नागपूर - गेल्या चार दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यातील सर्वदूर पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नवेगाव खैरी, नांद, वेना या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पारशिवनी सावनेर, रामटेक, उमरेड आणि भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करून नागरिकांना काही सूचना करुन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई - राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होत आहे. सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार कायम राहिली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. वर्धा तालुक्याच्या पवनूर येथे सतत सुरु असलेल्या पावसामुळे वन विभागाचा वनराई बंधारा फुटला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सध्याची पाणीपातळी 35.5 फुटांवर पोहोचली असून इशारा पातळी गाठायला केवळ साडे तीन फूट बाकी आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक 110 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका नागरिकांना दररोज ३८५ कोटी लीटर (३,८५० दशलक्ष लीटर) एवढा पिण्याच्या शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करते. हा पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक सागर तलाव हा आज दुपारी ०१.०४ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईला पाण्याचा पुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील पहिलाच तलाव ठरला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे देण्यात आली आहे.
सांगली - जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे. तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी कायम आहे. 88 मिलिमीटर इतके पावसाची दुसऱ्या दिवशी चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ सुरूच असून 18.86 टक्के पाणीसाठी निर्माण झाला आहे. तर वारणा नदी ही पात्राबाहेर गेली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीही वाढ कायम असून सांगली मध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी पात्राता 17 फुटांवर पोहोचली आहे.
नाशिक - नाशिक जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरण ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे धरणातील हजारो क्यूसेस पाणी हे नदीमध्ये सोडले जात आहे. ( Rain In Nashik ) त्यामुळे गोदावरी नदीसह इतर उप नद्यांना पूर आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पुराचे पाणी पुलावरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
पुणे -हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच अपघाताचा संभाव्य धोका लक्षात घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ नुसार जिल्ह्यातील गडकिल्ले, धरण, तलाव, धबधबे आदी पर्यटनस्थळ परिसरात जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी १७ जुलैपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
वर्धा - वर्धा तालुक्याच्या पवनूर येथे सतत सुरु असलेल्या पावसामुळे वन विभागाचा वनराई बंधारा फुटला आहे. त्यामुळे नाल्याला पूर आल्याने पवनूर, खानापूर आणी कामठी या गावात पाणी शिरले.( water seeping into the village) सुरक्षेच्या अनुषंगाने नागरिकांना स्थानातरित करण्यात आले आहे. पवनूर येथील नागरिकांची तेथीलच असलेल्या मंदिरात व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच खासदार रामदास तडस, आमदार रणजित कांबळे यांनी जाऊन आढावा घेतला. यावेळी जीप सदस्य जयश्री गफाट भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, हे सुद्धा यावेळी उपस्थित होते.
कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांत आज सुद्धा सकाळपासून मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Kolhapur ) सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. सध्याची पाणीपातळी 35.5 फुटांवर पोहोचली असून इशारा पातळी गाठायला केवळ साडे तीन फूट बाकी आहे. जिल्ह्यात पंचगंगा नदीची ( Flood of Panchganga river ) इशारा पातळी 39 फूट आहे आणि 43 फूट धोका पातळी आहे. त्यामुळे असाच पाऊस सुरू राहिल्यावर इशारा जवळपास 12 तास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मागील 48 तासांत संततधार पाऊस ( Continuous rain in Chandrapur district ) सुरू आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले असून अनेक गावांचा ( Many villages were cut off due to rains ) संपर्क तुटला आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, जिवती या तीन तालुक्यात ( Excessive rainfall in three Tahsil ) अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यात सरासरी 48 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, इरई धरणाची तीन दारवाजे उघडण्यात आली आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात एक शेतकरी नाल्यात वाहून गेला. तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील काही मध्यम तसेच लघुसिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, इरई धऱणाचे तीन दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेनेही शहरातील नदीकाठावरील नागरिकांना सावधिगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे.
बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस -चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात सर्वाधिक 110 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिवती तालुक्यात 86.8 मि.मी. तर, राजुरा तालुक्यात 81.2 मी. मी. पाऊस पडला आहे. सर्वात कमी पाऊस ब्रह्मपुरी तालुक्यात २५.६ मि. मी.पावसाची नोंद झाली आहे. ब्रह्मपुरीत तालुक्यातील बेटाळा येथील नवलाजी पांडुरंग तुपट (वय ५६) हे भुतीनाल्यात वाहून गेले. ही घटना रविवारला दुपारी दोन वाजताच्या सुमाराला घडली. तुपट शेतात जाण्यासाठी नाला ओलांडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते वाहून गेले. त्यांचा मृतदेह आज सापडला आहे.
नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक मार्ग बंद - सावली तालुक्यातील नवेगाव येथील पुरुषोत्तम डोमाजी वसाके यांच्या घराची भिंत रविवारला रात्री नऊ वाजताच्या सुमाराला कोसळली. त्यावेळीत त्यांचे कुटुंबीय घरातच होते. भिंत विरुद्ध दिशेने पडल्यामुळे ते बचावले. सावली तालुक्यात एक जूनपासून आतापर्यंत २७ घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. कोरपना तालुक्यात नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहे. चन्नई-कन्हाळगाव, कोरपना-आदिलाबाद, जांभुळधरा-मांडवा, राजुरा-अमृतगुडा, राजुरा-धिडशी, गडचांदूर-टेकमांडवा, वरोरा-शेगाव, तोहगाव-लाठी हे मार्ग बंद झाले आहेत.
तब्बल तीन तास वाहतूक ठप्प -धानोली तांडा क्रमांक दोन येथील दहा ते बारा घरात नाल्याचे पाणी शिरल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे घरातील अन्नधान्य,साहित्याचे मोठे नुकसान झाले. मात्र, अद्याप प्रशासनाकडून मदत मिळाली नाही. सर्वाधिक पाऊस कोसळणाऱ्या बल्लारपूर तालुक्यात पावसाने आपली हजेरी कायम ठेवली. राजुरा नगरपरिषदेच्या कारभाराचे पावसाने धिंडवडे काढले. राजुऱ्यातील फिरोज शहा-ले आऊट मधील नाली कोसळल्याने अनेक प्रभागांत पाणी साचले होते. सिंधी गावलागतच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली होती. तसेच खांबाला नाल्यावरुन पाणी ओसंडून वाहत आहे. धानोरा पुलावरील वाहतूक पाणी वाढल्याने बंद केली आहे. शिरपूर-अमृतगुडा, शेगाव-वरोरा , जिवती-येल्लापूर मार्ग बंद झाले आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील नागाळा जवळ मोठे झाड कोसळल्याने जवळपास तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल तीन तासापर्यंत या मार्गावरची वाहतूक ठप्प होती. नदीकाठावरील शेत खरडवून निघाली आहे. हजारो हेक्टर शेतात गुडघाभर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले आहे.
इरईचे दरवाजे उघडले - इरई धरणाचे एक, चार आणि सात क्रमांकाचा दरवाजा २५ से.मी.ने उघडले आहे. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेता नदीकाठावरील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी शेतात लागणारी अवजार तसेच जनावरांना सुरक्षित स्थळी हलवावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. पदमापूर, किटाळी, मसाळा, यशवंतनगर, पडोली, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोली, चिचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुर्ला, विचोडा बू, आंबोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा, हडस्ती, चारवट, कवठी, चेकतिरवंजा, देवाडा, चोराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मीनगाव, वडगाव, चंद्रपूर मधील नागरिकांनी गुरे, मालमत्ता नदीकाठापासून दूर ठेवावी अन्यथा होणाऱ्या नुकसानास वीज कंपनी जबाबदार राहणार नसल्याचे मुख्य अभियंत्यांनी कळविले आहे.
येथील धरणं, तलाव मोठ्या प्रमाणात ओव्हरफ्लो - आज मुंबईसह अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे राज्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काही धरणं, तलाव ओव्हरफ्लो झाली आहेत, तर काही ठिकाणी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. धरणांतील पाणीसाठा वाढल्याने नक्कीच दिलासादायक गोष्ट म्हणावी लागणार आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यात अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
हेही वाचा -Maharashtra Rain Update : राज्यात जोरदार पावसाचा इशारा, आज 'या' ठिकाणी रेड अलर्ट