मुंबई -राज्य सरकारच्या 'सीएनजी' वरील मूल्यवर्धित ( CNG VAT Decrease ) कर (व्हॅट) १० टक्क्यांनी कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागतच आहे. मात्र, राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलवरील ( Madhav Bhandari Demand To Decrease VAT On Petrol Disel ) 'व्हॅट' ही कमी करून सामान्य माणसाला दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काय म्हणाले माधव भंडारी -महाविकास आघाडी सरकारने अलीकडेच सीएनजीवरील व्हॅट १० टक्क्यांनी कमी केला आहे. गेल्या अडीच वर्षांत या सरकारने प्रथमच कर कमी करून जनतेवरील भार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा निर्णय म्हणजे केवळ वरवरची मलमपट्टी आहे. मूळ प्रश्नावर तोडगा काढण्याऐवजी आघाडी सरकारने अशा मलमपट्टीला प्राधान्य द्यावे, हे दुर्दैवी आहे. गेली दीड वर्षे पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी करत आहे. मात्र, या सरकारने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असल्याचे माधव भंडारी म्हणाले.