मुंबई -एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज ( 14 जुलै ) मुंबई दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी भाजप आमदार, खासदार तसेच शिंदे गटातील आमदारांची भेट घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मी जो दावा केला आहे, २०० आमदार मतदार करणार तो खरा ठरेल. याचे कारण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार या आदिवासी महिला समाजाच्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे यांनी ( CM Eknath Shinde On Presidential Election 2022 Droupadi Murmu ) केलं.
'ही निवडणूक मुर्मू जिंकतील' - मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मी जो दावा केलेला आहे, २०० आमदार मतदार करणार तो खरा ठरेल. याचे कारण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार या आदिवासी महिला समाजाच्या आहेत. आदिवासी समाजाला या देशाच्या सर्वोच्च स्तरावर बसवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचे स्वागत सर्वांनी केलेल आहे. काही लोकांनी जाहीरपणे केलं आहे. काही लोकांनी मनापासून केलं आहे. यंदा रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने द्रौपदी मुर्मू जिंकतील. ही निवडणूक आता फक्त एक औपचारिकता आहे. ही निवडणूक द्रौपदी मुर्मू यांनी जिंकलेलीच आहे, असा प्रतिसाद संपूर्ण राज्यातून भेटत आहे.
मीरा भाईंदर महानगरपालिकेचे १८ नगरसेवक शिंदे गटात - पुढे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या १८ नगरसेवकांनी आज आमच्या गटात प्रवेश केलेला आहे. हे सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे सरकार आहे. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार आहे. आज जो सर्वसामान्य माणूस आहे, जो नागरिक आहे त्याला आमची भूमिका व राज्यात स्थापन झालेले सरकार याला त्यांनी मान्यता दिलेली आहे. म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी नागरिकांचा सकारात्मक पाठिंबा भेटत आहे. आमची भूमिका राज्यातील सर्व सामान्य माणसाला न्याय देण्याची आहे, त्यासाठी काहीही करावे लागेल तर करू.