मुंबई -पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहातील असंसदीय वर्तन करत गदारोळ केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. त्या विरोधात नागपूर, पुणे, मुंबई व कोल्हापूरसह संपूर्ण राज्यभरात भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू नये, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा कट असून हे दोघेच सरकारमधील झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात आंदोलना दरम्यान केला.
कांदिवली पश्चिम भाजप जिल्हाध्यक्ष कार्यालयाबाहेर भाजप नगरसेवक व पदाधिकारी यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते . यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत १२ आमदारांचे निलंबन मागे घेत नाही, तोपर्यंत अशाच पद्धतीचे आंदोलन राज्यभर सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले.
विधानभवनाबाहेर प्रतिसभागृह.. भाजप आमदारांचा दिवसभर ठिय्या
ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव ठाकरे सरकारने विधानसभेत मांडला होता. त्यानंतर विरोधी पक्षांच्या आमदारांनी गोंधळ घातला त्यानंतर भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. विधान भवनाच्या पायऱ्यांवरच विरोधकांनी ठिय्या मांडला. विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या. तसेच सरकारच्या विरोधात विधान भवनाच्या बाहेर प्रतिसभागृह भरवून भाजपने अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला
सत्ताधारी पक्षांचे आमदार किंवा मंत्र्यांचा सभागृहात प्रवेश होताच. विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील केली जात होती. विधान भवन परिसरात असलेल्या मीडिया स्टॅण्ड समोरच विरोधकांनी प्रतिसभेचं आयोजन केलं होतं. नाना पटोले दिसताच 'सोनिया जिसकी मम्मी है, वह सरकार निकम्मी है' अशा स्वरुपाच्या घोषणा देखील देण्यात आल्या.
सांगलीत भाजपचे "जोडे मारो"आंदोलन -
सांगली -भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबन विरोधात सांगलीमध्ये भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करत निलंबन कारवाईचा निषेध नोंदवण्यात आला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर भाजपाच्यावतीने महाविकास आघाडी सरकारचा जोडो मारो आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला.
परभणीत निदर्शने, पुतळा दहन करण्यावरून तणाव
परभणी -विधानसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी परभणीत भाजपच्या महानगर शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निदर्शने करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केला. परंतु त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून हा पुतळा हिसकावून ताब्यात घेतला. मात्र, पुतळा ओढाओढीच्या प्रकारामुळे पोलीस- कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता
पंढरपुरात भाजपचे निषेध आंदोलन -
पंढरपूर - पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीकडून महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचे युवानेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली.