मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३१ मे रोजी वॉर्डच्या आरक्षणाशी संबंधित लॉटरी काढण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेला दिले होते. त्यानुसार येत्या मंगळवारी ३१ मे रोजी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात ही लॉटरी काढली जाणार आहे. ( BMC Reserved Wards Lottery on 31st May) लॉटरी प्रक्रियेवर सूचना आणि हरकती मांडण्यासाठी, ६ जूनपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. १३ जून रोजी आरक्षणावर शिकामोर्तब केले जाणार आहे.
ओबीसी आरक्षणाशिवाय आरक्षण सोडत -सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, आता ओबीसी आरक्षणाशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आरक्षण सोडत पार पडणार आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालायाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने वाढलेल्या ९ प्रभागावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता २२७ वॉर्डवरून २३६ वॉर्ड झाले निश्चित झाले आहेत. प्रभाग रचना जाहीर झाल्याने आता आरक्षणाच्या सोडतीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात मंगळवारी, ३१ मे रोजी पार पडेल. कोणालाही सूचना आणि हरकती असल्यास मुंबई महानगरपालिका मुख्यालय तसेच मुंबईतील २४ प्रभागांमध्ये नोंदवण्याची सुविधा उपलबब्ध करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडेल.
महिलांसाठी ११८ प्रभाग राखीव -ओबीसी आरक्षणाचे ६१ प्रभाग हे खुले प्रभाग होणार आहेत. त्यामुळे २३६ पैकी ११८ प्रभाग हे महिलांसाठी असणार आहेत. अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित ठेवले जाणार आहेत. त्या पैकी ८ प्रभाग महिलांसाठी राखीव असणार आहे. तर अनुसूचित जमाती साठी २ प्रभाग आरक्षित आहेत. त्यापैकी एक प्रभाग महिला आरक्षित आहे. तसेच २१९ प्रभाग खुल्या वर्गासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यापैकी १०९ प्रभाग महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. या आरक्षण सोडतीवर १ ते ६ जून पर्यंत हरकती, सूचना स्वीकारण्यात येतील व १३ जून रोजी अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.