मुंबई - उत्तर प्रदेशातील (UP) लखीमपूर (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेसंदर्भात महारष्ट्रामध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने पुकारलेल्या बंदच्या (Maharashtra Band) विरोधात उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरो यांच्या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकार दत्ता यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. 11 ऑक्टोबर 2021 च्या राज्यव्यापी बंदबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला नाही, अशी माहिती राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर 2021 रोजी पाळण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदबाबत मंत्रिमंडळाने कोणताही निर्णय घेतला नाही, असे महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जुलिओ रिबेरो यांनी 11 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यव्यापी बंदला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
मुंबई पोलिसांचे न्यायालयात प्रतिज्ञापत्र - याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे राज्य सरकारच्या उपसचिवांनी त्यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. मुंबई पोलिसांनीही बंद दरम्यान त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल केले. पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, मुंबईत कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस दलाने मुंबईच्या रस्त्यावर बंदोबस्तासाठी उचललेली पावले नमूद केली आहेत. या प्रतिज्ञापत्रात नोंदवलेल्या गुन्ह्यांची यादी केली आहे.