मुंबई -सीएनजी आणि पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडने ( Mahanagar Gas Increased Rate ) ग्राहकांना पुन्हा एकदा दरवाढीचा झटका दिला आहे. आजपासून (दि. 8 जानेवारी) मुंबईत सीएनजीच्या ( Compressed Natural Gas ) दरात प्रति किलो अडीच रुपयांची तर पीएनजीच्या ( Pipe Natural Gas ) दरात प्रती एससीएम ( Standard Cubic Meter ) दीड रुपयांची वाढ केली आहे. गेल्या तीन महिन्यांत एमजीएलने सीएनजी व पीएनजी दरात आतापर्यंत चारवेळा वाढ केलेली आहे. त्यामुळे आता महागाईची झळ मुंबईकरांना बसणार आहे.
चार महिन्यात सहावेळा किमती वाढ -
केंद्र शासनाने नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ केल्यानंतर एमजीएलकडून सातत्याने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली जात आहे. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून ते आतापर्यंत एमजीएलने ( Mahanagar Gas Limited ) सीएनजी व पीएनजी दरात आतापर्यत सहावेळा वाढ केलेली आहे. एमजीएलने 8 जानेवारी म्हणजे आजपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो अडीच रुपयांची, तर पीएनजीच्या दरात प्रती एससीएम दीड रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती पाईप गॅस वापरकर्त्यांसह रिक्षा-टॅक्सी आणि सीएनजी वाहन चालकांना आर्थिक फटका बसणार आहे.