मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray on Loudspeakers) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथे केलेले भाषण आणि त्यावेळी केलेली भोंग्यांबाबतची घोषणा (Maharashtra loudspeaker controversy) यामुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिकच तापत चालले आहे. राज ठाकरे यांच्या घोषणेनंतर राज्यभरातले मनसैनिक आक्रमक झाले. न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदींवरील अनधिकृत भोंगे हटवले नाहीत तर त्याच मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. या इशाऱ्यानंतर अनेक मनसैनिकांनी आपापल्या विभागात भोंगे लावायला सुरुवात देखील केली. मात्र, याच भोंग्याच्या राजकारणाचा फायदा झालाय मुंबईतील भोंगे विक्रेत्यांना (Loudspeaker Sales Hike in Mumbai). इतरवेळी मंदीत असणाऱ्या या व्यवसायाला सध्या मात्र अच्छे दिन (Maharashtra loudspeaker Businessman Reaction) आलेत.
हेही वाचा -Village Without Loudspeaker : 'या' गावात पाच वर्षापासून भोंगाबंदी.. गावकऱ्यांनी एकमताने घेतला निर्णय
दोनच दिवसात 150 ते 200 भोंग्यांची विक्री -मुंबईतील ग्रँड रोड परिसरात लॅमिंग्टन रोड येथे मागील तीस ते चाळीस वर्षांपासून भोंग्यांचा व्यापार करणारे शाहिद शेख सांगतात की, "हे सर्व राजकारण सुरू आहे आणि त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर देखील झालाय. आमचा व्यवसाय तसा सीजनल आणि नेहमीच मंदीत असतो, कधी सणवार आले तरच जास्त प्रमाणात भोंग्यांची विक्री होते. हे राजकारण सुरू होण्याआधी आमचे महिन्याला साधारण 20 ते 25 भोंगे विकले जायचे. आता राज ठाकरे यांच्या सभेनंतर मात्र दोनच दिवसात आमचे जवळपास दीडशे ते दोनशे भोंग्यांची विक्री झाली आहे."