महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते महंमद खडस यांचे निधन - Mahamad Khadas passes away

त्यांच्या पश्चात पत्नी फाफा उर्फ फातिमा खडस, चिरंजीव समर खडस असा परिवार आहे. त्यांचा दफनविधी कोकणातील चिपळूण या मूळ गावी शुक्रवारी करण्यात येणार आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी समाजवादी पक्षाचे काम सुरू केले.

महंमद खडस

By

Published : Nov 21, 2019, 10:50 PM IST

Updated : Nov 21, 2019, 11:23 PM IST

मुंबई- समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते महंमद खडस यांचे 83 व्या वर्षी दीर्घ आजाराने चुनाभट्टी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते महंमद खडस यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया

त्यांच्या पश्चात पत्नी फाफा उर्फ फातिमा खडस, चिरंजीव समर खडस असा परिवार आहे. त्यांचा दफनविधी कोकणातील चिपळूण या मूळ गावी शुक्रवारी करण्यात येणार आहे. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्यांनी समाजवादी पक्षाचे काम सुरू केले. मराठवाडा नामांतर आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दलित आणि उपेक्षितांच्या हक्कांच्या चळवळीतील आंदोलनात त्यांनी सक्रिय काम केले होते. सोबतच मुस्लीम समाजातील मागास घटकांच्या कारणांचा शोध घेऊन त्यांनी अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला होता. हमीद दलवाई यांच्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाने हाती घेतलेल्या मुस्लीम तलाकपीडित महिलांच्या प्रश्नावर त्यांनी नेटाने बाजू मांडली होती.

आणीबाणीविरोधात आवाज उठवल्याबद्दल त्यांनी १४ महिन्यांचा कारावास भोगला होता. उपेक्षित सफाई कामगारांच्या जीवनाचा अभ्यास करुन महंमद खडस यांनी ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकूर यांच्यासोबत नरकसफाईची गोष्ट हे पुस्तक लिहले आहे. त्यात सफाई कामगारांच्या जगण्याचे भीषण वास्तव त्यांनी जगासमोर मांडले. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, मुंबईतील गिरणी कामगारांच्या लढ्याला त्यांनी नेहमी सक्रिय सहभाग घेतला होता. राष्ट्रसेवा दलात ते काही काळ होते, पण युवकांना सामाजिक प्रश्नांचा ठोस कार्यक्रम द्यावा या हेतुने त्यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत समता आंदोलन नावाची वेगळी संघटना उभारली होती.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे सामाजिक लढे, आंदोलने याविषयी त्यांना कमालीची आस्था होती. १९८० च्या दशकात पुण्यातील विषमता निर्मूलन परिषदेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. मुंबईतील अपना बाजारच्या चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. १९७२ च्या दुष्काळात मराठवाड्यातून मुंबईत स्थलांतरीत झालेल्यांना त्यांनी मदत केली. ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता.

त्यांच्या निधनाचे वृत समजताच, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु माजी राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार कपिल पाटील, रिपब्लिकन चळवळीतील गौतम सोनवणे, ज्येष्ठ समाजवादी नेते गजानन खातू यांच्यासह त्यांच्या सामाजिक, राजकीय चळवळीतील व्यक्तींनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

Last Updated : Nov 21, 2019, 11:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details