मुंबई- आयएनएस विक्रांत साठी जमा केलेल्या निधीमुळे किरीट सोमय्यासह भाजप अडचणीत आला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने किरीट सोमय्या आणि भाजपाची या मुद्यावर कोंडी झाली असून या मुद्यांवर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे.
भाजपा बॅकफूटवर, किरीट सोमय्यामुळे भाजपाची कोंडी? विक्रांत बचाव मोहिम - आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचा भंगारात लिलाव होऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून "विक्रांत बचाव" मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. 2013 साली ही मोहीम करण्यात आली असून मुंबईतील चर्चगेट स्टेशन तसेच इतर काही परिसरांमध्ये "विक्रांत बचाव" मोहिमेअंतर्गत किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्याकडून निधी गोळा करण्यात आला होता. जमा झालेला सर्व निधी आयएनएस विक्रांत युद्धनौकेचे संग्रहालय उभे करण्यासाठी देण्यात येणार होता. जमा झालेली सर्व रक्कम महाराष्ट्राचे राज्यपालांकडे सुपुर्द केली जाईल असे त्यावेळी किरीट सोमय्या यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र या मोहिमेतून जमा केलेली रक्कम कधीही राज्यपालांच्या येथे जमा झालेली नाही. या मोहिमेअंतर्गत जवळपास 58 कोटी रुपये देश-विदेशातून किरीट सोमय्या यांनी जमा केले.
हेही वाचा -Inflation Is Rising In India : भारतात वारंवार किरकोळ चलनवाढ; वाचा का होतीये ही वाढ
संजय राऊतांचे आरोप - जमा केलेले पैसे मनी लॉन्ड्रिंग करून नील सोमय्या यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली असल्याचे गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर केले आहेत. या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच किरीट सोमय्या अनिल सोमा यांच्यावर याबाबत तक्रार दाखल झाली असून पोलिसांकडून 13 एप्रिल ला चौकशीसाठी हजर राहण्यची नोटीसही पाठवण्यात आली आहे. मात्र सध्या सोमय्या पिता-पुत्र हे दोघेही नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्र फरार झाले असल्याचा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.
सोमय्यांनी विदेशातून आयएनएस विक्रांतसाठी पैसे आणले -आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी सोमय्यांनी पैसे गोळा केले. त्यामुळे आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्या यांनी पळून न जाता चौकशीला सामोरे जावे. त्यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाने परदेशातूनही पैसे गोळा केले आहेत. मात्र त्यांच्यावर आयएनएस विक्रांत बाबत झालेल्या आरोपानंतर सोमय्या पिता-पुत्र दोघेही फरार झाला असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केले आहेत.
सोमय्या गेले कुठे? केंद्र सरकारला विचारणार - गृहमंत्री -भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या नेमके कुठे आहे. केंद्रीय सुरक्षा असलेली व्यक्ती कुठे गेली? याबाबत केंद्र सरकारला पत्र पाठवून विचारू असा टोला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भारतीय जनता पक्ष आणि किरीट सोमय्या यांना लगावला आहे. किरीट सोमय्या यांनी महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोप केले. दुसऱ्यांवर आरोप करणे सोपे असते. मात्र आपल्यावर आरोप झाल्यानंतर त्यांना उत्तर देणं कठीण झाल आहे असा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सरकारचे भ्रष्टाचार काढत असल्यामुळे आरोप -महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांचे आणि मंत्र्यांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे आपण सातत्याने बाहेर काढत आहोत. त्यामुळेच सूडबुद्धीने आपल्यावर हे आरोप करण्यात येत आहेत. "विक्रांत बचाव" या मोहिमेअंतर्गत केवळ चर्चगेट वरून काही काळासाठी पैसे जमा करण्यात आले होते. जमा झालेले 11 हजार रुपये पक्षाला निधी म्हणून आपण दिले असल्याचे सोमय्या यांनी कोर्टात सांगितले. मात्र आपल्यावर किती आरोप झाले तरी महा विकास आघाडी सरकारमधील नेत्यांची आणि मंत्र्यांचे भ्रष्टाचार आपण समोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
हेही वाचा - Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेमुळे भाजपची कोंडी? -आयएनएस विक्रांत ही युद्धनौका भंगारात जाऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्याकडून मोहीम राबवण्यात आली. मात्र या मोहिमेअंतर्गत जमा झालेला पैसा राज भवन, राष्ट्रपती भवन किंवा इतर योग्य ठिकाणी जमा झाले नसल्याने भारतीय जनता पक्ष सध्या कोंडीत सापडलेला आहे. या प्रकरणावर किरीट सोमय्या यांची पाठराखण कशी करावी याबाबत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. मात्र किरीट सोमय्या हे लढवय्ये नेते आहेत. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते अद्याप समोर आलेले नाही. गरज पडल्यास पोलिसांच्या चौकशीला किरीट सोमय्या हे नक्की सामोरे जातील असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.
भाजपला सहआरोपी करावे - नाना पटोले -विक्रांत बचाव’च्या नावाखाली भाजपाने जनतेच्या भावनेशी खेळ केला आहे. सोमय्या यांच्या वकिलाच्या दाव्यानुसार ११ हजार रुपये जमा केल्याचे समजते पण ही रक्कम यापेक्षा नक्कीच मोठी आहे. तो रोख पैसा भाजपाने कसा घेतला व त्याचा कशासाठी वापर केला हे जनतेला जाणून घ्यायचा अधिकार आहे. ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी सोमय्या यांच्याबरोबर भाजपाचीही चौकशी करुन कडक कारवाई झाली पाहिजे. सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली रोख पैसे जमा केले, या पैशांची कोणतीही पावती लोकांना दिलेली नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतल्याचेही स्पष्ट झालेले नाही. जनतेकडून जमा केलेली रक्कम राजभवन, राष्ट्रपतीभवन अथवा संरक्षण मंत्रालय यापैकी कोणाकडेही जमा न करता जनतेचा हा पैसा सोमय्या यांनी भारतीय जनता पक्षाकडे जमा केल्याचे सोमय्या यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आलेल्या आहेत. हा जनतेचा विश्वासघात असून खोटे बोलून वसुली केली आहे. जर भारतीय जनता पक्षाने हा पैसा घेतला असेल तर तोही गुन्हाच आहे म्हणून भारतीय जनता पक्ष व त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे. ‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले