मुंबई -महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. बऱ्याच ठिकाणी एकतर्फी लढती असल्याचा प्रचार केला जात आहे. तरीही देवेंद्र-नरेंद्र प्रचारावर अधिकाधिक भर देत आहेत. भाजप-शिवसेना युतीला पाठिंबा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यातील जाहीर सभांची सुरुवात झाली आहे. पहिली सभा १३ ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये झाली.
आज (१६ ऑक्टोबर) अकोला, परतूर (जालना), पनवेल (नवी मुंबई) येथे मोदींच्या जाहीर सभा होतील. तर, उद्या (ता. १७) परळी (बीड), सातारा, पुणे येथे जाहीर सभा होणार आहेत. साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे तेथे विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे मोदी येथे भाजप उमेदवार उदयनराजे यांचाही प्रचार करणार आहेत. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील लढणार आहेत.