच चार आठवड्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यासाठी राज्य सरकार तयार झाले. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरला होणे अपेक्षित होते. मात्र याबाबत बैठकीमध्ये राज्य सरकारकडून थातुरमातुर उत्तर देऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईतच घेण्यासाठी विधानमंडळ समितीच्या अहवालामुळे मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जाते असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.
संजय राऊतांची पत्रकार परिषद फुसका बार
संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे फुसका बार आहे. आम्ही सकाळीच म्हणालो होतो डोंगर पोखरून उंदीर बाहेर निघेल. त्याचप्रमाणे हा फुसका बार निघाला. साडेतीन नाहीतर भाजपचा एकही नेता संजय राऊत सांगितला नाही. संजय राऊत यांच्या घरच्या लग्नापर्यंत चौकशी पोहोचली म्हणून आता ते सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नाचा विषय काढत आहेत. मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नाला आता अडीच वर्षे उलटून गेली आहेत. किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले जात आहे. मात्र किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवला. सरकार तुमचा आहे त्यांच्याविरोधात कारवाई करा. तपास यंत्रणा काही चुकीचं करतात असं वाटत असेल तर त्याबाबत न्यायालयात दाद मागा, असेही दरेकर म्हणाले.